Tarun Bharat

पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

‘तौक्ते’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल. यात कोणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे दिली.

 वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ांचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱयावर शुक्रवारी आले होते. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली. जिल्हय़ात झालेल्या चक्रीवादळ नुकसानीचा प्राथमिक आढावा मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी विमानतळावर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने जिल्हय़ातील 5 तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.  यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात झाले आहे. जिल्हय़ात आंबा, काजू व नारळ बागांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने पंचनामे करुन नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱयांना दिले.

 बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी उपस्थित होते.

  जिल्हय़ातील नुकसानीचे सादरीकरण

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी जिल्हय़ात झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हय़ात 2 जणांचा मृत्यू तर 8 व्यक्ती जखमी झाल्या. मृत पशुधनाची संख्या 11 आहे. 17 घरे पूर्णतः तर 6 हजार 766 घरे अंशतः बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक घरे दापोलीत 2 हजार 235 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1 हजार 84 तर राजापुरातील 891 घरांचे नुकसान झाले. 370 गोठय़ांचे नुकसान झाले. वादळात 1 हजार 42 झाडे पडली. यात सर्वाधिक 792 झाडे राजापूर तालुक्यात व रत्नागिरीत 250 झाडे पडली. चक्रीवादळात 59 दुकाने व टपऱया, 56 शाळांचे नुकसान झाले. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झाल्या आहेत. जिह्यात 1 कोटी 98 लाख 84 हजारपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Related Stories

ऑनलाईन लॉटरी केंद्रावर शाहुपुरी पोलिसांचा छापा

Patil_p

कराडतील दोन्ही खून अनैतिक संबंधातूनच

Patil_p

भोंग्याच्या विषयाला धार्मिक रंग देऊ नका, अन्यथा…

datta jadhav

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा न्याय का ? ; जितेंद्र आव्हाडांवर भाजपची टीका

Archana Banage

चक्क रिक्षातच लावला महिलेला ऑक्सिजन

Patil_p

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

Archana Banage