Tarun Bharat

निकोलस पूरन, रोस्टन चेस विंडीजचे उपकर्णधार

Advertisements

न्यूझीलंडविरुद्ध आगामी मालिकेसाठी संघाची घोषणा, 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ

सेंट जॉन्स (अँटिग्वा) / वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध आगामी मालिकांसाठी रोस्टन चेस विंडीजच्या उपकर्णधारपदी सलामीवीर क्रेग ब्रेथवेटची जागा घेईल तर 25 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन टी-20 मालिकेत संघाचा उपकर्णधार असणार आहे. विंडीज क्रिकेट मंडळाने गुरुवारी सायंकाळी उशिराने ही घोषणा केली. विंडीज-न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला दि. 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.

निकोलस पूरन टी-20 संघाच्या उपकर्णधारपदी कायम राहील. त्याच्याकडे 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिकेत सर्वप्रथम ही जबाबदारी सोपवली गेली होती. निकोलस पूरन विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आघाडीचा खेळाडू राहिला असून त्याने 19 टी-20 सामन्यात 2 अर्धशतके झळकावली आहेत तर वनडेमध्ये देखील त्याची सरासरी 50 च्या आसपास आहे. पूरन अलीकडेच आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे खेळला असून त्यात त्याने 14 सामन्यात 353 धावांची आतषबाजी केली आहे.

28 वर्षीय चेसने आतापर्यंत 35 कसोटी सामने खेळले असून त्यात 5 शतके झळकावली आहेत. तसेच ऑफस्पिन गोलंदाजीवर तीनवेळा डावात किमान 5 बळी घेतले आहेत. रॉस्टन चेस यापूर्वीच न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे तर अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी असणारा निकोलस पूरन लवकरच तेथे पोहोचणार आहे. त्याच्यासमवेत टी-20 कर्णधार केरॉन पोलार्ड, कसोटी कर्णधार जेसॉन होल्डर, फॅबियन ऍलेन, शिमरॉन हेतमेयर, किमो पॉल व ओशेन थॉमस हे देखील आयपीएल स्पर्धेत सहभागी होते. ते सर्व एकाच वेळी न्यूझीलंडमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे.

‘मी या जबाबदारीला मोठी संधी म्हणून पाहतो. यामुळे, माझ्या खेळाला देखील आणखी चालना मिळेल. या वर्षारंभी लंका दौऱयात मी उपकर्णधारपद सांभाळले आहे. अर्थात, 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये मी अनेक चढउतार अनुभवले आहेत आणि उपकर्णधारपद सोपवले जाणे हा माझा सन्मान आहे. विंडीज क्रिकेटसाठी आणखी बरेच योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील’, असे निकोलस पूरन याप्रसंगी म्हणाला.

27 रोजी मालिकेला प्रारंभ

विंडीज-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका 27 नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे खेळवल्या जाणाऱया लढतीने सुरु होईल. त्यानंतर दि. 29 व 30 नोव्हेंबर रोजी माऊंट माँगनुई येथे उर्वरित 2 टी-20 लढती होणार आहेत. त्यानंतर 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत हॅमिल्टनमधील सेडॉन पार्कवर पहिली कसोटी तर दि. 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्हवर दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे.

उभय संघातील कसोटी मालिका ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग असेल. विंडीज संघाने सध्या आयसोलेशन पूर्ण केले असून संघातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना आता ख्राईस्टचर्चकडे रवाना होण्याची परवानगी मिळाली आहे.

कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटात अवघ्या क्रिकेट मालिका ठप्प झाल्या असताना विंडीजचाच संघ पहिला होता, ज्यांनी धोका पत्करुन क्रिकेट मालिकेसाठी विदेश दौरा केला. जुलै महिन्यात 3 कसोटी सामन्यांच्या छोटेखानी मालिकेसाठी त्यांनी इंग्लंडला भेट दिली होती.

विंडीज टी-20 संघ : केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलेन, शेल्डॉन कॉट्रेल, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेतमेयर, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, रोव्हमन पॉवेल, किमो पॉल, रोमारिओ शेफर्ड, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर, केसरिक विल्यम्स.

कसोटी संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्रेव्हो, शमरह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रहकीम कॉर्नवल, शेन डॉरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेतमेयर, चेमर होल्डर, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, केमर रोश.

कसोटीसाठी राखीव : के. बॉनर, जोशुआ डॅसिल्वा, प्रिस्टॉन मॅकस्विन, शेन मोसेली, रेमॉन रेफर, जेडेन सिल्स.

न्यूझीलंड-विंडीज मालिकेची रुपरेषा

तारीख / सामना / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

27 नोव्हेंबर / पहिली टी-20 / सकाळी 11.30 वा. /ऑकलंड

29 नोव्हेंबर / दुसरी टी-20 / सकाळी 6.30 वा. / माऊंट माँगनुई

30 नोव्हेंबर / तिसरी टी-20 / सकाळी 11.30 वा. / माऊंट माँगनुई

3 ते 7 डिसेंबर / पहिली कसोटी / पहाटे 3.30 वा. /हॅमिल्टन

11 ते 15 डिसेंबर / दुसरी कसोटी / पहाटे 3.30 वा. /वेलिंग्टन

Related Stories

भारतीय फुटबॉल संघाचे 19 मे रोजी कतारला प्रयाण

Patil_p

रशीद खानला पीएसएल स्पर्धेत खेळण्यासाठी ससेक्सकडून परवानगी

Patil_p

श्रीलंकेचा 381 धावांचा डोंगर, अँडरसनचे 6 बळी

Patil_p

लॉर्ड्सवरील पहिली कसोटी रंगतदार वळणावर

Patil_p

भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

datta jadhav

स्पेनचा कार्लोस अल्काराझ अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!