Tarun Bharat

पक्षांतरास चटावलेल्यांना मतदारांनी घरी बसवावे

पणजीचे नगरसेवक उदय मडकईकर यांचे आवाहन : मतदारांचा विश्वासघात करण्याचे पाप कदापि करणार नसल्याचे स्पष्ट

जय नाईक /पणजी

पक्षांतरास चटावलेल्यांना मतदारांनी घरी बसवावे. ही जरब एवढी असावी की भविष्यात कोणताही आमदार पक्षांतर करण्यास धजणार नाही. आपण आमदार बनल्यास मतदारांचा विश्वासघात करणारे पाप कदापी करणार नाही, असे स्पष्ट मत पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी व्यक्त केले. मतदारांचा राग काय असतो याचा अनुभव राजकारण्यांना येईल तेव्हाच ही राजकीय बजबजपूरी संपून राज्याला स्वच्छ सरकार लाभेल, असेही ते म्हणाले.

दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत मडकईकर बोलत होते. युवा दशेतच 1984 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश करताना अनेक राजकर्त्यांसाठी काम केले. काँग्रेसचे आमदार जे. बी. गोन्साल्वीस, त्यानंतर सुमारे 13-14 वर्षे सोमनाथ जुवारकर यांच्यासाठी वावरलो. मॉविन गुदिन्हो युवा काँग्रेस अध्यक्ष असताना उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीसपदी काम केले.

’जेथे बाबूश तेथे उदय’

गत तब्बल 19 वर्षांपासून बाबूश मोन्सेरात यांच्यासोबत राहिलो. मध्यंतरी पणजी नगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक बनलो. गत 15 वर्षांपासून नगरसेवकपदी कार्यरत आहे. मात्र बाबूश यांची साथ सोडली नाही. त्यासाठी प्रसंगी पक्षीय निष्ठा सुद्धा बाजूला ठेवली. म्हणुनच ’जेथे बाबूश तेथे उदय’ असे समिकरणच होऊन गेले होते. परंतु त्याचे फलित म्हणून आपल्या वाटय़ाला काय आले तर केवळ अवहेलना, असे ते म्हणाले.

महापौरपदाच्या कारकीर्दीत डाग नाही  

नाही म्हणण्यास मध्यंतरी त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवत महापौरपदीही बसवले. त्यात प्रामाणिकपणे काम करून आपण स्वतःला सिद्ध करून दाखवले. दोन वर्षांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत स्वतःवर कोणताही डाग लावून घेतला नाही, असे मडकईकर म्हणाले.

बाबूशकडून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न

हल्लीच भाजपने पणजी व ताळगावात विविध मंडळ समित्यांची निवड केली. मात्र त्यात आपण किंवा आपला एखादा समर्थक, कार्यकर्त्यास कोणतेही स्थान देण्यात आले नाही. यावरून बाबूश आम्हाला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत, असे जाणवू लागले होते.

मुख्यमंत्री, तानावडे, धोंड यांच्याकडे चांगले संबंध

बाबूश यांच्याकडून अशी वागणूक मिळत असली तरीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे किंवा महामंत्री सतीश धोंड यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. तेथे सदैव सन्मान मिळत होता. याऊलट गत निवडणुकीत जे कोण बाबूश यांच्या विरोधात वावरले होते, त्यांच्याशी आज बाबूश यांनी घनिष्ठ जवळीक साधली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते फिरत आहेत. वापरा आणि फेकून द्या, ही बाबूश यांची खासीयत आहे. म्हणुनच आम्हाला काहीच किंमत, मानसन्मान राहिलेला नाही. याची जाणीव आपले कार्यकर्ते आणि समर्थकांनीही करून दिली व जेथे मान, सन्मान, किंमत नाही तेथे राहण्यात अर्थ नाही, असा सल्लाही दिला.

अशा परिस्थितीत आम्ही मुळचे काँग्रेस समर्थकच असल्याने यापुढे काँग्रेससाठी काम केले पाहिजे असेच सर्वांचे मत बनले, असे मडकईकर यांनी सांगितले.

’महापौर’ हे केवळ मिरविण्याचे पद नव्हे

महापौरपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा आढावा घेताना त्यांनी, महापौर हे केवळ मिरविण्याचे पद नाही याची जाणीव ठेवत, कोणताही अहंकार न बाळगता किंवा आपण लोकांवर उपकार करतो ही भावना न ठेवता एक लोकप्रतिनिधी या नात्याने ते आपले कर्तव्य मानून सामान्यातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे आपण सदैव प्रयत्न केले, असे सांगितले.

अमलीपदार्थ व्यवहाराचा पूर्णतः बिमोड

या कारकिर्दीतील सर्वात मोठे व स्वतःला अभिमान वाटण्यासारखे काम म्हणजे गत कित्येक वर्षांपासून पणजीत कांपाल परेड ग्राऊंडवर चालणाऱया अमलीपदार्थ व्यवहाराचा पूर्णतः बिमोड केला, असे ते म्हणाले. त्याशिवाय राजधानीसह मळा भागात दरवर्षी येणाऱया पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो. कचरा विल्हेवाटीचा प्रश्नही बऱयाच प्रमाणात मार्गी लावण्यात आला. जागोजागी दिसणारे कचऱयाचे ढीग हटवून व अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे पणजीचे मानांकन उंचावण्यात काही प्रमाणात तरी मदत झाली. आता बायंगिणीत कचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास पणजीतील कचऱयाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. सांत ईनेज येथील स्मशानभूमीचे पूर्णतः नुकतनीकरण करून तेथे सर्व सोयींनी युक्त अशी अत्याधुनिक व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्याशिवाय राजधानीत विनावापर ठेवण्यात आलेली 400 पेक्षा जास्त वाहने हटविण्यात आली. त्यामुळे पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध झाली. पणजी मार्केट इमारतीत होणारी हेळसांड, गलिच्छता हटवून परिसरात स्वच्छता व शिस्त आणण्याचे प्रयत्न केले. प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली. स्वतः पुढाकार घेऊन फूटपाथवर होणारी अतिक्रमणे हटविली. हे सर्व करताना अनेकांचा रोषही पत्करावा लागला. मात्र ही सर्व कामे स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर शहराचा विकास, शिस्त, स्वच्छतेसाठी करत आहे याची जाणीव होती. त्यामुळे कुणाचीही तमा न बाळगता काम करत राहिलो, असे मडकईकर म्हणाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लॉकडाऊन काळात तर आम्ही स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा न करता केलेल्या लोकसेवेची सर्वत्र दखल घेण्यात आली. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी सुद्धा आमची प्रशंसा केली, असे त्यांनी सांगितले.

विद्यमान महापौरांचे अशोभनीय वर्तन

विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांच्या कार्यपद्धतीविषयी विचारले असता,  ’महापौर हे केवळ मिरविण्याचे पद नाही’, या वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला व नागरिकांनीच काय ते समजून घ्यावे, असा टोला लगावला. एखाद्याच्या ज्येष्ठतेचासुद्धा मान न राखणे व असभ्य भाषेत अपमानीत करण्यासारखे प्रकार आज घडत आहेत. तसेच आपण जे जे गैरव्यवहार बंद पाडले, नियंत्रणात आणले किंवा जेथे शिस्त आणण्याचे प्रयत्न केले ते सर्व काही पुन्हा सुरू झाले आहे. फुगे विक्रीच्या नावाखाली अमलीपदार्थ विकणाऱयांवर कारवाई करत ज्यांना आपण राज्याच्या हद्दीबाहेर नेऊन सोडले होते, ते आज पुन्हा शहरात दिसत आहेत. यावरून एकूण परिस्थितीचा अंदाज येईल, असेही ते म्हणाले.

बाबूशकडून एकाही आश्वासनाची पूर्ती नाही

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कारकिर्दीत नाव घेण्यायोग्य एकसुद्धा प्रकल्प आलेला नाही. जे स्वतः अस्थीर ते कोणतेही स्थीर काम करू शकत नाहीत. बाबूश यांना काँग्रेस उमेदवारी मिळाली तेव्हा याच भाजप पदाधिकाऱयांनी त्यांची कुंडलीच जगासमोर मांडली होती. त्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांसह अनेक पदाधिकाऱयांचाही समावेश होता. त्यावेळी बाबूश यांनी मोठमोठय़ा आश्वासनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात 100 दिवसात कॅसिनो हटविण्यासह ’घरोघरी नोकरी’ या त्यांच्या खास ठेवणीतील आश्वासनाचाही समावेश होता. परंतु 50 दिवस सरतात न सरतात तोच बाबूश यांनी भाजपात उडी मारली. जनतेचा विश्वासघात केला, असे ते म्हणाले.

कुंकळकरांवर आरोप करणे ही चूक होती

स्मार्ट सिटीच्या मुद्दयावरून त्याकाळी आम्ही सिद्धार्थ कुंकळकर यांच्यावर बरेच आरोप केले, मात्र ती आमची चूक होती, असे आता जाणवत आहे. कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनसुद्धा दोन वर्षांपासून पणजीचा जो विकासच थांबलेला आहे ते पाहता माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर किंवा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्या दूरदृष्टीमुळे निदान तेवढी तरी कामे झालेली आज आम्हाला पहायला मिळत आहेत, असे मडकईकर म्हणाले.

निवडणूक काळात पैशांचा वारेमाप वापर होतो हे आता सर्वश्रूत आहे. मात्र मतदारांनी यापुढे पैशांच्या आमिषांना बळी न पडता निस्वार्थी, चारित्र्यावान,  पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱया उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शुन्य विकास, घराणेशाही बाबूशना बाधणार

येत्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिल्यास अवश्य लढणार आहे, असे सांगताना बाबूश यांच्यापेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली. बाबूश यांनी चालविलेली घराणेशाही हे सुद्धा त्यांच्या पराभवाचे कारण ठरेल व मतदार ही घराणेशाही मोडित काढतील असा विश्वास मडकईकर यांनी व्यक्त केला.

मतदारांनी ऐतिहासिक क्रांती करावी

यापुढे गोव्याच्या राजकारणात घराणेशाही थांबली पाहिजे. पक्षांतरास चटावलेल्यांच्या विरोधात चळवळ उभी राहिली पाहिजे. इतिहासात नाव नोंद होईल अशी क्रांती झाली पाहिजे. वारंवार पक्षांतरे करणाऱयांना यावेळी घरी पाठविणारच असा निर्धार मतदारांनी केला पाहिजे. तरच भविष्यात कोणत्याही आमदारास पक्षांतर करण्याचे धाडस होणार नाही व पक्षांतरे बंद पडून गोव्याचे राजकारण स्वच्छ होईल, असेही श्री. मडकईकर यांनी शेवटी सांगितले.

Related Stories

पेडणेत होणाऱया गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा मुलांमध्ये रुजवूया : दिपश्री सोपटे

Amit Kulkarni

राज्यात जारी असलेल्या पाश्वभुमीवर हणजुणात गांजा जप्त तर कळंगुटात चोरांटय़ांचा हैदोस, तिघे अटकेत

Amit Kulkarni

जाणून घेऊया पावसाळ्यातील निरोगी आहाराच्या ११ खास गोष्टी…

Rahul Gadkar

मोपा लिंकरोडसाठी झाडांची कत्तल जोरात

Amit Kulkarni

सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी रोजी पर्वरीत

Patil_p

भंडारी समाज केंद्रीय समितीतर्फे मधूकर नाईक यांना श्रद्धांजली

Omkar B