Tarun Bharat

पंकजा मुंडेंच्या उपोषणाबाबत संभ्रमावस्था

औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी : 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ज्या जागेवर उपोषणास बसले होते, त्याचजागी 27 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा निर्णय भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, उपोषणाला चार दिवसांचा अवधी असतानादेखील पंकजांच्या या उपोषणासंबंधी औरंगाबादमध्ये किंवा मराठवाडय़ात काहीच वातावरणनिर्मिती नाही. यामुळे हे उपोषण होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उपोषणाबाबत अद्याप कोणत्याही सूचना आल्या नसल्या, तरी उपोषण होईल, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर भाजपातील नेत्यांवर आगपाखड केल्यानंतर या उपोषणाची घोषणा केली. त्यानुसार पंकजा मुंडे यांचे 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण होणार आहे. मात्र, हे उपोषण विद्यमान महाआघाडी सरकारविरोधात असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मराठवाडय़ाच्या विकासाच्या प्रश्नावर हे उपोषण होणार आहे. 9 आणि 10 एप्रिल 2013 या काळात खासदार असलेले गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारच्याविरोधात दुष्काळ आणि मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन दिवस उपोषण केले होते. मुंडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील ज्याठिकाणी उपोषण केले होते, तीच जागा पंकजा यांनीही निवडल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली.

राज्याचा दौराही निश्चित नाही

परळीजवळील गोपीनाथ गडावरून पंकजांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध असंतोष व्यक्त करतानाच मुंबईत 26 जानेवारीला गोपीनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करण्याचे आणि 27 जानेवारी औरंगाबादेत उपोषण करण्याचे ठरविले होते. मात्र, मुंबईचे कार्यालय 5 फेब्रुवारीला सुरू होणार असल्याची माहिती आहे. तसेच पंकजा यांनी राज्यभर दौरा करण्याचेही परळी येथे जाहीर केले होते. मात्र, पंकजांच्या राज्यभराच्या दौऱयासंबंधी अद्याप निश्चित माहिती मिळत नाही.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

पंकजांचे उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली असणार आहे. त्यामुळे औरंगाबादमधील पक्षाच्या बऱयाच वरिष्ठ कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. मराठवाडय़ाच्या प्रश्नांसंबंधी उपोषण असले, तरी उपोषणाचा रोख हा आधी जाहीर केल्याप्रमाणे पक्षाच्याच राज्यातील नेत्यांविरुद्ध असल्याने उपोषणात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत जिह्यातील पदाधिकारी संभ्रमात आहेत. पक्षाच्या बॅनरखाली उपोषण झाले असते, तर अधिकाधिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले असते, अशी प्रतिक्रिया एका पदाधिकाऱयाने दिली.

 

Related Stories

सांबरा रोडवर दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar

शहीद संदीप सावंत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

prashant_c

ही तर ‘किलिंग लाइफ’ : आशिष शेलार

prashant_c

रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरात भरणार जनावर बाजार

Archana Banage

उजनीतून नदीला आणि कालव्याला 21 मार्चपासून आवर्तन

Archana Banage

सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी संभाजीराज्यांचे उपोषण सुरू

prashant_c