Tarun Bharat

पंतप्रधान मोदींकडून अनेक शैक्षणिक योजना घोषित

चिन्ह भाषेचा समावेश शालेय शिक्षणात होणार, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण प्रादेशिक भाषांमध्येही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला एक वर्ष पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक नव्या आणि अभिनव शिक्षण योजनांची घोषणा केली आहे. मूक-बधीर किंवा अंधांसाठी उपयुक्त ‘चिन्ह भाषा’ किंवा साईन लँग्वेजचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात इतर कोणत्याही भाषेप्रमाणेच केला जाणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची सोयही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘निष्ठा 2.0’ या संबोधनाने या नव्या योजना त्यांनी गुरुवारी घोषित केल्या.

नव्या शिक्षण धोरणाचा राष्ट्रनिर्माणात मोठा सहभाग आहे. युवकांच्या स्वप्नांना आणि सृजनशीलतेला संधी आणि दिशा देण्याचे कार्य या शिक्षणधोरणामुळे घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी आणि रोजगाराच्या विविध शक्यता पडताळून पाहण्यासाठी हे शिक्षण धोरण मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

शैक्षणिक बँकेची स्थापना

पंतप्रधान मोदींनी ऍकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट ही अभिनव योजनेचा प्रारंभ केला. या योजनेनुसार शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना ते जेथे सोडले तेथून नंतरच्या काळात पूर्ण करता येणार आहे. तसेच एकादा अभ्यासक्रम मध्येच सोडून दुसरा निवडण्याची मुभाही दिली जाणार आहे. तसेच यापुढे पदवीचे शिक्षण स्थानिक आणि प्रादेशिक भाषांमधूनही दिले जाण्याची घोषणा त्यांनी केली.

खुलेपणा, स्वातंत्र्य, निवड

विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना दडपण जाणवू नये. त्याला मोकळेपणाने त्याच्या आवडीचे शिक्षण किफायतशीर खर्चात घेता यावे. त्याला विषय निवडण्याचा अधिकार दिला जावा. अनेक विषय निवडण्याचे किंवा सोडण्याचेही स्वातंत्र्य मिळावे. यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यास साहाय्य होईल. त्याला नेहमी वाटणारी परीक्षेची भीती संपेल असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

इंजिनियरिंग शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये

इंग्रजीच्या ज्ञानाच्या अभावी विद्यार्थ्यांची बुद्धी आणि अभ्यास खुंटला जाऊ नये, यासाठी इंजिनियरिंगचे शिक्षण प्रादेशिक भाषेत किंवा मातृभाषेत घेण्याची सोय त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली, तेलगु इत्यादी भाषांमध्ये हे शिक्षण दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन एआय शिक्षणाचा प्रारंभ

खेडोपाडय़ांमधील विद्यार्थ्यांना, सध्या जगात ज्याची चलती आहे, अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण घेणे सुलभ व्हावे आणि ते त्याच्या मातृभाषेत मिळावे, यासाठी त्यांनी एका वेबसाईटचा प्रारंभ केला. या शिक्षणातून विद्यार्थ्याची तांत्रिक प्रतिभा आणि प्रज्ञा जागृत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नव्या शिक्षण धोरणातून आत्मनिर्भरता

भारताला शक्य तितक्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनविणे, हे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे नवे शिक्षण धोरण या ध्येयाच्या पूर्तीला अनुसरुन बनविण्यात आले आहे. भारताला उपयुक्त वस्तू भारतातच तयार व्हाव्यात आणि त्यांची गुणवत्ता जागतिक असावी, हे आत्मनिर्भरतेचे सूत्र आहे. तसेच भारतात तयार होणाऱया वस्तू विदेशात निर्यात करण्याच्या योग्यतेच्या असाव्यात असेही ध्येय आहे.

अनेक अभिनव योजना…

  • अभ्यासक्रम मध्येच सोडून दुसरा निवडण्याची, किंवा अपूर्ण अभ्यासक्रम नंतरच्या काळात पूर्ण करण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार
  • इंजिनियरिंगचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रादेशिक आणि स्थानिक किंवा मातृभाषेतून दिले जाणार
  • पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी विद्याप्रवेश हा तीन महिन्यांचा ‘प्ले बेस्ड्’ अभ्यासक्रम, चिन्ह भाषेचा माध्यमिक शिक्षणात समावेश होणार
  • उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीकरण करण्याची व्यापक योजना. भारतातील शिक्षण आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे करण्यावर विशेष भर देणार
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिक्षणाची माहिती देणारी वेबसाईट सुरु होणार, राष्ट्रीय डिजिटल शिक्षणाचे आकृतीबंध तयार करणार

Related Stories

विकासासाठी शांतता आवश्यक

Patil_p

वाराणसी ते बोगिबील दरम्यान क्रूझ सेवा

Patil_p

24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 97,894 रुग्ण

Patil_p

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Tousif Mujawar

‘बोडोलँड’प्रश्नी शांती करार

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar