Tarun Bharat

नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन पाचव्यांदा विश्वविजेता

Advertisements

रशियन आव्हानवीर इयान नेपोम्नियाचीची सपशेल निराशा

दुबई / वृत्तसंस्था

नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने रशियन आव्हानवीर इयान नेपोम्नियाचीविरुद्ध चौथा डाव जिंकत अगदी थाटात सलग पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी झालेल्या 11 व्या फेरीत कार्लसनने 3 तास 21 मिनिटांत 49 चालीअखेर नेपोम्नियाचीला हार मान्य करणे भाग पाडले. 31 वर्षीय कार्लसनच्या खात्यावर आता सलग 5 जगज्जेतेपदे नोंद झाली आहेत. यातील पहिले विजेतेपद त्याने 2013 मध्ये जिंकले आहे.

दुबईत रंगलेल्या यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कार्लसन व नेपोम्नियाची यांच्यातील पहिल्या पाच लढती अनिर्णीत राहिल्या. त्यानंतर सहावी विक्रमी आठ तास चाललेली लढत कार्लसनने 136 चालीत जिंकली आणि तिथूनच त्याच्यासाठी विजयाचा राजमार्ग जणू खुला झाला. त्यानंतर कार्लसनने 7.5-3.5 अशा मोठय़ा फरकाने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सहावी फेरी गमावल्यानंतर पुढील 5 फेऱयात तीनवेळा नेपोने ब्लंडर केले आणि यामुळे 11 व्या फेरीतच कार्लसनने जेतेपदावर मोहोर उमटवली.

शुक्रवारी सायंकाळी रंगलेल्या 11 व्या फेरीत बरोबरीची स्थिती होती. पण, इयान नेपोम्नियाचीने मोक्याच्या क्षणी घोडचूक केली आणि याचा कार्लसनने लाभ घेतला नसता तरच नवल होते. नेपोने इटालियन ओपनिंगला पसंती दिली. पण, 23 व्या चालीवर केलेली चूक त्याला पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली. काळय़ा मोहऱयांनी खेळताना कार्लसनचा हा दुसरा विजय होता.

मॅग्नसने 2013 साली पहिले विश्वविजेतेपद संपादन केले आणि आता 2023 साली पुढील लढत होणार असल्याने तो दशकभर चॅम्पियन राहिल्याचे अधोरेखित होईल. 14 फेऱयांच्या या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वप्रथम 7.5 गुण संपादन करणारा ग्रँडमास्टर चॅम्पियन ठरतो. मॅग्नसने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली.

नेपोम्नियाचीने 23 व्या चालीला ब्लंडर नोंदवला आणि योजनाबद्ध खेळासह कार्लसनने 49 व्या चालीला विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्लसनने अवघ्या 79 व्या सेकंदाला नेपोम्नियाचीच्या 23 व्या चालीवरील ब्लंडरचा लाभ घेण्यासाठी आपली चाल खेळली आणि वजिरावजिरी करत विजय आणखी सोपा केला. एण्ड गेमच्या दिशेने खेळ सरकत असताना त्याच्याकडे एक प्यादे जादा होते.

या चॅम्पियनशिपमधील एकापाठोपाठ एक ब्लंडरमुळे स्वतः नेपो देखील स्तंभित दिसून आला. कार्लसनने जेतेपद कायम राखण्याची ही सलग चौथी वेळ ठरली. 2013 मध्ये आनंदला नमवत सर्वप्रथम जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याने आनंद (2014), सर्जेई कर्जाकिन (2016), फॅबिओ कारुआना (2018) व नेपो (2021) यांचे आव्हान मोडीत काढले आहे.

Related Stories

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्णपदक

Archana Banage

चेन्नईचा जाता जाता पंजाबलाही धक्का!

Patil_p

विराट, रोहित, अश्विनचे पहिल्या दहातील स्थान कायम

Amit Kulkarni

टाटा ओपन स्पर्धेत दुहेरीत लिअँडर पेस, मॅथ्यू एबडन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Patil_p

थिएम उपांत्यपूर्व फेरीत, नदाल शेवटच्या 16 खेळाडूंत

Amit Kulkarni

पीटी उषाचे प्रशिक्षक ओ. एम. नाम्बियार यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!