Tarun Bharat

न.पं.च्या गणेशोत्सव नियमांची 17 ऑगस्टपासून अंमलबजावणी!

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती : पार्किंग, विक्रेत्यांसाठी जागा निश्चित

वार्ताहर / कणकवली:

कणकवली नगर पंचायतीमार्फत गणेशोत्सव काळात भाजी, फळ विक्रेते, पार्किंग याबाबतच्या नियोजनाची अंमलबजावणी सोमवार, 17 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने शहरातील व्यापारी, भाजी विक्रेते, रिक्षा चालक आदी सर्वच स्तरातील घटकांनी न. पं.च्या नियोजनाला सहकार्य करावे. नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. पटवर्धन चौक, डीपी रोड व भाजी विक्रेते बसणार तेथे न. पं.मार्फत हॅण्ड वॉशची सुविधा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत नलावडे बोलत होते. नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, मेघा गांगण, महेश सावंत, बंडू गांगण आदी उपस्थित होते.

भाजी विक्रेत्यांसाठी जागा निश्चित

नलावडे म्हणाले, गणेशोत्सव काळात भाजी विक्रेत्यांना ज्या ठिकाणी फ्लाय ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाले. त्याच्या खालील भागात पेट्रोल पंप ते बस स्थानकासमोरपर्यंत तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी बसणाऱया भाजी विक्रेत्यांनी न. पं.ने आखून दिलेल्या लाईनच्या बाहेर येऊ नये. तर तालुक्यातून गावठी भाजी व गणपतीच्या मंडपीसाठी साहित्य घेऊन येणाऱया विक्रेत्यांसाठी पटवर्धन चौक ते अभ्युदय बँकेसमोरील फ्लाय ओव्हरब्रिजच्या मधील भागात बसण्यासाठी जागा आखून देण्यात येणार आहे.

वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहने, लक्झरी या मराठा मंडळ व नरडवे रोडवर रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करायच्या आहेत. धान्याच्या मालाचे ट्रक मात्र बाजारपेठेत नेता येणार आहेत. चारचाकी वाहने हॉटेल हॉर्नबिलकडील मोकळ्य़ा जागेत पार्किंग करायची आहेत. डीपी रोडवर एका बाजूने कार पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात 17 ऑगस्टपासूनच बाजारपेठेत कोणत्याही भाजी विक्रेता किंवा हातगाडी विक्रेत्यांना थांबता किंवा भाजी, फळांची विक्री करता येणार नाही. तसेच मंगळवारचा आठवडा बाजारही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदच ठेवण्यात येणार आहे.

एकदिशा मार्गाचीही अंमलबजावणी

हातगाडीवरून भाजी, फळ विक्री करणाऱयांना तेलीआळी व वाहतुकीस अडथळा होता नये, यादृष्टीने सर्व्हिस रोडवरून हातगाडी नेता येणार आहे. शहरात गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आचरा रोडवरून जानवलीच्या दिशेने जाणारी मोठी वाहने मसुरकर किनई रस्त्याने वळविण्यात येणार आहेत. याबाबत किनई रोडच्या ठिकाणी तसेच एकदिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यासाठी झेंडा चौक येथे पोलीस कार्यरत ठेवण्याची मागणी पोलीस निरीक्षकांकडे करण्यात येणार आहे.

16 ऑगस्टपर्यंत फलक लावणार

कणकवली न. पं.मार्फत गणेशोत्सवाचे करण्यात आलेल्या नियोजनाची योग्य अंमलबजावणीसाठी कर्मचाऱयांचे पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडे एक ट्रक्टरही देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी भाजी, फळ विक्रेते बसण्यासाठी जागा उपलब्ध असणार त्या ठिकाणी 16 ऑगस्टपर्यंत फलक लावण्यात येणार आहेत. नेमून दिलेल्या जागीच विक्रेत्यांनी दुकाने लावून न. पं.ला सहकार्य करण्याचे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

पुष्पवृष्टी बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी गणपती विसर्जनावेळी न.पं.मार्फत करण्यात येणारी पुष्पवृष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विसर्जनासाठी येणाऱया भाविकांच्या सुविधेसाठी हॅलोजन व सुरक्षिततेच्यादृष्टीने तराफ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे व न. पं.चे कर्मचारीही येथे कार्यरत असणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

अवजड वाहनांना निर्बंध

कणकवली बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पटवर्धन चौकातच बाजारपेठ रस्त्यावर बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत. धान्याचे व मालाचे ट्रक वगळून अन्य वाहनांना बाजारपेठ रस्त्यावर वाहने नेण्यास निर्बंध असणार आहेत. रिक्षा सर्व्हिस रस्त्यावर लावू नयेत. ज्या ठिकाणी फ्लाय ओव्हरब्रिज पूर्ण झाले, तेथे सुरक्षित जागा पाहून रिक्षा पार्किंग कराव्यात.जेथील फ्लाय ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाले व त्या लोखंडी प्लेट काढायच्या आहेत, त्या येत्या चार दिवसांत काढण्याबाबत हायवे प्राधिकरणला सूचना देण्यात येणार आहेत.

असाही स्वयंस्फूर्तीने निर्णय!

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कणकवलीचा राजा मानला जाणारा संतांचा मानाचा गणपती 11 ऐवजी 7 दिवसांचा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बाजारपेठेत लालबाग मित्रमंडळांतर्गत येणारे तेथील 11 घरगुती गणपती 11 ऐवजी 5 दिवसांचे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून सुरू केली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, कणकवलीकरांवर सक्ती नाही पण काळजी म्हणून ज्यांना शक्य आहे. त्यांनी कमीत-कमी दिवसांत गणेशोत्सव साजरा करावा. यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे नलावडे यांनी सांगितले.

बाजारपेठ बंद नाही!

कणकवली बाजारपेठ 7 ऑगस्टपासून बंद असल्याची अफवा काही समाजकंटकांकडून पसरविण्यात आली आहे. मात्र, असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. कंन्टेनमेंट झोनचा कालावधी संपल्यानंतर शहरातील सर्व दुकाने सुरू होतील, असे हर्णे यांनी सांगितले.

Related Stories

पालिका कर्मचाऱ्यांच्या अभ्यास सहलीवर १२ लाख खर्च

NIKHIL_N

पोलिस पत्नी संघ व भोई समाज संघांच्या उपक्रमाचे कौतुक

Patil_p

वाहनांच्या कर आकारणीमध्ये सवलत द्यावी!

NIKHIL_N

सुस्त प्रशासनावर पालकमंत्र्यांचा उतारा

NIKHIL_N

डोंबिवलीतील बिल्डर्सवर देवरूखात गुन्हा

Patil_p

सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयात जातीचे व नाॅन क्रिमीलिअर दाखले अडकले

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!