Tarun Bharat

न्यूझीलंडचा वनडे मालिकाविजय

शेवटचा सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका न्यूझीलंडने 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी पावसामुळे वाया गेला. न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या मालिकेतील पहिला सामना यजमान न्यूझीलंडने जिंकून आघाडी मिळविली होती. त्यानंतर हॅमिल्टनचा दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे भारताला मालिका बरोबरीत राखण्यासाठी ख्राईस्टचर्चचा तिसरा सामना जिंकणे जरुरीचे होते. पण या सामन्यातही पावसाचा अडथळा येत तो वाया गेल्याने भारताला ही मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडच्या दौऱयात यापूर्वी भारताने टी-20 मालिका जिंकली होती. तर त्यानंतर न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली आहे.

बुधवारच्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. पावसाचे वातावरण असतानाही भारताचा डाव कसाबसा झाला. ढगाळ हवामानामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारताचा डाव 47.4 षटकात 219 धावात आटोपला. मिल्ने, मिचेल आणि साउदी यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकविले तर श्रेयस अय्यरचे अर्धशतक एका धावेने हुकले.

भारताच्या डावामध्ये वॉशिंग्टन सुंदरने 64 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51, श्रेयस अय्यरने 59 चेंडूत 8 चौकारांसह 49, कर्णधार शिखर धवनने 45 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28, गिलने 2 चौकारांसह 13, पंतने 2 चौकारांसह 10, हुडाने 12, दीपक चहरने 2 षटकारांसह 12 धावा जमविल्या. भारताच्या डावात एकूण 4 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मिचेल आणि मिल्ने यांनी प्रत्येकी 3, साउदीने 2, फर्ग्युसन व सँटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 18 षटकात 1 बाद 104 जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाला. डकवर्थ लेविस नियमानुसार न्यूझीलंडचा संघ 50 धावांनी पुढे होता. न्यूझीलंडच्या डावाला ऍलेन आणि कॉनवे यांनी दमदार सुरुवात करून देताना 16.3 षटकात 97 धावांची भागीदारी केली. उमरान मलिकने ऍलेनला यादवकरवी झेलबाद केले. त्याने 54 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 57 तर कॉन्वेने 51 चेंडूत 6 चौकारांसह 38 धावा जमविल्या. न्यूझीलंड संघाला उर्वरित 32 षटकांमध्ये विजयासाठी 116 धावांची जरुरी होती. पण तांत्रिक नियमानुसार न्यूझीलंडला दोन षटके कमी पडल्याने या सामन्याचा निकाल होऊ शकला नाही. भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर आल्यानंतर न्यूझीलंडमधील ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे टी-20 आणि वनडे मालिकेत अडथळा आला. दरम्यान, भारताच्या गोलंदाजीची कामगिरी या वनडे मालिकेत समाधानकारक झाली नाही.

संक्षिप्त धावफलक

भारत 47.3 षटकात सर्वबाद 219 (वॉशिंग्टन सुंदर 51, अय्यर 49, धवन 28, गिल 13, पंत 10, हुडा 12, चहर 12, मिचेल 3-25, मिल्ने 3-57, साउदी 2-33, फर्ग्युसन, 1-49, सँटनर 1-15), न्यूझीलंड 18 षटकात 1 बाद 104 (ऍलेन 57, कानवे नाबाद 38, विल्यम्सन नाबाद 0, उमरान मलिक 1-31).

Related Stories

धनलक्ष्मी, ऐश्वर्या उत्तेजक चाचणीत दोषी

Amit Kulkarni

टी-20 मानांकनात भारत अग्रस्थानी

Patil_p

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेतून श्रीकांतची माघार

Patil_p

बीसीसीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव

Patil_p

सानिया मिर्झाचे विजयी पुनरागमन

Patil_p

अफगाणी खिंड जिंकली, गड अद्याप दूरच!

Patil_p