Tarun Bharat

पंतप्रधानांकडून लवकरच सरप्राईज पॅकेज!

Advertisements

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती : विकासनितीत बदल आवश्यक असल्याची प्रतिक्रिया

  • लॉकडाऊननंतर होणार नवीन भारत उभारणीची सुरुवात!
  • देशातील प्रत्येक नागरिकाचे योगदान अपेक्षित
  • लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला बसलाय मोठा धक्का!

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला आहे. आपली अर्थव्यवस्था ही सेवा, उद्योग आणि कृषी या तीन प्रमुख क्षेत्रांवर अवलंबून आहे. ही तिन्ही क्षेत्रे ठप्प होऊन पडली असतानाच आपणास अशा प्रतिकूल परिस्थितीत कोरोनाच्या संकटावर मात करायचीच आहे. पण या नंतर आपणास नवा भारत उभा करायचा आहे. यात देशातील प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारही यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणार असून या आर्थिक आपत्तीतून सावरण्यासाठी पंतप्रधानांकडून लवकरच बडय़ा सरप्राईज पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.

 ‘लॉकडाऊननंतरचा भारत कसा असेल’ या मुद्यावर माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री व सद्यस्थितीत पंतप्रधानांचे ‘शेर्पा’ म्हणून विदेशनितीची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असलेल्या खासदार प्रभू यांनी ‘तरुण भारत’ला दिल्ली येथून दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी दिलासाजनक गोष्टींचा उल्लेख केला.

अर्थव्यवस्थेवर झालाय मोठा आघात

 ‘लॉकडाऊननंतरचा भारत कसा असेल!’ याबाबत विवेचन करीत असताना त्यांनी प्रथम भारतीय अर्थव्यवस्थेची रचना स्पष्ट केली. भारतीय अर्थव्यवस्थेत 65 टक्के वाटा हा सेवा क्षेत्राचा असून उद्योग क्षेत्राचा वाटा हा 16 टक्के, तर शेती क्षेत्राचा वाटा हा जवळपास 16 ते 20 टक्केच एवढा आहे, असे ते म्हणाले. या 65 टक्के सेवा क्षेत्रामध्ये येणाऱया एअरलाईन, आयटी क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्री ज्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरन्ट तसेच पर्यटन हे सर्व ठप्प होऊन पडले आहे. 15 टक्के असलेल्या उद्योग क्षेत्रात 52 टक्के वाटा हा ऍटोमोबाईल क्षेत्राचा आहे. हे क्षेत्र  त्याचप्रमाणे मायनिंग क्षेत्रदेखील पूर्णत: बंद आहे. शेती काही प्रमाणात सुरू आहे. पण त्यातून उत्पादन आणि उत्पन्न किती मिळेल, हे सध्या सांगता येणार नाही. एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेवर या सर्व परिस्थितीचा गंभीर परिणाम होणार आहे, हे निश्चित, असे ते म्हणाले.

नव्या पॅकेजची होऊ शकते घोषणा

 या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी जगभर सुरू असलेले विविध देशांचे प्रयत्न व आपल्या देशाचे प्रयत्न याबाबत माहिती देताना प्रभू म्हणाले, सध्या जागतिक अर्थव्यवस्था ही 89 ट्रिलियन डॉलर्सची आहे. यामध्ये अमेरिकेचा वाटा 22 ट्रिलियन डॉलर्सचा, तर चीनचा वाटा हा 15 ट्रिलियन डॉलर्सचा आहे. म्हणजेच जगाच्या या एकूण उत्पन्नामध्ये 37 ट्रिलियन डॉलर्सचा वाटा हा केवळ या दोन देशांचा आहे. या जागतिक उत्पन्नात आपल्या देशाचा म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेचा वाटा 2.9 म्हणजेच साधारणपणे 3 ट्रिलियन डॉलर्स एवढा आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे या सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला असून यातून सावरण्याकरीता विकसित राष्ट्रे मोठमोठय़ा पॅकेजची घोषणा करीत आहेत. चीन आणि अमेरिकेने विशाल पॅकेजची घोषणा केली आहे. अन्य छोटय़ा विकसित राष्ट्रांनी देखील आपल्या जीडीपीच्या 10 ते 12 टक्के एवढय़ा पॅकेजची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका ‘टास्कफोर्स’ची निर्मिती केली असून त्यांच्यावरच नेमकं किती व कशाप्रकारे पॅकेज दिलं पाहिजे, याच्या अभ्यासाची जबाबदारी सोपविली आहे. लवकरच इतर देशांप्रमाणे आपल्या देशातही अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या नव्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारणी घेण्यासाठी निश्चितच बळ मिळेल, असे ते म्हणाले. या सरप्राईज पॅकेजची माहिती देत असताना आर्थिक आणीबाणीची शक्यता त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली.

तर 3 मेला लॉकडाऊन संपू शकते!

 कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनचा कालावधी कितीपर्यंत वाढू शकतो, याबाबत भाष्य करताना ते पुढे म्हणाले, केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात कोरोनावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जगभरातील शेकडो शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. पण या कोरोनावर वॅक्सीनची निर्मिती करण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आपल्याकडे नव्हे, तर संपूर्ण जगाकडे उपलब्ध आहे. चीनने या लॉकडाऊनच्या सहाय्यानेच कोरोनाची आपत्ती थांबविण्यास यश मिळविले आहे. भारताने जर चीनसारखाच निर्धार ठेवून शिस्तबद्ध व काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले, तर निश्चितपणे चीनपेक्षाही अधिक जलदगतीने आपण कोरोनावर मात करू शकतो, असे ते म्हणाले. या लॉकडाऊनमध्ये लोकांनी उत्तम सहकार्य केलं व आरोग्य यंत्रणेला अभूतपूर्व यश प्राप्त झालं, तर येत्या 3 मेपर्यंत हे लॉकडाऊन उठू शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

देशाचे भवितव्य उज्वल

नेहमीच संकटांबरोबरच अनेक संधीदेखील चालून येतात. या संधी साधण्याचा व त्यातूनच देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तो सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत तरी भारताने जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत अतिशय उत्तम पद्धतीने कोरोनाला रोखून धरलं आहे. प्रचंड लोकसंख्येचा देश असून देखील विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कोरोना विरुद्धची लढाई आपण ज्या पद्धतीने लढतो आहोत, त्याबद्दल सारं जग प्रभावित झालं आहे. अशा कठीण परिस्थितीत संकटात सापडलेल्या अनेक देशांना आपण मदत करीत आहोत. त्यामुळे संपूर्ण जगच आता भारताकडे मोठय़ा आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे. हीच मोठी संधी या संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्यासाठी आपल्याकरीता चालून आलेली आहे. ही संधी साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांना प्रत्येक भारतीयांनी मनापासून साथ दिली, तर नवीन भारताचे स्वरुप हे निश्चितच जबरदस्त व साऱया जगाला प्रभावित करणारे असेल याची खात्री बाळगा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. d

Related Stories

विमानतळाच्या सुविधा उपलब्धतेसाठी कुणी हात बांधले?

NIKHIL_N

प्रेयसीसाठी आला अन् प्रेयसी व स्वतःसह गावाला केले क्वॉरंटाईन

Patil_p

आई जगायला हवी…

Ganeshprasad Gogate

चौपदरीकरणास पुढील डिसेंबरची डेडलाईन!

Patil_p

चिपळूण : धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले, प्रवासी सुखरुप

Abhijeet Khandekar

कोरोनाग्रस्तांच्या ‘लाईफ’साठी ‘सुप्रिया’चा हातभार!

Patil_p
error: Content is protected !!