आयपीएल मेगाऑक्शन दुसरा दिवस : ओडियन स्मिथ पंजाबकडे तर अजिंक्य रहाणे केकेआरकडे, पुजारा ‘अनसोल्ड’
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला आयपीएल महालिलावाच्या दुसऱया दिवशी 11.50 कोटीची किंमत मिळाली असून त्याला पंजाब किंग्सने खरेदी केले तर पंजाब किंग्सने विंडीजचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथलाही 6 कोटीला घेतले आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. कसोटीपटूचा शिक्का बसलेला चेतेश्वर पुजारा मात्र अनसोल्ड राहिला. अर्जुन तेंडोलकरला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सनेच घेतले असून त्यासाठी त्यांनी 30 खर्च केले आहेत.
भारताचे डावखुरे वेगवान गोलंदाज खलील अहमद व चेतन साकरिया यांना बऱयापैकी मोठी रक्कम मिळाली असून त्यांना अनुक्रमे 5.25 कोटी व 4.20 कोटी मिळाले आहेत. अन्य भारतीय खेळाडूंत अष्टपैलू शिवम दुबेला चेन्नई सुपरकिंग्सने 4 कोटीला त्याच्या षटकार मारण्याच्या क्षमतेचा विचार करून घेतले आहे. गुजरात टायटन्सने अष्टपैलू विजय शंकरला आपल्या संघात 1.4 कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या जुलैमध्ये भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी केलेला लंकेचा स्पिनर महीश थीकसानाला (70 लाख) चेन्नईने घेतले आहे. कसोटीत खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराला अपेक्षेप्रमाणे खरेदीदार मिळाला नाही तर रहाणेला केकेआरने आपल्या संघात सामावून घेतले आहे.


दुसऱया दिवशी लिव्हिंगस्टोनला सर्वाधिक बोली
लिलावातील पहिल्या सत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते इंग्लंडच्या लिव्हिंगस्टोनने. त्याला मिलियन डॉलर्सहून अधिक रकमेला खरेदी करण्यात आले असून पाच प्रँचायझीमध्ये त्याला घेण्यासाठी चुरस लागली होती. विशेष म्हणजे मागील मोसमात तो राजस्थान रॉयल्सतर्फे खेळला होता आणि संथ खेळपट्टय़ांवर त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र स्लॉट्स (प्रत्येक संघासाठी किमान 18) उपलब्ध असल्याने त्याला घेण्यासाठी चुरस लागली होती.
अलीकडेच झालेल्या द.आफ्रिका कसोटी दौऱयात भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरलेला वेगवान गोलंदाज मार्को जान्सेनला सनरायजर्स हैदराबादने 4.2 कोटीना घेतले आहे. त्याला घेण्यासाठी पंजाबनेही प्रयत्न केले होते. दुसऱया दिवशी त्यांच्याकडे अनुक्रमे 20 व 28 कोटी रुपयेहून अधिक रक्कम उपलब्ध होती. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत ओडियन स्मिथने प्रभावी कामगिरी केल्यामुळे तसेच फलंदाजीत मोठे फटके मारण्याची क्षमता दाखविल्याने त्याची किमत वाढली होती. त्याने आपल्या वेगाने कॅरिबियन प्रिमियर लीगमध्ये ख्रिस गेलच्या बॅट्स मोडल्या होत्या. त्यामुळे त्याला घेण्यासाठी पंजाब किंग्सने जोरदार प्रयत्न करीत त्याला 6 कोटीच्या बोलीवर आपल्यात सामावून घेतले. तो उत्तम प्रतिभावंत खेळाडू असून त्याने आपली ताकद, गोलंदाजीतील कौशल्य भारताविरुद्ध दाखवून दिले आहे, असे पंजाब किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले.
गोंधळून टाकणारी मुंबईची रणनीती
मुंबई इंडियन्सकडे आज 27 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध होती. त्यांना किमान 10 स्लॉट्स भरावयाच्या होते. मात्र पहिल्या सत्रात त्यांनी फारसा उत्साह दाखविला नाही. नंतर मात्र सावध पवित्रा घेत त्यांनी नवदीप सैनीला बोली लावली. पण राजस्थान रॉयल्सने बाजी मारत सैनीला 2.40 कोटीला आपल्या संघात घेतले. मुंबईने जयदेव उनादकटला 1.30 कोटीला घेण्यात यश मिळविले, याशिवाय मयांक मार्कंडेला 65 लाखाला घेतले तर सिंगापूरच्या 40 लाख बेसप्राईस असलेल्या टिम डेव्हिडला 8.25 कोटीला खरेदी केले. पण मॅचविनिंग खेळाडू मिळविण्यासाठी त्यांच्यात जी नेहमी चमक दिसून येते, ती यावेळी दिसली नाही.
लखनौ सुपरजायंट्सकडे के. गौतम
लखनौ सुपरजायंट्सकडे सर्वात कमी (6.90 कोटी रु.) रक्कम उपलब्ध होती. पहिल्या दिवशी त्यांनी अकरा खेळाडू निवडले असल्याने दुसऱया दिवशी त्यांनी खेळाडू खरेदीसाठी फारशी आक्रमकता दाखविली नाही. त्यांनी बारगेनिंग खरेदीवर भर देत कृष्णाप्पा गौतम यासारख्या खेळाडूंना खरेदी केले. गेल्या वर्षी 9 कोटीला त्याला चेन्नईने घेतले होते. यावेळी लखनौने त्याला 90 लाखाला घेतले. बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी लंकेच्या दुश्मंता चमीरासाठी 2 कोटी खर्च केले आहेत.
युवा वर्ल्ड कप स्टार राज बावा, यश धुल, हंगरगेकर यांचीही निवड
यू-19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार यश धुलला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखाला खरेदी केले. त्याची बेसप्राईस 20 लाख होती. पण त्याला घेण्याबाबत फारशी बोली लावली गेली नाही. धुल हा दिल्ली कॅपिटल्स अकादमीचा खेळाडू आहे. अष्टपैलू राज बावाला खरेदी करण्यासाठी मात्र अनेक प्रँचाजझींनी उत्सुकता दाखविली. अखेर पंजाब किंग्सने त्याला 2 कोटीला मिळविले. त्याचाच संघसहकारी राजवर्धन हंगरगेकरला चेन्नईकडून चांगली बोली मिळाली. त्यांनी त्याला 1.5 कोटीला आपल्या संघात घेतले आहे.
एडमीडेस यांचे टाळय़ांच्या गजरात स्वागत
महालिलावाच्या पहिल्या दिवशी लिलावाधिकारी हय़ुज एडमीडेस यांना बीपीचा त्रास झाल्याने ते अचानक डायसवर कोसळले होते. त्यांना त्वरित उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांची तब्बेत ठीक झाल्यानंतर दुसऱया दिवशी उत्तरार्धात ते पुन्हा एकदा लिलाव करण्यास उभे राहिले तेव्हा उपस्थितांनी त्यांचे टाळय़ा वाजवून स्वागत व कौतुक केले. त्यांच्या अनुपस्थितीत चारु शर्मा यांनी लिलावाचे काम पाहिले होते.
दुसऱया दिवशी विविध संघांनी खरेदी केलेले खेळाडू
खेळाडू देश बेसप्राईस खरेदी (रुपये)
पंजाब किंग्स
लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंड 1 कोटी 11.5 कोटी
ओडियन स्मिथ विंडीज 1 कोटी 6 कोटी
वैभव अरोरा भारत 20 लाख 2 कोटी
राज अंगद बावा भारत 20 लाख 2 कोटी
रिषी धवन भारत 50 लाख 55 लाख
संदीप शर्मा भारत 50 लाख 50 लाख
प्रेरक मंकड भारत 20 लाख 20 लाख
दिल्ली कॅपिटल्स
खलील अहमद भारत 50 लाख 5.25 कोटी
चेतन साकरिया भारत 50 लाख 4.2 कोटी
रोवमन पॉवेल विंडीज 75 लाख 2.8 कोटी
मनदीप सिंग भारत 50 लाख 1.1 कोटी
ललित यादव भारत 20 लाख 65 लाख
यश धुल भारत 20 लाख 50 लाख
प्रवीण दुबे भारत 20 लाख 50 लाख
रिपाल पटेल भारत 20 लाख 20 लाख
सनरायजर्स हैदराबाद
रोमारिओ शेफर्ड विंडीज 75 लाख 7.75 कोटी
मार्को जान्सन द.आफ्रिका 50 लाख 4.2 कोटी
ऐडन मॅरक्रम द.आफ्रिका 1 कोटी 2.6 कोटी
मुंबई इंडियन्स
टिम डेव्हिड सिंगापूर 40 लाख 8.25 कोटी
जोफ्रा आर्चर इंग्लंड 2 कोटी 8 कोटी
डॅनियल सॅम्स ऑस्ट्रेलिया 1 कोटी 2.6 कोटी
एन.तिलक वर्मा भारत 20 लाख 1.7 कोटी
राजवर्धन हंगरगेकर भारत 30 लाख 1.5 कोटी
टायमल मिल्स इंग्लंड 1 कोटी 1.5 कोटी
जयदेव उनादकट भारत 75 लाख 1.3 कोटी
मयांक मार्कंडे भारत 50 लाख 65 लाख
संजय यादव भारत 20 लाख 50 लाख
अर्जुन तेंडुलकर भारत 20 लाख 30 लाख
गुजरात टायटन्स
जयंत यादव भारत 1 कोटी 1.7 कोटी
डॉमिनिक डेक्स विंडीज 75 लाख 1.1 कोटी
विजय शंकर भारत 50 लाख 1.4 कोटी
दर्शन नलकांडे भारत 20 लाख 20 लाख
कोलकाता नाईट रायडर्स
अजिंक्य रहाणे भारत 1 कोटी 1 कोटी
रिंकू सिंग भारत 20 लाख 55 लाख
अनुकूल रॉय भारत 20 लाख 20 लाख
रसिक दार भारत 20 लाख 20 लाख
चेन्नई सुपरकिंग्स
शिवम दुबे भारत 50 लाख 4 कोटी
मिचेल सँटनर न्यूझीलंड 1 कोटी 1.9 कोटी
ऍडम मिल्ने न्यूझीलंड 1.5 कोटी 1.9 कोटी
महीश थीकसाना लंका 50 लाख 70 लाख
ड्वेन प्रिटोरियस द.आफ्रिका 50 लाख 50 लाख
सिमरजीत सिंग भारत 20 लाख 20 लाख
शुभ्रांशू सेनापती भारत 20 लाख 20 लाख
मुकेश चौधरी भारत 20 लाख 20 लाख
लखनौ सुपर जायंट्स
दुश्मंता चमीरा लंका 50 लाख 2 कोटी
के. गौतम भारत 50 लाख 90 लाख
शाहबाज नदीम भारत 50 लाख 50 लाख
मनन वोहरा भारत 20 लाख 20 लाख
मोहसिन खान भारत 20 लाख 20 लाख
राजस्थान रॉयल्स
नवदीप सैनी भारत 75 लाख 2.6 कोटी
ओबेद मॅकॉय विंडीज 75 लाख 75 लाख
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर
शेरफेन रुदरफोर्ड विंडीज 1 कोटी 1 कोटी
महिपाल लोमरोर भारत 40 लाख 95 लाख
फिन ऍलेन न्यूझीलंड 50 लाख 80 लाख
जेसन बेहरेनडॉर्फ ऑस्ट्रेलिया 75 लाख 75 लाख
सुयश प्रभुदेसाई भारत 20 लाख 30 लाख.