Tarun Bharat

नौदलाला मिळणार सहा अत्याधुनिक पाणबुडय़ा

50 हजार कोटींची तरतूद – नौदलाची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय नौदलाची ताकद वाढविण्यासाठी नजिकच्या काळात सहा अत्याधुनिक पाणबुडय़ा बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय नौदलासाठी प्राप्त होणाऱया या पाणबुडय़ा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असून मुंबईतील माझगाव डॉकवर त्यांची निर्मिती केली जाणार आहे. या पाणबुडय़ांच्या माध्यमातून चीन-पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांशी लढा देण्यास मोठा हातभार लागणार आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘प्रोजेक्ट 75-इंडिया’ (75-आय) अंतर्गत 6 अत्याधुनिक पाणबुडय़ांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला पाणबुडय़ांचा प्रकल्प पुढे जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पाणबुडीच्या निर्मितीचे हे काम माझगाव डॉक लिमिटेड आणि एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात येणार असल्याचे समजते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नौदलासाठी या पाणबुडय़ा निर्मिती करण्यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

भारताकडे सध्या एकूण 140 युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. तर पाकिस्तानकडे फक्त 20 युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारताला संरक्षणावर भर द्यावा लागणार आहे. तसेच समुद्र क्षेत्रात अधिक शक्तिशाली होण्याची गरज असल्याने आगामी काळात नौदलाची ताकद वाढविण्याची योजना भारताने केली आहे.

‘प्रोजेक्ट 75-इंडिया’ अंतर्गत निर्मिती

समुद्री ताकद वाढविण्यासाठी भारतीय नौदलाने ‘75-आय’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात 6 पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यांचा आकार सध्याच्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुडीपेक्षाही पाच पटीने मोठा असेल. या पाणबुडय़ा डिझेल आणि इलेक्ट्रिक असणार आहेत. प्रकल्पाच्या सद्यस्थितीनुसार पहिली पाणबुडी तयार होण्यासाठी किमान सहा ते सात वर्षे लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच सर्व पाणबुडय़ा नौदलाच्या ताफ्यात येण्यासाठी किमान 12 ते 13 वर्षे लागतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग

Amit Kulkarni

‘आयर्न मॅन’ नायिकेजवळ कोरोनाचा रामबाण उपाय?

Patil_p

दिल्लीतील कोरोना : दीड महिन्यानंतर समोर आले सर्वात कमी नवे रुग्ण

Tousif Mujawar

‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

Patil_p

वैदिक काळातील कायदे शिकणार विद्यार्थी

Patil_p