Tarun Bharat

न्यूझीलंडचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

Advertisements

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा ः किवीज संघाचा स्पर्धेतील पहिला विजय,

डय़ुनेडिन / वृत्तसंस्था

यजमान न्यूझीलंडने तुलनेने दुबळय़ा बांगलादेशचा 9 गडी राखून धुव्वा उडवत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या लढतीत बांगलादेश महिला संघाने 27 षटकात 8 बाद 140 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 20 षटकात केवळ एका गडय़ाच्या बदल्यात 144 धावांसह विजय संपादन केला.

न्यूझीलंडच्या महिला गोलंदाजांनी प्रारंभी बांगलादेशला 8 बाद 140 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले आणि नंतर सुझी बेट्सच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर 42 चेंडूंचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत 27 षटकांची खेळवण्यात आली.

यजमान न्यूझीलंडचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. यापूर्वी विंडीजविरुद्ध सलामी लढतीत त्यांना निसटत्या पराभवाचा धक्का बसला होता. येथील विजयासह दोन गुण संपादन करत सध्या ते गुणतालिकेत तिसऱया स्थानी झेपावले. बांगलादेशचा संघ मात्र सलग दोन पराभवांसह सातव्या स्थानी फेकला गेला आहे.

विजयासाठी 141 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. सातव्या षटकात फिरकीपटू सलमा खातूनने कर्णधार सोफी डीव्हाईनला (14) बाद करत त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र बांगलादेशचे गोलंदाज पूर्ण निष्प्रभ ठरत गेले. बेट्सने अनुभव पणाला लावत अवघ्या 68 चेंडूत 79 धावांची आतषबाजी केली. शिवाय, ऍमेलिया केरसमवेत (नाबाद 47) सामना जिंकून देणारी 108 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. बेट्स हिचे 28 वे वनडे अर्धशतक होते. यादरम्यान, महिलांच्या वर्ल्डकपमध्ये 1 हजार धावा जमवणारी ती केवळ सहावी फलंदाजही ठरली. बेट्सने 8 चौकार फटकावले आणि इतके चौकार पूर्ण बांगलादेश संघालाही मारता आले नाहीत. बांगलादेशच्या डावात केवळ 6 चौकारांचा समावेश राहिला. ऍमेलिया केरनेही 5 चौकार वसूल केले.

तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर सलामीवीर फरजानना हक (52) व शमिमा सुल्ताना (33) यांनी 9.2 षटकात 59 धावांची सलामी दिली. 5 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी बिनबाद 41 धावांपर्यंत मजल मारली होती. फिरकी अष्टपैलू प्रॅन्सेस मकायने (1-24) शमिमाला ताहुहूकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. 

नंतर ऍमी सॅटर्थवेटेने 25 धावात 3 फलंदाजांना बाद करत या सामन्याचे चित्र पालटले. सलामीवीरांनंतर बांगलादेशचे केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. निगार सुल्तानाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे खेळाडू दडपण हाताळण्यात अपयशी ठरले. केवळ 21 धावात 3 फलंदाज गारद झाल्याने त्यांची 15 षटकात 3 बाद 81 अशी पडझड झाली. रितू मोनीला (4) बाद करत सॅटर्थवेटने वनडे क्रिकेटमधील 50 बळींचा माईलस्टोन साजरा केला. या कामगिरीसह ती वनडे क्रिकेटमध्ये 3 हजार धावा व 50 बळी, असे अष्टपैलू योगदान देणाऱया शार्लोट एडवर्ड्स, कॅरेन रॉल्टन, स्टेफानी टेलर यांच्या मांदियाळीत दाखल झाली.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश महिला संघ ः 27 षटकात 8 बाद 140. (फरजाना हक 63 चेंडूत 1 चौकारासह 52, शमिमा सुल्ताना 36 चेंडूत 4 चौकारांसह 33, निगार 11, सोभना मोस्तरी 13. ऍमी 3-25, जेन्सेन, मकाय प्रत्येकी 1 बळी).

न्यूझीलंड महिला संघ ः 20 षटकात 1 बाद 144 (सोफी डीव्हाईन 14, सुझी बेट्स 68 चेंडूत 8 चौकारांसह 79, ऍमेलिया केर 37 चेंडूत 5 चौकारांसह 47. सलमा खातून 1-34).

Related Stories

ऍन्सी सोजनला दोन सुवर्णपदके

Patil_p

टी-20 मालिकेत इंग्लंडची विजयी आघाडी

Patil_p

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात डळमळीत सुरूवात

Patil_p

उत्तराखंड बाद फेरीमध्ये दाखल

Patil_p

भारताचे पाच मुष्टीयोद्धे उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

साई प्रणितचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!