Tarun Bharat

निवडणूक संदर्भात कागदपत्रे देण्यास टोलवाटोलवी

न्यायालयात जावू नये, याकरिता मनपा अधिकाऱयांचा आटापीटा

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका निवडणूक पारदर्शी झाली नसल्याचा आरोप होत आहे. याविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी करण्यात आल्या असून काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. नागरिकांनी विविध कागदपत्रांसाठी अर्ज केले आहेत. पण अधिकाऱयांकडून सहकार्य मिळत नाही. नागरिकांना न्यायालयात जाता येवू नये, याकरिता आवश्यक कागदपत्रे देण्यास महापालिकेकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. 

महापालिका निवडणूक व्हीव्हीपॅट नसताना घेतल्याने ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी करण्यात आल्या असून काहींनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रिया रद्द करावी व नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. निवडणुकीवेळी मतदारयादीतील नावे गहाळ झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांकडे दररोज तक्रारी होत आहेत. काही मतदारसंघातील मतदारांची नावे ऐनवेळी अन्य वॉर्डात घालण्यात आली. काही वॉर्डांमधील मतदारांची नावे गायब होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱयात सापडली आहे. यापूर्वी शहरवासियांना अंधारात ठेवून वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली होती. वॉर्ड पुनर्रचनेबाबत शहरवासियांनी आक्षेप घेऊ नये, याकरिता जिल्हय़ाबाहेरील वृत्तपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा कारनामा महापालिकेच्या अधिकाऱयांनी केला होता. आता निवडणूक प्रक्रियेवेळीदेखील मनपाच्या काही अधिकाऱयांनी मतदारयादीत घोळ घातला आहे.

तसेच मतदानावेळी मतदान यंत्रांसोबत व्हीव्हीपॅट मशीन बसविण्याची मागणी करूनदेखील व्हीव्हीपॅट नसताना मतदान घेण्यात आले. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पारदर्शी झाली नसल्याची टीका होत आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी काहींनी महापालिकेकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र सदर कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगून निवडणूक विभागाकडून घेण्याची सूचना अर्जदारांना करण्यात येत आहे. पण महापालिकेकडून या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असताना नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकाऱयांनी चालविला असल्याची टीका होत आहे.

निकालाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणे बंधनकारक आहे. पण न्यायालयात जावू नये, याकरिता कागदपत्रे देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणे, कागदपत्रे देण्यास टोलवाटोलवी करण्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकाऱयांनी चालविल्याची तक्रार होत आहे. नागरिकांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता महापालिका आयुक्तांनी वेळेवर करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

हनुमान नगर येथे मंदिरात चोरी

Patil_p

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून तयारी

Amit Kulkarni

विश्वशांती संदेश देण्यासाठी शुभम साकेचा बेळगाव-गोवा सायकल प्रवास

Amit Kulkarni

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक

Omkar B

आयटीआय कॉलेजमध्ये टाटा टेक्निकल लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni

बेकायदेशीर वाढविलेला कर भरू नका

Patil_p