Tarun Bharat

पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय उपचार वेळेवर मिळावेत

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उपलब्धता करावी व जिल्ह्यातील पत्रकारांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत अशी सातारा जिल्हा पत्रकार संघाने मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातार्‍यात पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्याची ग्वाही दिली.  

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर माजला आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पत्रकारांना फिल्डवर, कार्यालयांमध्ये काम करावेच लागत आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण न होता जनजागृती होवून शासन व प्रशासनाच्या उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या काळात पत्रकारांनी प्रामाणिकपणे केले आहे. दुर्देवाने पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा सरकारी अनास्थेमुळे व कोरोनावर तातडीने उपचार न झाल्यामुळे बळी गेला. अशी वेळ कुठल्याही पत्रकारावर येवू नये यासाठी तातडीने खबरदारी घ्यावी या हेतूने सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची गुरूवारी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यात अनेक वर्तमानपत्रांमधील पत्रकार कोरोना बाधित आढळले आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील पत्रकारही कोरोना बाधित झाले आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्र कार्यालयातील अन्य कर्मचार्‍यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अशा परिस्थितीत हे लोन आणखी वाढू न देता वृत्तपत्र कार्यालयातील, मिडिया हाऊसमधील पत्रकारांसह अन्य कर्मचार्‍यांची क्वारंटाईनची व्यवस्था सुलभपणे करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. 

सातारा, कराड, फलटण, वाई या मोठ्या शहरांमध्ये किमान प्रत्येकी 15 बेडचे कोविड केअर सेंटर तर कोरेगाव, वडूज, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, खंडाळा, मेढा येथे किमान 5 बेडचे कोविड केअर सेंटर पत्रकारांसाठी तयार करावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
कोरोना बाधित पत्रकार, वृत्तपत्र अथवा मिडिया हाऊसमधील कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळवताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने, व्हेंटिलेटरची तातडीने व्यवस्था न झाल्याने पत्रकार अथवा त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी एक ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. 

कराड येथील ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांचे कोरोनाच्या आजाराने नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र शासनाने कोरोनाने निधन झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला 50 लाखांचा विमा देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवत आहोत. याकामी जिल्हा प्रशासन म्हणून आपले सहकार्य मिळावे, अशीही मागणी करण्यात आली. 

जिल्ह्यात शहरे असो अथवा ग्रामीण भाग. जिथे पत्रकार, पत्रकारांच्या कुटुंबांपैकी कुणीही, वृत्तपत्र अथवा मिडिया हाऊसमधील कर्मचारी, वृत्तपत्र एजंट यांच्यापैकी कुणाला कोरोनाचा त्रास झाला तर त्यांना तातडीने उपचार मिळण्यासंदर्भात त्या-त्या भागातील आरोग्य यंत्रणेला गांभीर्यपूर्वक सुचना कराव्यात, अशी मागणीही पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली. या मागण्यांवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली. सातार्‍यात पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करुन त्याठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अशी सुविधा देण्यासंदर्भात शक्य तेवढे  प्रयत्न केले जातील. सीसीसी सुरु करण्यासंदर्भात व्यवस्था होवू शकते, अशी ठिकाणे सुचवल्यास प्रशासनास मदत होईल, असे  शेखर सिंह यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सुजीत आंबेकर, दीपक शिंदे, चंद्रसेन जाधव, राहुल तपासे, आदेश खताळ, तुषार तपासे, दीपक दीक्षित, ओमकार कदम, प्रशांत जगताप आदि उपस्थित होते.

Related Stories

सातारा नगरपालिकेचे वसुंधरा अभियान फक्त ट्विटरवरच

Patil_p

सातारा जिल्ह्यात गुह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन

Archana Banage

देशात 16,764 नवे बाधित

datta jadhav

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

Archana Banage

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

Archana Banage

शाहूपुरीतील जलवाहिनी गळती काढण्याचे काम सुरु

Patil_p
error: Content is protected !!