Tarun Bharat

निपाणीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

 प्रतिनिधी/निपाणी

निपाणीत कोरोना रुग्णांबरोबरच बळींची संख्या झपाटय़ाने वाढत चालल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 13 ते 22 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला काही व्यावसायिक व नागरिकांनी विरोध देखील केला. त्यामुळे जनता कर्फ्यू हा बंधनकारक न करता स्वेच्छेने करण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.

येथील जुना पीबी रोड, अशोकनगर, दलालपेठ, चाटे मार्केट, बेळगाव नाका या भागात 50 टक्के दुकाने सुरू होती. तर उर्वरित बंद असल्याचे पहायला मिळाले. सुरवातीला विविध व्यापारी असो.च्या झालेल्या बैठकीनुसार जनता कर्फ्यू कडकपणे पाळण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र यापूर्वीही करण्यात आलेले जनता कर्फ्यू तसेच लॉकडाऊनमुळे संसर्ग टाळता आलेला नाही. यातच विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्याचा प्रयत्न अनेक छोटे-मोठे व्यापारी व नागरिक करत आहेत. अशावेळी जनता कर्फ्यू परवडणारा नाही, असे सांगत काही व्यापारी व नागरिकांनी याला विरोध केला होता. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर रविवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नाभिक असो.ने जनता कर्फ्यू कडकपणे पाळत दुकाने बंद ठेवली. तसेच बहुतांशी सराफ दुकाने व घाऊक व्यापाऱयांनीही बंद पाळत जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. तर काही किराणा, हॉटेल्स, गॅरेज व अन्य दुकाने तसेच रिक्षाही सुरू असल्याचे पहायला मिळाले. जनता कर्फ्यूचा निर्णय हा जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आला होता. मात्र सुरक्षेबरोबर उदरनिर्वाहाचा प्रश्नही असल्याने 50 टक्के व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे शहरात पहायला मिळाले.

याबरोबरच निपाणी बाजारपेठेवर अवलंबून असलेले निपाणी परिसरातील ग्रामीण भागातील भाजी, फळविक्रेतेही शहरात दाखल झाले होते. काहींनी संभ्रमावस्थेतून पाठ फिरविली होती. निपाणीतील जनता कर्फ्यूबाबत ग्रामीण भागात संभ्रमावस्था होती. त्यामुळे रविवारी शहरात ग्रामीण भागातून होणारी वर्दळ थंडावल्याचे दिसून आले. त्याचबरोबर बहुतांशी शहरवासियांनीही घराबाहेर पडणे टाळले. त्याचबरोबर रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. यामुळे ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱया नागरिकांनीही पाठच फिरविली होती.

Related Stories

येळ्ळूर संपूर्ण लॉकडाऊन; ग्रा.पं.कडून जनजागृती

Amit Kulkarni

मान्सून कर्नाटकात दाखल

datta jadhav

तळघरातील व्यावसायिकांकडून दुप्पट दंड

Amit Kulkarni

‘उषाताई गोगटे’मध्ये इंटरॅक्ट क्लबची पुनर्रचना

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाडमध्ये जुन्या-नव्यांना संधी

Omkar B

महाराष्ट्राने केलं धाडस, पण बससेवा पुन्हा बंद

Archana Banage