Tarun Bharat

पँगाँगमधून २४ तासांमध्ये चीनची माघार पूर्ण होणार

Advertisements

वेगाने हालचाल, चौक्या हटविल्या, रणगाडेही मागे, तंबू-इतर सामग्रीही हलविली

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या चोवीस तासांमध्ये,अर्थात, आज बुधवारी दुपारपर्यंत चीन लडाखच्या पँगाँग क्षेत्रातून पूर्णतः माघार घेणार आहे. माघार घेण्याची प्रक्रिया गेल्या शनिवारपासूनच सुरू झाली असून ती अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने घडत आहे. तथापि, भारत पूर्णतः सावध असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनी सेना पूर्णतः माघारी जाऊन एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती निर्माण झाल्यानंतरच गोग्रा आणि देपसांग येथील माघारीसंबंधी चर्चा करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले.

मे 2020 मध्ये चीनने लडाखच्या पँगाँग, गोग्रा आणि देपसांग भागात आपली सेना पुढे सारून भारताची सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारतीय सैनिकांनी चीनचा प्राणपणाने आणि निर्धाराने प्रतिकार करून आपल्या सीमांचे संरक्षण केले होते. सीमा परिसरातील ज्या भागांवर भारत आणि चीन हे दोन्ही देश स्वामित्व सांगतात अशा निर्मनुष्य भागात (नो मेन्स लँड) चीनी सेना पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. तो प्रयत्न लक्षात आल्यानंतर भारतीय सेनेनेही पुढे जाऊन चीनला रोखले होते. त्यामुळे या तीन्ही भागांमध्ये भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींच्या डोळय़ाला डोळा भिडलेल्या स्थितीत गेले दहा महिने होत्या. चर्चेच्या अनेक फेऱया होऊनही चीन हटवादीपणा सोडावयास तयार नव्हता. त्याने 50 हजार सैनिक, शस्त्रास्त्रे, रणगाडे आणि चिलखती गाडय़ा आदी सामग्री आणून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला होता.

भारताचे चोख प्रत्युत्तर

चीनला भारतीय भूमीत एक इंचही येऊ द्यायचे नाही, या निर्धाराने भारताच्या सेनेने व आणि सरकारने आपली भक्कम बांधणी केली आहे. चीनच्या तोडीस तोड सैन्य, शस्त्रास्त्रे, तोफा, रणगाडे आणि इतर युद्धसामग्री भारताकडूनही आणली गेली आहे. शिवाय भारतीय सैनिकांनी दक्षिण पँगाँग परिसरातील सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्वाच्या असणाऱया किमान 16 पर्वतशिखरांवर अधिपत्य मिळवून चीनला आश्चर्याचा धक्का देत चीनवरच दबाव आणला आहे.

चर्चेचे फलित

चीनने एप्रिल 2020 च्या स्थितीपर्यंत मागे जावे, यासाठी भारताने चर्चेचा मार्गही अनुसरला होता. चर्चेच्या 9 फेऱयांनंतर चीनने मागे जाण्यास प्रारंभ केला आहे. भारतही एप्रिल 2020 ची स्थिती आपल्या बाजूकडून निर्माण करणार आहे. तसेच गोग्रा आणि देपसांग येथेही नंतर हीच प्रक्रिया अनुसरण्यात येणार आहे. तसेच डेमलॉक आणि उष्ण झऱयांच्या प्रदेशातही हीच प्रक्रिया होणार आहे.

भारताने भूमी गमावली नाही

भारताने या सर्व घडामोडींमध्ये आपली एक इंचही भूमी गमावलेली नाही, याचा पुनरूच्चार केला आहे. चीनी सेना भारताच्या भूमीत नव्हे, भारतीय सेना आणि चीनची सेना यांच्या मधल्या तर निर्मनुष्य भूमीत (नो मेन्स लँड) घुसण्याचा प्रयत्न करत होती. तेथेच भारताच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना रोखले होते. भारताचे सैनिकही चीनच्या सैनिकांना रोखण्यासाठी निर्मनुष्य भूमीत पुढे सरसावले होते. यातून गलवानचा संघर्ष घडून त्यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते तर त्यांनी चीनच्या किमान 45 सैनिकांना कंठस्नान घालण्याचा पराक्रम केला. मात्र, भारतातल्या विरोधी पक्षांनी मोदी सरकारने माघार घेतल्याचा आरोप केला होता.

विरोधकांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे सरकारने वारंवार स्पष्ट केले होते. चार दिवसांपूर्वी संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या वक्तव्यात स्थितीवर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकण्यात आला आहे. चीन मागे जात आहे तो भारताच्या भूमीतून नव्हे, तर नो मेन्स लँडमधून त्याच्या 20 एप्रिलच्या स्थितीपर्यंत मागे जात आहे. त्यामुळे भारताच्या ताब्यात एप्रिल 2020 पूर्वी जी भूमी होती आणि भारताच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जी होती, ती सुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे. केवळ पँगाँगच नव्हे तर देपसांग, गोग्रा, उष्ण झऱयांचा प्रदेश आणि डेमलॉक येथेही चीनला भारताच्या चौक्या ओलांडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पुढे येऊ देण्यात आले नञ्हते, हेही भारताने आजवर वारंवार स्पष्ट केलेले आहे.

Related Stories

वर्षपूर्तीपर्यंत जवळपास 157 कोटी डोस

Patil_p

सलग सातव्यांदा व्याजदर स्थिर

Patil_p

ओडिशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

घराच्यांनाही न सांगता सेनेत, आज गावाचे आदरस्थान

Patil_p

क्लायमेट वीकसाठी भूमीला आमंत्रण

Patil_p

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल एनआयएच्या हाती

datta jadhav
error: Content is protected !!