वृत्त संस्था / दुबई
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला गेल्या आठवडय़ात झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात स्नायू दुखापत झाली होती. विल्यम्सन आता त्यातून पूर्ण बरा झाला असून तो आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 26 ऑक्टोबर रोजी होणाऱया पाकविरूद्ध सलामीच्या सामन्यात खेळणार असल्याचे संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विल्यम्सन सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करत होता. स्नायू दुखापतीमुळे तो या स्पर्धेतील आपल्या संघाच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे विल्यम्सन टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार का, याबाबत देखील साशंकता निर्माण झाली होती.
आयपीएल स्पर्धेतील सनरायजर्स हैदराबाद संघाचे आव्हान समाप्त झाल्यानंतर कर्णधार विल्यम्सन न्यूझीलंड संघाच्या सराव शिबिरात दाखल झाला. त्याच प्रमाणे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारे नीशम आणि मिल्ने हे देखील किवीज पथकात दाखल झाले आहेत.