Tarun Bharat

पंतप्रधान मोदींचा परिवारवाद्यांवर हल्लाबोल

अमेठीमध्ये जाहीर सभा, पाचव्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोडलेल्या अमेठी क्षेत्रात जाहिरसभा घेतली. त्यांनी काँग्रेस आणि सप यांच्या परिवारवादावर जोरदार हल्लाबोल केला. सप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकारणासाठी विशिष्ट धर्माचा आधार घेतात असा आरोप त्यांनी केला. विशिष्ट धर्माचे लोक दुखावले जाऊ नयेत म्हणून अहमदाबाद येथील दहशतवादी हल्ल्यासंबंधीच्या निकालाचे विरोधीपक्षांनी स्वागतही केले नाही. यावरून त्यांची मानसिकता कळून येते असे प्रतिपादन त्यांनी केले.

परिवारवादी पक्षांनी आतापर्यंत उत्तरप्रदेशच्या जनतेला मोठय़ा संकटात टाकले आहे. जेव्हा या परिवारवादी पक्षांची सत्ता राज्यात होती तेव्हा लोकांना कोणतीही सुरक्षितता नव्हती. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने गुंड आणि दंगलखोर शक्तींचा बंदोबस्त केल्यामुळे लोकांना मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता भाजपच्याच पाठीशी उभी असून यावेळीही पक्षाचा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय होईल असा विश्वास त्यांनी प्रकट केला.

लांगुलचालनाचे राजकारण

परिवारवादी पक्षाकडून नेहमीच विशिष्ट समाजाच्या लांगुलचालनाचे राजकारण केले गेले. यालाच ते धर्मनिरपेक्षता म्हणतात. आता ते याच धर्मांध शक्तीचे अंकित झाले आहेत. त्यामुळे त्यांना लांगुलचालन करण्याची प्रवृत्ती सोडता येणे अशक्य झाले आहे. विशिष्ट लोकांना खुष करण्यासाठी देशहिताच्या विरोधातील निर्णय घेण्यासही ते पक्ष मागे पुढे पाहत नाहीत अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

लसीबद्दल अफवा

कोरोना काळात केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण मोहीम यशस्वी केली. भारताने याच काळात स्वतःची लस निर्माण केली. याच श्रेय भाजपला मिळू नये अशा संकुचित विचारांनी विरोधी पक्षांनी भारत निर्मित लसीबद्दल आणि लसीकरण अभियानाविषयी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या लसीची मोदी लस असे संबोधून कुचेष्टा केली. तथापि सरकारने 175 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा विक्रमी वेळेत उपलब्ध केल्या असून लोकांनीही त्या घेतल्या आहेत. हेच लोक आता विरोधी पक्षांना त्यांच्या लसीकरणा विषयीच्या नकारात्मक भुमिकेसंबंधी जाब विचारल्यावाचून राहणार नाहीत असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

सैन्य दलाचे खच्चीकरण

आपल्या लांगुलचालनाच्या राजकारणाचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षांनी आपल्या सैन्य दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचाही प्रयत्न केला. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर केलेल्या वायुहल्ल्याचे तसेच सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून त्यांनी सैन्य दलांवरचा त्यांचा अविश्वास निर्लज्जपणे उघड केला. ही त्यांची कृत्ये जनतेने चांगलीच लक्षात ठेवली असून योग्यवेळी जनता अशा पक्षांना त्यांची खरी जागा दाखवून देणार आहे. सध्या हीच प्रक्रिया सुरू आहे अशी टीका त्यांनी केली.

विजयाबद्दल आत्मविश्वास

उत्तरप्रदेशसह अन्य सर्व राज्यांत विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षच आपल्या मित्र पक्षांसह विजयी होईल. उत्तर प्रदेशातही आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये भाजपला मोठा पाठिंबा मिळाला असून विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाले आहेत. केवळ उसने अवसान आणून त्यांनी प्रचार चालविला आहे. आणि मोठे मोठे दावे करण्यास प्रारंभ केला आहे अशीही टीका त्यांनी केली. त्यांच्या प्रचारात प्रामुख्याने उत्तरप्रदेशचा गेल्या पाच वर्षातील विकास आणि परिवारवादावर टीका हे प्रमुख मुद्दे असल्याचे दिसून येत आहे असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

Related Stories

सोने 27 महिन्यांच्या उच्चांकावर

Patil_p

विजयन, हासन यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p

डिजिटल व्यवहार प्रोत्साहनासाठी विशेष योजना

Patil_p

ब्रिटनमधील युद्धसरावात भारत सहभागी होणार नाही

datta jadhav

अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक संमत

Patil_p

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का

Patil_p