Tarun Bharat

पंजाबविरुद्ध आज चेन्नई सुपरकिंग्जला विजयाची गरज

वृत्तसंस्था/ दुबई

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जचा संघ रविवारी येथे होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावा लागणार आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या चेन्नईचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गेल्या काही हंगामात आपले वर्चस्व राखणाऱया चेन्नई सुपरकिंग्जला 2020 च्या हंगामात म्हणावा तसा सूर मिळालेला नाही. कोरोना महामारीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीच्या सामन्यात चेन्नईने बलाढय़ मुंबई इंडियन्सला पराभूत करून आपल्या मोहिमेला चांगला प्रारंभ केला. पण त्यानंतर त्यांना पुढील तीन सामन्यात सलग पराभवाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी झालेल्या सनरायझर्स हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात खेळणाऱया अंतिम अकरा खेळाडूंमध्ये चेन्नईने  महत्त्वाचे तीन बदल करण्याचा निर्णय घेतला होता. अम्बाती रायुडुचे संघात पुनरागमन झाले. तसेच ड्वेन ब्राव्हो यालाही संधी देण्यात आली. पण या दोन्ही खेळाडूंकडून म्हणावी तशी चांगली कामगिरी होऊ शकली नाही. डु प्लेसिसला डावातील मधल्या टप्प्यामध्ये धावांची गती राखता आली नाही. चेन्नई संघाकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्यांना गेल्या तीन सामन्यात सलग पराभव पत्करावे लागले. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही विभागात त्यांना सुधारणा करावी लागणार आहे. सलग तीन पराभवानंतर आता रविवारच्या सामन्यात चेन्नईचा संघ विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. यासाठी कर्णधार धोनीच्या डावपेचाची सत्वपरीक्षा ठरेल. चेन्नई संघाला वरच्या फळीमध्ये आणखी एका दर्जेदार फलंदाजाची उणीव भासत आहे. कर्णधार धोनीवर शुक्रवारच्या सामन्यात खेळताना अधिक दडपण येत असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे त्याची मैदानावर धाव घेत असताना दमछाक होत असल्याचे पहावयास मिळाले.

पंजाब सुपरकिंग्ज संघाची आतापर्यंत समाधानकारक कामगिरी झाली असून कर्णधार के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. पंजाब संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोनवेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांची फलंदाजी भक्कम असली तरी गोलंदाजीची क्षमता मर्यादित असल्याचे जाणवते. पंजाबचा संघ चेन्नई संघाला फटकेबाजीपासून रोखण्यासाठी प्रयत्न करेल. पुन्हा या सामन्यात पंजाबने 200 धावांचा टप्पा ओलांडला तर चेन्नईला ते मोठे आव्हान ठरेल. रविवारच्या सामन्यात पंजाबच्या तुलनेत चेन्नईवर अधिक दडपण राहील. नाणेफेकीनंतरच दोन्ही संघ आपले अंतिम अकरा खेळाडू निश्चित करतील.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Related Stories

यजमान दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

भारताची चौथ्या स्थानावर घसरण

Patil_p

अनिर्णीत कसोटीत इमामची दोन्ही डावात शतके

Patil_p

ऋषभ पंतऐवजी साहाला संधीची शक्यता

Patil_p

वनडे मालिकाविजयासाठी भारत महत्त्वाकांक्षी

Patil_p

जर्मनीत प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेला प्रारंभ

Patil_p