Tarun Bharat

निपाणीत सर्वधर्मियांकडून ‘एकतेचा दीप’

प्रतिनिधी/ निपाणी

जगभरासह देशातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी आरोग्य आणि पोलीस प्रशासन लढा देत आहे. असे असताना देशवासियांमध्ये एकता आणि त्यांचा धीर वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी दीप लावण्याचा संदेश दिला होता. याला निपाणीसह परिसरातील सर्वधर्मियांनी प्रतिसाद देताना एकतेचा दीप लावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कोरोना विरोधात लढणारे आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनासह अन्य विभागातील सेवादुतांसाठी कृतज्ञता म्हणून 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. यादिवशी संपूर्ण देश थांबला होता. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला अनुसरुन अत्यावश्यक सेवेतील दूतांसाठी निपाणीतही घंटानाद, थाळीनाद तसेच टाळय़ांचा गजर झाला. यावेळी सर्वधर्मियांनी एकतेची जूट दाखवून कोरोनाविरोधात लढाईचा निर्धार केला होता. जनता कर्फ्यूला मिळालेला प्रतिसाद व कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने देशभरात 24 मार्च रोजी मध्यरात्री 12 पासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार सर्वत्र लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा देशवासियांना दीपप्रज्वलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार निपाणी शहर व परिसरात रविवारी रात्री 9 वाजता सर्वधर्मियांनी दीपप्रज्वलन तसेच बॅटरी व मोबाईल टॉर्च लावून कोरोनाविरोधातील लढय़ासाठी पुन्हा एकदा एकजूट दाखवली.

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील तबलिगी कार्यक्रमानंतर कोरोनाचा फैलाव गतीने झाल्याच्या अहवालानंतर अनेकांकडून विशिष्ट समाजावर बोट ठेवले जात आहे. मात्र निपाणीकरांनी अशा प्रवृत्तीला अधिक थारा न देता रविवारी सर्वधर्मियांनी दीपप्रज्वलन केले. कोरोना हे देशाबरोबरच जगावर ओढवलेले संकट आहे. अशावेळी काही लोकांच्या चुकांवर बोट ठेवून संपूर्ण समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. तसेच लॉकडाऊनची प्रत्येकाने अंमलबजावणी करणे हे बंधनकारक आहे. अशावेळी धार्मिक अथवा सांप्रदायिक वादाला थारा न देता निपाणीकरांनी रविवारी एकतेचा दीप प्रज्वलित केला.

Related Stories

भुतरामहट्टीत तीन सांबर दाखल

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथील दसरोत्सव साधेपणाने

Patil_p

वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद

Patil_p

कॅसिनोंची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन

Patil_p

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

Patil_p

संकेश्वरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केंव्हा ?

Patil_p