Tarun Bharat

न्यायालयात दाद मागणार

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याचा सूर :  व्हीव्हीपॅट नसल्याने मतदान प्रक्रियेबाबत संशय

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका निवडणुकीवेळी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणीपर्यंत असंख्य त्रुटींचा सामना मतदार आणि उमेदवारांना करावा लागला. मतदानावेळी मतदार यादीमधून गायब झालेली नावे, काही मतदान केंद्रांवर झालेले बोगस मतदान, ढिसाळ नियोजन व व्हीव्हीपॅटची उणीव अशा विविध कारणांमुळे महापालिकेची निवडणूक पारदर्शी झाली नसल्याचा सूर मतदार आणि उमेदवारांमधून उमटला. प्रशासनाच्या नियोजनाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय मतदार व उमेदवारांनी घेतला आहे.

मनपा निवडणुकीच्या अनपेक्षित व धक्कादायक निकालाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. निवडणूक पारदर्शी झाली नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सोमवारी रात्री करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीची घोषणा 11 ऑगस्ट रोजी झाली. त्याकरिता 3 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवार दि. 6 रोजी मतमोजणी प्रक्रिया झाली असून या दरम्यान अनेक त्रुटींचा सामना मतदार आणि उमेदवारांना करावा लागला. महापालिका निवडणुकीत पारदर्शीपणा राहिला नाही. त्यामुळे लोकशाहीवरचा नागरिकांचा विश्वास उडाला आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक अशा अडचणी निर्माण केल्या असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. घिसाडघाईने निवडणूक जाहीर करण्यात आल्याने प्रत्येक वॉर्डमधील मतदारांची नावे गहाळ झाली होती. काही मतदारांची नावे अन्य वॉर्डमध्ये समावि÷ करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदान केंद्रात देखील बदल करण्यात आल्याने मतदारांची गैरसोय झाली होती. त्यामुळे ही प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला.

निवडणूक अधिकाऱयांकडून उमेदवारांची दिशाभूल

उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यवस्थित माहिती देण्यात आली नाही. उमेदवारांसह सूचकांचे ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट उमेदवारी अर्जासोबत जोडण्याची सूचना  काही वॉर्डच्या निवडणूक अधिकाऱयांनी केली होती. तर काही ठिकाणी केवळ उमेदवाराकडून ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट घेण्यात आले होते. पाच वॉर्डांसाठी एक या प्रमाणे बारा निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रत्येक निवडणूक अधिकारी वेगवेगळी माहिती देऊन उमेदवारांची दिशाभूल करीत होते. याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या होत्या. त्यामुळे ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट आणि सर्टिफाईड मतदार यादीचा मुद्दा स्पष्ट झाला होता. ऐनवेळी मतदारांची नावे अन्य वॉर्डात समावि÷ करण्यात आली. यापैकी काही मतदारांनी उमेदवाराचे सूचक म्हणून  सही केली होती. त्यामुळे सदर अर्ज अवैध करणे आवश्यक होते. पण सदर अर्ज वैध ठरवून निवडणूक लढविण्यास मुभा दिली. अशा प्रकारचा गैरप्रकार झाल्याची माहिती बैठकीवेळी एका उमेदवाराने दिली.

मतदार यादीतून नावे गायब

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रियेवेळी देखील शासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. प्रत्येक ठिकाणी मतदार आणि उमेदवारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मतदाना दिवशी अनेक नागरिक नेहमीप्रमाणे मतदानासाठी बूथवर गेले असता त्या ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याचे आढळून आले. अन्य ठिकाणी मतदार यादीत शोध घेतला असता नाव आले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच 24 क्रमांकाच्या वॉर्डमधील मतदारांचा समावेश 16 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये समावि÷ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच हनुमान नगर येथील 800 हून अधिक मतदारांची नावे गहाळ करण्यात आल्याची तक्रार झाली. वडगाव येथील एका बूथवर एक महिला मतदानासाठी गेली असता त्या ठिकाणी मतदान झाले असल्याचे सांगून परत पाठविण्यात आले त्यामुळे सर्रास मतदान केंद्रांवरील अधिकाऱयांना मॅनेज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान

तसेच नागरिकांनी मतदान केल्यानंतर मतदान यंत्रातून बीपचा आवाज आला नाही. अशाप्रकारे काहीवेळ झाल्यानंतर काही मतदारांनी बीपचा आवाज का येत नाही अशी विचारणा निवडणूक अधिकाऱयांकडे केली असता मतदान यंत्र बंद असल्याचे सांगण्यात आले. अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. घरच्या सदस्यांनी मतदान करूनही त्या बूथमधून कमी मतदान झाल्याचे आढळून आल्याने आश्चर्याचा धक्का बसल्याची तक्रार एका उमेदवाराने यावेळी केली. अशा प्रकारे असंख्य त्रुटी निदर्शनास आल्या. सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याची टीका करण्यात आली. याबाबत सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

 व्हीव्हीपॅट यंत्रणा का बसविली नाही?

इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले होते. पण याबाबत दखल घेण्यात आली नाही. व्हीव्हीपॅट यंत्रणा का बसविली नाही अशी विचारणा निवडणूक अधिकाऱयांना केली असता राज्य निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅट लावण्याचा आदेश आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक पारदर्शी नसल्याचे सिद्ध झाले आहे. सदर निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय उमेदवारांसह शहरातील मतदारांनी घेतला आहे. त्याकरिता तयारी सुरू असून लवकरच याबाबत याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नियमावलीचे पालन नाही…

महापालिका निवडणूक सदोष असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे पालन करण्यात आले नाही. वास्तविक पाहता मतदान यंत्राद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी उमेदवारांना बॅलेट युनिट आणि सीपीयू युनिटची माहिती देणे बंधनकारक आहे. एकाही उमेदवाराला ही माहिती निवडणूक अधिकाऱयांनी दिली नाही. लोकशाहीनुसार या निवडणुका घेतल्या जातात. पण या निवडणुकीत पारदर्शीपणा नसल्याने लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचे दिसून आले आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका होत असल्याने या विश्वासावरच सर्व निवडणुका होत असतात. पण महापालिका निवडणुकीत झालेल्या प्रकारामुळे लोकशाहीचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याची असून, याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे आम आदमी पार्टीचे अरविंद कपाडिया यांनी सांगितले. लोकशाहीवरील विश्वास राखण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला असल्याचेही कपाडिया यांनी स्पष्ट केले.

Related Stories

खानापूर तालुक्यात आणखी 8 कोरोनाबाधित

Patil_p

मुरुगेश निरानी; कर्नाटकच्या मुख्यमंत्री यादीतील नवीन नाव

Abhijeet Khandekar

भाजीपाल्याचे दर स्थिर; मागणीत वाढ

Patil_p

Kantara : कंतारा स्टार ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन

Abhijeet Khandekar

सर्व्हिस रस्ता की मद्यपी रोड?

Amit Kulkarni

बेभान होऊन काम करण्याची गरज

Amit Kulkarni
error: Content is protected !!