मालवण पोलीस ठाण्यासमोरच वृद्धाकडून कीटकनाशक प्राशन
वार्ताहर / मालवण:
गावातून बहिष्कृत केल्याची तक्रार मालवण पोलीस स्टेशनमध्ये देणाऱया आनंदव्हाळ कातवड येथील विठ्ठल अनंत घाडी (75) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच कीटकनाशक प्राशन केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अचानक घडलेल्या या घटनेने पोलीस स्टेशनच्या आवारात एकच गोंधळ उडाला. एका पोलीस कर्मचाऱयाने विठ्ठल घाडी यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्या हातातील कीटकनाशकाची बाटली काढून घेतली. त्यानंतर घाडी यांना तात्काळ रिक्षेने मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु घाडी यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, वर्षभरापूर्वी विठ्ठल घाडी यांनी आपल्याला गावातून बहिष्कृत केल्याचा तक्रार अर्ज मालवण पोलीस स्थानकात दिला होता. त्यानुसार मालवण पोलिसांनी आनंदव्हाळ येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत ग्रामस्थांनी गावात कोणालाही वाळीत टाकले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सदर अर्ज निकाली काढण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी घाडी हे पोलीस स्थानकात पुन्हा तक्रार अर्ज देण्यासाठी आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी घाडी हे मालवण पोलीस स्टेशनच्या परिसरात आले व त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. पोलीस कर्मचाऱयाला या घटनेची माहिती मिळताच त्याने घाडी यांच्याकडील कीटकनाशकाची बाटली काढून घेतली व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घाडी यांचे पोलिसांना दोनदा निवेदन
घाडी यांनी आपल्याला गावातून बहिष्कृत केल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात दिली होती. या प्रकरणी या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी सांगितले होते. घाडी यांनी 1 जून 2019 रोजी आपल्याला गावातून बहिष्कृत केल्याचा तक्रार अर्ज मालवण पोलीस स्टेशनला दिला होता. त्यानंतर पुन्हा 10 जुलै 2019 रोजी मालवण पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला. या तक्रारींची मालवण पोलिसांनी दखल घेतली नाही. आपण वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला न्याय द्यावा, अशी मागणी घाडी यांनी केली होती.