लंडन उच्च न्यायालयाने अपील अर्ज फेटाळला , तोंडी अपील करण्यासाठी पाच दिवसांची मुदत
लंडन / वृत्तसंस्था
फरार नीरव मोदीचा भारतात प्रत्यार्पण थांबविण्याचा अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या आदेशाविरुद्ध अपील करण्याच्या परवानगीसाठी नीरवने लंडन उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. लंडन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे सदर अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे आता नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पण होण्याच्या हालचालींना गती मिळू शकते. यापूर्वी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात नीरव मोदीचा अर्ज फेटाळला होता.
लंडन उच्च न्यायालयाने नीरव मोदीचे अपील फेटाळले असले तरी पुन्हा उच्च न्यायालयात संक्षिप्त तोंडी (ओरल) दाद मागत सुनावणी पुढे चालू ठेवण्याची संधी मिळू शकते. या पुढील प्रक्रियेसाठी त्याच्याकडे फक्त पुढील पाच दिवसांची मुदत असणार आहे. या पाच दिवसांमध्ये त्याने तोंडी दाद मागितल्यास न्यायालय पुन्हा एकदा त्याच्या मागणीचा विचार करू शकते. मात्र, तज्ञांच्या दाव्यानुसार त्याची तोंडी मागणीही न्यायालय फेटाळण्याची शक्यताच अधिक आहे.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नीरवच्या प्रत्यार्पणावरील शेवटची सुनावणी ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात झाली होती. यावेळी नीरवला भारतात पाठविण्यास कोर्टाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर 15 एप्रिल रोजी ब्रिटनच्या गृहसचिव प्रिती पटेल यांनीही नीरवच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले. आता लंडन हायकोर्टाच्या निर्णयामुळे नीरवला भारतात आणण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. नीरव मोदी याच्यावर पीएनबी बँकेची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.