Tarun Bharat

निसटत्या विजयासह दिल्लीचे अव्वलस्थान भरभक्कम

Advertisements

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध सलग चौथा विजय

दुबई / वृत्तसंस्था

हेतमेयरच्या (18 चेंडूत नाबाद 28) धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध 3 गडी राखून निसटता विजय संपादन केला आणि 20 गुणांसह आपले अव्वलस्थान आणखी भरभक्कम केले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 136 अशी किरकोळ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, अनेक अडथळे आल्यानंतरही त्यावर यशस्वी मात करत दिल्लीने विजय खेचून आणला.

137 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना शेवटच्या 3 षटकात 28 धावांची गरज होती आणि यावेळी गयानाच्या हेतमेयरचा खेळ उत्तम बहरला. हेतमेयरने ब्रेव्होच्या षटकात 12 तर हॅझलवूडच्या षटकात 10 धावा फटकावल्या आणि यामुळे शेवटच्या षटकात 6 धावा, असे समीकरण झाले. ब्रेव्होच्या शेवटच्या षटकात दिल्लीने धडाकेबाज विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयासाठी 137 धावांचे माफक आव्हान असताना शॉ (18), अय्यर (2), रिषभ पंत (15), रिपल पटेल (18) स्वस्तात बाद झाले. धवनने एक बाजू लावून धरत 35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 39 धावांची खेळी साकारली. अंतिम टप्प्यात अश्विन (2), अक्षर (5) स्वस्तात बाद झाले. पण, हेतमेयरने विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रबाडा 1 चेंडूत 4 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी चतुरस्त्र मारा साकारत चेन्नईला 20 षटकात 5 बाद 136 धावांवर रोखून धरले. अम्बाती रायुडूने 55 धावांची नाबाद खेळी साकारली असली तरी यानंतरही चेन्नईला मोठी धावसंख्या रचण्यात अजिबात यश आले नाही.

रायुडूने ऍनरिच नोर्त्झेला पॉईंटच्या दिशेने चौकारासाठी फटकावत अर्धशतक साजरे केले व त्यानंतर लगेच डीप एक्स्ट्रा कव्हरवरुन खणखणीत षटकार वसूल केला. या 19 व्या षटकात चेन्नईने 14 धावा वसूल केल्या. मात्र, अवेश खानने शेवटच्या षटकात केवळ 4 धावा देताना महेंद्रसिंग धोनीचा बळी घेतला. धोनीने 18 धावा केल्या असल्या तरी यासाठी त्याने 27 चेंडू घेतले. त्याच्या खेळीत एकही चौकार किंवा षटकार समाविष्ट नव्हता.

रायुडूने आपली 43 चेंडूंची खेळी 5 चौकार, 2 षटकारांसह सजवली. दिल्लीतर्फे केवळ नोर्त्झे महागडा गोलंदाज ठरला. त्याने डावातील पहिल्याच षटकात 16 धावा बहाल केल्या आणि त्यातील 9 धावा लेगबाय व वाईडच्या माध्यमातून आल्या. ऋतुराज गायकवाडला प्रारंभीच पायचीत दिले गेले होते. पण, त्याने पंचांच्या या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेतला आणि चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जात असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले व हा निर्णय बदलला गेला.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरील या लढतीत फॅफ डय़ू प्लेसिसने 2 चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली होती. पण, अक्षरने त्याला अय्यरकरवी झेलबाद केले. चेंडू बराच स्विंग होत असला तरी याचा दिल्लीला प्रारंभी लाभ घेता आला नव्हता. नंतर अक्षर पटेलने ही कोंडी फोडत प्लेसिसला डीप मिडविकेटवरील अय्यरकरवी झेलबाद केले. बहरातील ऋतुराजने रबाडाचे स्ट्रेट ड्राईव्हने स्वागत केले. मात्र, नोर्त्झेने पाचव्या षटकात गायकवाडला अश्विनकरवी झेलबाद केले. चेन्नईने पॉवर प्ले षटकात 2 बाद 48 तर 10 षटकात 4 बाद 69 पर्यंत मजल मारली होती. शेवटच्या 10 षटकात त्यांना 67 धावा जमवता आल्या.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. अश्विन, गो. नोर्त्झे 13 (13 चेंडूत 2 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. अय्यर, गो. अक्षर 10 (8 चेंडूत 2 चौकार), रॉबिन उत्थप्पा झे. व गो. अश्विन 19 (19 चेंडूत 1 चौकार), मोईन अली झे. अय्यर, गो. अक्षर पटेल 5 (8 चेंडू), अम्बाती रायुडू नाबाद 55 (43 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), महेंद्रसिंग धोनी झे. पंत, गो. अवेश 18 (27 चेंडू), रविंद्र जडेजा नाबाद 1 (2 चेंडू). अवांतर 15 (लेगबाईज 5, वाईड 10). एकूण 20 षटकात 5 बाद 136.

गडी बाद होण्याचा क्रम

1-28 (प्लेसिस, 2.4), 2-39 (ऋतुराज, 4.4), 3-59 (मोईन अली, 7.4), 4-62 (उत्थप्पा, 8.3), 5-132 (धोनी, 19.1).

गोलंदाजी

ऍनरिच नोर्त्झे 4-0-37-1, अवेश खान 4-0-35-1, अक्षर पटेल 4-0-18-2, कॅगिसो रबाडा 4-0-21-0, रविचंद्रन अश्विन 4-0-20-1.

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. प्लेसिस, गो. चहर 18 (12 चेंडूत 3 चौकार), शिखर धवन झे. अली, गो. शार्दुल 39 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर झे. गायकवाड, गो. हॅझलवूड 2 (7 चेंडू), रिषभ पंत झे. अली, गो. जडेजा 15 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रिपल पटेल झे. चहर, गो. जडेजा 18 (20 चेंडूत 2 चौकार), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. शार्दुल 2 (3 चेंडू), शिमरॉन हेतमेयर नाबाद 28 (18 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल झे. अली, गो. ब्रेव्हो 5 (10 चेंडू), रबाडा नाबाद 4 (1 चेंडूत 1 चौकार). अवांतर 8 (लेगबाईज 1, वाईड 7). एकूण 19.4 षटकात 7 बाद 139.

गडी बाद होण्याचा क्रम

1-24 (शॉ, 2.3), 2-51 (अय्यर, 5.3), 3-71 (पंत, 8.5), 4-93 (रिपल, 12.5), 5-98 (अश्विन, 14.1), 6-99 (धवन, 14.6), 7-135 (अक्षर पटेल, 19.3).

गोलंदाजी

दीपक चहर 3-0-34-1, जोश हॅझलवूड 4-0-27-1, रविंद्र जडेजा 4-0-28-2, मोईन अली 3-0-16-0, शार्दुल 4-0-13-2, ब्रेव्हो 1.4-0-20-1.

के. गौतमने झेल सोडला आणि नामी संधी दवडली!

शिमरॉन हेतमेयरने दिल्लीला सामना जिंकून देण्यापूर्वी त्याला नशिबाची दोन-एकवेळा उत्तम साथ लाभली. यात बदली खेळाडू या नात्याने मैदानावर आलेल्या लाँगऑनवरील के. गौतमने हेतमेयरचा सोडलेला झेल चेन्नईला फटका देणारा ठरला. कॅपिटल्सला त्यावेळी 16 चेंडूत 22 धावांची गरज होती. हेतमेयरने या संधीचा पुरेपूर लाभ घेत विजय खेचून आणला.

Related Stories

भारत ‘अ’च्या पहिल्या डावात गायकवाडचे शतक

Amit Kulkarni

स्पर्धकांना पूर्ण वेळ मास्कची सक्ती

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी अनिर्णीत

Patil_p

रोममधील कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

प्रो कबड्डी लीग : तामिळ थलैवाज, जयपूर पिंक पँथर्स विजयी

Patil_p

रामकुमार रामनाथनचे आव्हान समाप्त

Patil_p
error: Content is protected !!