Tarun Bharat

निपाणीत 10 कोरोना पॉझिटिव्ह

वार्ताहर/ निपाणी

चिकोडी विभागासह बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी निपाणी, चिकोडी आणि संकेश्वर शहरात कोरोना रुग्ण सापडण्याची मालिकाच सुरू आहे. निपाणी शहरासह तालुक्यात 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर चिकोडी आणि संकेश्वर शहरातही प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच अथणी शहरात शुक्रवारी एकाच दिवशी 26 जणांना बाधा झाली आहे. तर रायबाग तालुक्यात 8 जणांना लागण झाली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढतच चालली आहे.

निपाणी तालुक्याच्या अहवालानुसार शुक्रवारी ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळला नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुस्कारा सोडला. पण निपाणी शहरासह तालुक्यात मात्र एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजेच 10 रुग्ण सापडले. यामध्ये महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यासह एका बाळंतिणीचा तर दोन भावांचा समावेश आहे. एकाच दिवशी 10 रुग्ण सापडल्याने शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संकेश्वर शहरात सापडलेल्या दोन बाधितांपैकी एक व्यापारी तर अन्य एकजण मजूर असल्याचे समजते. सदर दोघेंचेही होमक्वारंटाईन असताना स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा स्वॅब घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना होमक्वारंटाईन राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिकोडी शहरातील दोघांसह तालुक्यात सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये चिकोडी शहरातील बेपारी गल्लीतील 42 वर्षीय महिलेचा तर जय नगरातील 17 वर्षीय मुलाचा समावेश आहे. याबरोबरच तालुक्यातील पट्टणकुडीच्या माळी गल्लीतील 26 वर्षीय युवती, कागेनमरडी येथील 29 वर्षीय युवकालाही बाधा झाली आहे. याशिवाय याद्यानवाडी संकपाळ मळा, अंकली भाकरी गल्ली आणि मांजरी येथे प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. एकंदरीत चिकोडी तालुक्यातील सातजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोकाक तालुक्यात 11 जणांना कोरोना

घटप्रभा : शुक्रवारी गोकाक तालुक्यातील 11 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली. विशेष म्हणजे यामध्ये गोकाक शहरातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे. ते सर्वजण 15 दिवसांपूर्वी बागलकोट येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अन्य दोघे गोकाक शहर येथील तर कुलगोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर शुक्रवारी गोकाक कोविड सेंटरमधून 10 जणांची मुक्तता करण्यात आली. आतापर्यंत येथे दाखल झालेले 46 पैकी 37 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवून देण्यात आल्याची माहिती डॉ. जगदीश जिंगी यांनी दिली.

Related Stories

दारू दुकाने आजपासून उघडणार

Patil_p

किसान भाजी मार्केट विरोधात आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

पंचायतराज अभियंते विभागाचा मनमानी कारभार

Amit Kulkarni

‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग ट्रक’उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

सर्व दोषींना एकाचवेळी फाशी

Patil_p

शासनाची हमीभाव खरेदी किंमत न परवडणारी

Omkar B