Tarun Bharat

नितीन मेनन ठरले आयसीसीचे सर्वांत युवा पंच

36 व्या वर्षीच आयसीसी इलाईट पॅनेलमध्ये संधी, श्रीनिवास वेंकटराघवन, एस. रवी यांच्यानंतर केवळ तिसरे भारतीय पंच

दुबई / वृत्तसंस्था

भारताचे नितीन मेनन यांचा आयसीसीच्या इलाईट पंचांच्या पॅनेलमध्ये समावेश केला गेला. या पॅनेलमध्ये स्थान प्राप्त करणारे नितीन मेनन हे सर्वात युवा पंच ठरले आहेत. ही निवड 2020-21 या कालावधीकरिता आहे. इंग्लंडचे निगेल लाँग यांची जागा ते घेतील.

36 वर्षीय मेनन यांनी यापूर्वी 3 कसोटी, 24 वनडे व 16 टी-20 सामन्यात पंच म्हणून काम पाहिले असून या प्रतिष्ठेच्या पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे ते केवळ तिसरे भारतीय पंच ठरले आहेत. यापूर्वी माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन व सुंदरम रवी यांना हा मान लाभला होता. यापैकी सुंदरम रवी यांना मागील वर्षीच या पॅनेलमधून वगळले गेले होते.

नितीन मेनन यांनी 22 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेट खेळणे बंद केले आणि 23 व्या वर्षी बीसीसीआय नोंदणीकृत सामन्यांमध्ये कार्यरत राहत ते वरिष्ठ पंच म्हणून काम पाहू लागले. आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ ऍलर्डाईस, माजी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर, सामनाधिकारी रंजन मदुगले व डेव्हिड बून यांच्या निवड समितीने इलाईट पॅनेलमध्ये नितीन मेनन यांची निवड केली.

ऍशेसमध्ये संधी शक्य

इलाईट पॅनेलमध्ये निवड झाल्यानंतर नितीन मेनन आता पुढील वर्षात ऑस्ट्रेलियात होणाऱया प्रतिष्ठेच्या ऍशेस क्रिकेट मालिकेत पंच म्हणून काम पाहू शकतील. तोवर आयसीसीने घरच्या मैदानावरील मालिकांमध्ये स्थानिक पंच उतरवण्याची अट शिथिल केली तर मेनन यांना संधी मिळणे आणखी सहजसाध्य होईल. अर्थात, पंच या नात्याने मेनन यांनी जी दर्जेदार कामगिरी साकारली, ते पाहता वरील अट कायम राहिली तरी ते पुढील वर्षी भारत-इंग्लंड यांच्या मालिकेत पंच म्हणून पाचही कसोटी सामन्यात जबाबदारी पार पाडू शकतात. योगायोगाने नितीन मेनन यांचे वडील नरेंद्र मेनन हे देखील माजी पंच राहिले आहेत.

‘माझे वडील माजी आंतरराष्ट्रीय पंच राहिले आहेत. 2006 मध्ये तब्बल दहा वर्षांच्या अंतराने बीसीसीआयने पंचांसाठी परीक्षा आयोजित केली होती. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला त्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. जर परीक्षेत यश मिळवले तर व्यवसायाने पंच होऊ शकशील, असे ते म्हणाले. त्यामुळे, मी ती परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळाले. पुढे मी पंच म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली’, असे मेनन आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाले. मेनन यांनी उमेदीच्या कालावधीपासूनच पंच म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली आणि आता त्यांनी या क्षेत्रात 13 वर्षे पूर्ण केली आहेत.

23 व्या वर्षीच श्रीगणेशा

‘वास्तविक, पंच म्हणून काम पाहण्यापेक्षा देशातर्फे खेळण्याचे माझे स्वप्न होते. पण, 22 व्या वर्षी मी स्वतः क्रिकेट खेळणे बंद केले आणि 23 व्या वर्षीच वरिष्ठ पंच म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. एकाच वेळी खेळणे आणि पंचगिरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे, खेळणे सोडून पंचगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय मी घेतला’, असे ते म्हणाले. आतापर्यंत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये (2018 व 2020 महिला टी-20 विश्वचषक) पंचगिरी केली असल्याने तो अनुभव येथे जमेचा ठरेल, असाही त्यांचा होरा आहे.

‘रणजी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिल्यानंतर मी आयपीएलमध्येही अशी जबाबदारी पार पाडली. आयपीएलचे सामने तर आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणेच होतात. मी स्वतः ज्यावेळी पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून उभा राहिलो, त्यावेळी माझ्यावर दडपण होते. पण, नंतर मी त्यात सरावलो. त्याची मला सवय झाली. आयसीसी इलाईट पॅनेलमध्ये एका रात्रीत संधी मिळत नाही. आपल्या मागील कामगिरीची ती पोचपावती असते. मात्र, यापुढेही आपल्यासमोर सातत्यपूर्ण, बिनचूक पंचगिरी करण्याचे लक्ष्य असणार आहे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

कोटस

‘जागतिक स्तरावरील पंच आणि रेफ्रींसह सातत्याने सर्वोच्च स्तरावर पंच म्हणून काम पाहणे हे माझे प्रदीर्घ कालावधीपासूनचे स्वप्न होते. ते येथे साकार होते आहे’.

-नवनिर्वाचित आयसीसी पंच नितीन मेनन

भारताची प्रतिमा उंचावण्याचे खरे आव्हान

एरवी जागतिक क्रिकेटमधील आतापर्यंतचा इतिहास पाहता, भारतीय पंच आपल्या खराब निवाडय़ामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरत आले आहेत. याशिवाय, त्यांच्या दर्जावरच यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आले आहे. या पार्श्वभूमीवर, नितीन मेनन यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पंच म्हणून काम पाहत असताना भारताची प्रतिमा उंचावण्याचेही खरे आव्हान असणार आहे. स्वतः मेनन यांची मागील काही वर्षातील पंचगिरी अव्वल दर्जाची राहिली असून हे त्यांचे अर्थातच बलस्थान असणार आहे.

Related Stories

विनेश फोगटला सुवर्ण

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा स्वप्नभंग

Patil_p

जेव्हा अवघ्या कोलकाताने अनुभवली माराडोनांची मोहिनी

Omkar B

भारतासमोर आज यजमान न्यूझीलंडचे कडवे आव्हान

Patil_p

वर्ल्ड ऍथलेटिक्सचा 5 लाख डॉलर्सचा निधी

Patil_p

पंकज अडवाणी राष्ट्रीय बिलियर्ड्स चॅम्पियन

Patil_p