Tarun Bharat

निरोगी शरीर-आनंदी मन ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

बेळगाव / प्रतिनिधी

आयुष्य जगताना अनेक चढ-उतार येत असतात. परंतु अपयशाने खचून न जाता यशाचा मार्ग शोधला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित विचार करतो आणि त्याच्यातूनच खचत जातो. त्यामुळे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्यास आयुष्य खूप सुंदर होऊ शकते. लोक काय म्हणतील, हा एकच विचार घेऊन आपण अनेक स्वप्नांची माती करतो. आनंदी मन आणि निरोगी शरीर हे आपले आयुष्य समृद्ध करू शकतात आणि हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सेंट्रल टॅक्स (अपील्स) बेळगावचे कमिशनर सुरेंद्रकुमार मानकोसकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. त्यांनी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर मंगळवारी गोगटे रंगमंदिर येथे आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर व सहकार्यवाहक आय. जी. मुचंडी उपस्थित होते.

आपण समाजामध्ये वावरत असताना घराकडे मात्र दुर्लक्ष करतो. आपला मुलगा-मुलगी आपली कौतुकाची एक थाप मिळविण्यासाठी वाट पहात असतात. पण आपण मात्र दुसऱयांच्या मुलांची वाहव्वा करत असतो. 15 ते 25 या वयोगटात ज्यांच्याशी संगत होते, ती त्या मुलाचे भवितव्य घडवत असतात. आयुष्यामध्ये आई व पत्नी या दोन महिलांना विशेष महत्त्व असते. कारण प्रत्येक सुख:-दु:खात या दोन्ही स्त्रिया पुरुषाच्या मागे खंबिरपणे उभ्या असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.

आयुष्य जगताना आपल्यासाठीही वेळ काढा, फिरा, मनसोक्त जगा, जवळचा मित्र, कुटुंबीय भेटले तर गळाभेट घ्या, सगळे हेवेदावे गळून पडतील. नकळत झालेली चूक माफी मागून संपवा. बघा आयुष्य आनंदी होते की नाही. अशा शब्दात मानकोसकर यांनी अनेक प्रसंग सांगून आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले.

Related Stories

वाहतूक मार्गात उद्या बदल

Amit Kulkarni

राष्ट्रपुरुषांच्या अवमानामागे सुनियोजित षड्यंत्र?

Patil_p

वीज कोसळून दोघा जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

रेबीज लसच उपलब्ध नसल्याने संताप

Patil_p

साखर आयुक्तांकडून एफआरपी दर जाहीर

Patil_p

अर्धवट गटारीच्या कामामुळे दलदलीचे साम्राज्य

Amit Kulkarni