Tarun Bharat

पणजीसाठी भाजपमध्ये तिरंगी धुसफूस

भाजपचे मूळ, नकली, बंडखोर असे तीन गट : तोडग्यासाठी प्रदेशाध्यक्ष, महामंत्री करणार प्रयत्न तिन्ही गटांविरोधात सुरेंद्र फुर्तादोंनी थोपटले दंड

प्रतिनिधी / पणजी

पणजी महापालिका निवडणुकीत भाजपचे अधिकृत पॅनल हे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली असले तरी भाजपच्या काही नेत्यांनी त्याविरुद्ध दंड थोपटल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व महामंत्री सतिश धोंड हे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्याशी चर्चा करणार आहेत.

सध्या पणजी महापालिका निवडणुकीत भाजपचे तीन गट तयार झालेले आहेत. त्यात मूळ भाजपेयी, नकली भाजप आणि बंडखोर भाजप असे हे गट आहेत. मूळ भाजपेयी बाबूश मोन्सेरात गटाला मानतच नाहीत. बंडखोर गटाने भाजपच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून बंडखोरी सुरू केली आहे. तथापि हा बंडखोर गट अद्याप उमेदवार शोधत आहे. त्यांना पाहिजे तसे उमेदवार मिळत नाहीत.

भाजपच्या तिन्ही गटांविरोधात फुर्तादो गट

भाजपच्या या तिन्ही गटाविरोधात सुरेंद्र फुर्तादो हे माजी महापौर आहेत. काँग्रेस नेते असले तरीही त्यांनी आपले मंडळ हे सर्वपक्षीय असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे मूळ भाजपमधील काही मंडळी ही सुरेंद्र फुर्तादो यांच्या गळाला लागली आहेत.

उत्पल पर्रीकरांचीही भाजपवर तीव्र नाराजी

पणजी महापालिका निवडणूक भाजपसाठी सध्या डोकेदुखी बनली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर हे देखील बरेच नाराज असून भाजपला अद्दल घडविण्यासाठी तेही कार्यरत आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी स्थापन केलेल्या पॅनलमध्ये स्थान मिळाले नाही अशा नाराजांना बंडखोर गटाकडून आणि सुरेंद्र फुर्तादो गटाकडून ऑफर्स आल्या आहेत. पणजीत संघर्ष वाढत आहे.

पणजी भाजपमध्ये प्रथम प्रभावी बंडखोरी

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपच्या तानावडे आणि सतीश धोंड यांनी आज माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, उत्पल पर्रीकर आणि दत्तप्रसाद नाईक यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. भाजपमध्ये प्रथमच बंडखोरी सुरू झालेली आहे. पणजी महापालिका निवडणुकीत ती प्रकर्षाने दिसून येत आहे. बंडखोरांना आवर घालण्यासाठी तानावडे यांनी त्यात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोन्सेरातना ‘शॉक’ देण्याचा फुर्तादोंचा प्रयत्न

सुरेंद्र फुर्तादो यांनी मात्र मोन्सेरात गटाला शॉक देण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून आज ते नेमके किती उमेदवार उभे करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. बंडखोर भाजप गटाकडून उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अनेक संभाव्य उमेदवारांनी ठेंगा दाखविल्यांना मोन्सेरात गटाचा दबदबा वाढलेला आहे.

बंडखोरांच्या या पार्श्वभूमीवर मोन्सेरात मात्र शांत आहेत. त्यांनी भाजपकडे देखील कोणतीही तक्रार अद्याप केलेली नाही. कारण उमेदवारी अर्ज भरू द्या, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बंडखोर अर्ज मागे घेतील, असा त्यांना विश्वास आहे.

महापालिकेत मोन्सेरात गटालाच बहुमत मिळणार : मडकईकर  

मोन्सेरात गटातर्फे महापौर उदय मडकईकर यांनी आमचा गट विरोधकांना या निवडणुकीत झोपवून टाकील, असे म्हटले आहे. विरोधकांचे 30 उमेदवार देखील नाहीत. त्यामुळे महापालिकेत मोन्सेरात गटालाच विजय मिळेल व ते देखील पूर्ण बहुमतांनिशी असे मडकईकर म्हणाले.

सत्ता मिळाल्यास ‘पे पार्किंग’ रद्द सर्वांच्या घरपट्टीत 50 टक्के सूट

पणजीकरांनी संधी दिल्यास सर्वप्रथम पणजीतील पे पार्किंग पूर्णपणे रद्द करण्यात येईल, तसेच सर्व घरांना घरपट्टीत 50 टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा व्ही पणजेकार पॅनलचे सुरेंद्र फुर्तादो यांनी केली आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपल्या पॅनलतर्फे सर्व प्रभागात उमेदवार ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. किती जिंकतील किती हरतील ते मतदार ठरवतील. परंतु सत्ता मिळविण्याएवढे नक्की जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्या पॅनलमध्ये येण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते इच्छूक आहेत. त्यामुळे चांगल्या व्यक्तींना संधी देण्यात येईल. आम्हाला पणजीतील प्रत्येक नागरिकाचे सहकार्य हवे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे सहकार्य घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या कारकीर्दीत भरपूर काम

पणजीचा महापौर या नात्याने आपण भरपूर काम केले. महापौरपदाच्या कारकीर्दीत सामाजिक बांधिलकीतून 11 ट्रक मिळविले, जीएनआरएम योजनेखाली 72 कोटी आणले, 24 तास पाणीपुरवठा व्यवस्था मार्गी लावली, पॅसिनोंचा कचरा फुकटात उचलायचा नाही हे धोरण अवलंबले, त्यासाठी आयुक्तांचे सहकार्य लाभले. त्यासाठी प्रत्येकाकडून 25 लाख प्रमाणे 1 कोटी रुपये मिळविले, त्यातील सुमारे 60 लाख रुपये खर्च करून कचरा प्रक्रिया करणारे मल्चर यंत्र आणले. त्याशिवाय घरोघरी प्रत्येकी दोन कचरा पेटय़ा मोफत वितरित केल्या.

सध्या पणजीची स्थिती अत्यंत वाईट

सध्या पणजीची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फूटपाथ नाही, रस्ताही नाही, अशी परिस्थिती आहे. यावरून पणजीची स्थिती लक्षात येते, अशी टीका सुरेंद्र फुर्तादो यांनी केली आहे. सध्या त्यांनी 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या पैशातून जे 8 ट्रक खरेदी केले आहे ते खरेतर आपल्याच प्रयत्नांमुळे मिळालेले आहे. कारण आपण स्वतः त्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांसमोर मी स्वतः सादरीकरण केले. पणजी मनपासाठी इमारत व्हावी हे सुद्धा आपलेच प्रयत्न होते, आणि सत्तेत असतो तर ती इमारत पूर्णही केली असती, असे फुर्तादो म्हणाले.

मला महापौर करणे भाग पडले

बाबूश मोन्सेरात पॅनलचे 17 सभासद होते. परंतु टोनी रॉड्रिगीश आणि कारोलिना पो यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांची संख्या 15 झाली. अशावेळी मी आणि पत्नीने त्यांना मदत केली व पुन्हा ती संख्या 17 झाली. त्यामुळे मोन्सेरात यांना मलाच महापौर करणे भाग पडले, अशी माहिती त्यांनी दिली.

फेररचना हे षडयंत्र

कुणालातरी कुणाचीतरी भीती वाटत होती म्हणुनच प्रभाग फेररचना करण्यात आली. सध्या पणजीत लोकशाही अस्तित्वाच नाही. फेररचनेमुळे प्रत्येक नगरसेवक दुखावलेला आहे. आता लवकरच आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून त्यात पणजीसाठी भविष्यातील योजना जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पणजीतील लोकांनी आम्हाला त्यांच्या अडचणी, प्रश्न ईमेल करावे, त्यानुसार जाहीरनाम्यात समावेश करण्यात येईल, असे फुर्तादो म्हणाले.

Related Stories

हलालमुक्त दिवाळी अभियानात सहभागी व्हा

Amit Kulkarni

साळ गडेत्सवाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

Amit Kulkarni

वखारीतील पाचजण जखमी वखारचालकाची प्रकृती चिंताजनक हणजूण पोलिसांकडून आठ जणांना अटक

Patil_p

मुस्लीमवाडा, नागझर डिचोली येथे बेकायदा गोमांस जप्त

Omkar B

उसगाववासियांना घालावा लागणार वाळपईचा वळसा

Amit Kulkarni

प्रकाश तळावडेकर यांच्या ‘एक क्षण’ पुस्तकाचे प्रकाशन

Patil_p