विम्बल्डन टेनिस : सोफिया केनिन, व्हीनस विल्यम्स, स्विटोलिना स्पर्धेबाहेर, मुगुरुझा, ब्रेन्गल, लिनेट, स्वायटेक, स्टीफेन्सची आगेकूच
वृत्तसंस्था /विम्बल्डन


सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, ब्रिटनचा अँडी मरे, फ्रान्सेस टायफो, सेबॅस्टियन कोर्दा, फॅबिओ फॉगनिनी, गार्बिन मुगुरुझा, स्लोअन स्टीफेन्स, इगा स्वायटेक यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली तर आर्यना साबालेन्का, एलेना ओस्टापेन्को, व्हिक्टोरिया अझारेन्का, मारिन सिलिक, फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, टेलर फ्रिट्झ यांनी दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या सोफिया केनिन व व्हीनस विल्यम्स, तसेच एलेना स्विटोलिना यांचे आव्हान मात्र दुसऱया फेरीत समाप्त झाले.


अग्रमानांकित जोकोविचने केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-3 असा पराभव केला तर किर्गीओसने 21 व्या मानांकित युगो हम्बर्टचे आव्हान 6-4, 4-6, 3-6, 6-1, 9-7 असे संपुष्टात आणले. सोमवारी व मंगळवारी पावसाच्या व्यत्ययामुळे अनेक सामने तहकूब ठेवावे लागले होते. ब्रिटनच्या मरेने तिसरी फेरी गाठताना पात्रता फेरीतून आलेल्या ऑस्कर ओटेचा 6-3, 4-6, 6-4, 6-2 असा पराभव केला. जर्मनीच्या चौथ्या मानांकित व्हेरेव्हने टेनीस सँडगेनवर 7-5, 6-2, 6-3 अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये सँडग्रेनने बऱयापैकी प्रतिकार करीत 5-5 अशी बरोबरी साधली होती. पण त्यानंतर व्हेरेव्हनेच पूर्ण वर्चस्व राखत ही लढत एकतर्फी जिंकली. त्याची लढत टेलर फ्रिट्झ किंवा स्टीव्ह जॉन्सन यापैकी एकाशी होणार आहे.
केनिन, व्हीनसचे आव्हान समाप्त


महिला एकेरीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिन व व्हीनस विल्यम्स यांचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले. केनिनला तिच्याच देशाच्या मॅडिसन ब्रेन्गलने 6-2, 6-4 असे नमविले. माजी विजेत्या गार्बिन मुगुरुझाने तिसरी फेरी गाठताना डचच्या लेस्ली केरखोव्हचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला. मुगुरुझाने ही स्पर्धा 2017 मध्ये जिंकली होती. गेल्या वर्षी प्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱया सातव्या मानांकित इगा स्वायटेकने रशियाच्या व्हेरा व्होनारेव्हाचा 6-1, 6-3 असा पराभव केला. अमेरिकेच्या स्टीफेन्सने सहाव्यांदा तिसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या क्रिस्टी आनला 7-5, 6-3 असे नमविले. पावसामुळे लांबलेल्या सामन्यात व्हिक्टोरिया अझारेन्काने युक्रेनच्या कॅटरीना कोझलोव्हावर 6-1, 6-3 अशी मात केली. डब्ल्यूटीए स्पर्धा जिंकणारी अरबची पहिली महिला टेनिसपटू ऑन्स जेबॉरने पहिल्यांदाच या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली असून तिने पाचवेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्सला 7-5, 6-0 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. व्हीनस आता मिश्र दुहेरीत किर्गीओसमवेत खेळताना दिसेल. जेबॉरची लढत मुगुरुझाशी होणार आहे. अन्य सामन्यात ऍश्ले बार्टीने ऍना ब्लिन्कोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.
लॅटव्हियाच्या बिग हिटर म्हणून ओळखल्या जाणाऱया ओस्टापेन्कोने कॅनडाच्या लेलाह फर्नांडेझवर 6-1, 6-2 अशी सहज मात करीत दुसरी फेरी गाठली. जागतिक पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनानेही दुसरी फेरी गाठताना तिने बेल्जियमच्या ऍलिसन व्हान उत्वांकवर 6-3, 2-6, 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. मात्र दुसऱया फेरीत पोलंडच्या मॅग्डा लिनेटने स्विटोलिनाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. रशियाच्या पावल्युचेन्कोव्हानेही तिसरी फेरी गाठताना क्रिस्टीना प्लिस्कोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला.
सानिया मिर्झा-बेथनी मॅटेक सँड्स यांचा सहाव्या मानांकितांना धक्का


महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व अमेरिकेची बेथनी मॅटेक सँड्स यांनी सहाव्या मानांकित डेसायरे क्रावझीक व ऍलेक्सा ग्वाराशी यांना पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. सानिया-बेथनी यांनी प्रतिस्पर्ध्यावर 7-5, 6-3 अशी सुमारे दीड तासाच्या लढतीत मात केली. पहिल्या सेटमध्ये डेसायरे-ऍलेक्सा यांनी कडवा प्रतिकार केला. पण एकदा लय मिळाल्यावर सानिया-बेथनी यांनी सहज विजय मिळविला. भारताची अंकिता रैनाही अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिससमवेत दुहेरीत खेळत असून भारताच्या दोन महिला या स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2005 पासून सानिया मिर्झा ही एकमेव खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करीत आली होती.