Tarun Bharat

नियतीसमोर थकलेल्या आईची कहाणी

कोकिसरेतील माता : दोन विकलांग मुलांसह सासूच्या उपजीविकेसाठी केविलवाणी धडपड

उज्वल नारकर / वैभववाडी:

नियतीने आपला खरा रंग दाखविला, तर नशीबही अग्निपरीक्षा घेते, असे म्हटले जाते. अशाच दिव्य अग्निपरीक्षेच्या उंबरठय़ावर कोकिसरे-कुंभारवाडी येथील हर्षदा हरिश्चंद्र मोरे या आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाशी सामना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. घरात दारिद्रय़ असतानाही कुटुंबाचा आधार बनलेल्या त्यांच्या पतीला अचानक नियतीने हिरावून घेतले अन् दोन विकलांग मुलांसह अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध सासूची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण, घरात कुणीही कमावता नसल्याने या सर्वांचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा, असा यक्षप्रश्न नियतीच्या दुर्दैवी डावात नशिबाला सावरू पाहणाऱया या मातेसमोर उभा ठाकला आहे.

हर्षदा यांचे पती हरिश्चंद्र मोरे यांचे 26 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले. हरिश्चंद्र हे लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परिस्थितीमुळे हरिश्चंद्र यांना शाळा अर्धवट सोडून मोलमजुरी करावी लागली. त्यांनी वैभववाडी बाजारपेठेतील हार्डवेअर दुकानात काम मिळविले. वडिलांच्या मृत्यूनंतर वृद्ध आई, पत्नी आणि तीन मुले यांचा ते आधार बनले. त्यांची दोन्ही मुले पूर्णतः अपंग आणि मतिमंद. त्यामुळे काम सोडून चालणार नव्हते. लहान वयापासून त्यांनी हार्डवेअर दुकानात प्रामाणिकपणे काम केले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी हर्षदा व कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हर्षदा यांची मोठी मुलगी विद्या ही पूर्ण अपंग आहे. कमरेखाली तिला काहीच अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे तिची पूर्ण सुश्रुषा आई हर्षदा यांनाच करावी लागते. दुसऱया व्यक्तीच्या आधाराशिवाय विद्या काहीच करू शकत नाही. दुसरी मुलगी तन्वी ही यावर्षी दहावीत शिकत आहे. मुलगा दिव्येश हा पूर्णतः मतिमंद आहे. त्याला वडिलांचं निधन झाले, याचीही जाण नाही. त्यांची 88 वर्षीय सासू अंथरुणाला खिळून आहे. घरात पुरुष व्यक्ती नसल्याने कमावता कोणीच नाही. कुटुंबाच्या अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडून मोलमजुरी करणेही दुर्दैवी हर्षदा यांना शक्मय नाही.

नशिबाचे भोग संपता संपेना!

व्यंग घेऊन जन्मलेली मुले डॉक्टरच्या उपचाराने बरी होऊन किमान स्वतःची काही तरी जबाबदारी उचलतील, या अपेक्षेने हर्षदा व त्यांचे पती हरिश्चंद्र यांनी राज्यातील अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजविले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

आर्थिक मदतीची गरज

मुलांच्या शारीरिक व्यंगात आणि पतीच्या अचानक झालेल्या निधनाने हर्षदा या मानसिकदृष्टय़ा खचून गेल्या आहेत. पतीच्या निधनामुळे त्यांनी कुटुंबाचा आधारच गमवला आहे. सध्या या कुटुंबाला स्वमालकीचे छोटेसे छत असले, तरी प्रपंचासाठी आर्थिक बाजू नाही. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. समाज मन हळवे असते. परिस्थितीने गांजलेल्या अनेक कुटुंबांना समाजातील दानशूर व्यक्तींनी उभे केले आहे. हर्षदा मोरे व त्यांच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक बळ देण्याची गरज आहे. मदतीसाठी बँक खात्याचा तपशील- बँक ऑफ इंडिया, शाखा वैभववाडी, A/C – 142510110006301, IFSC – BKID0001425.

Related Stories

दिवाकर मावळणकर यांना गोवा शासनाकडून स्टार फार्मर पुरस्कार

Anuja Kudatarkar

लोकशाहीचे भवितव्य तरुणांच्या हाती!

NIKHIL_N

तब्बल 45 दिवसानंतर मालवण बाजारपेठ उघडणार

NIKHIL_N

महाड एमआयडीसीमधील मल्लक कंपनीला भीषण आग

Patil_p

आजपासून घुमणार शिमग्याचा ढोल..!

Patil_p

बाळा नांदगावकरांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

Anuja Kudatarkar