ऑनलाईन टीम / जयपूर :
देश – विदेशात प्रसिद्ध असलेले न्यूरोलॉजिस्ट आणि पद्मश्री डॉ. अशोक पानगडिया यांचे निधन झाले आहे. 11 जून रोजी दुपारी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील आरयूएचएस रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते.


दररोज 100 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. अशोक पानगडिया यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना आरयूएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांना अन्य समस्या जाणवत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडनी आणि फुफुसाचा संसर्ग झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले आहे.
प्रसिद्ध डॉ. अशोक पानगडिया यांना 1992 मध्ये राजस्थान सरकारकडून मेरिट अवॉर्ड देण्यात आले होते. ते एसएमएसमध्ये न्यूरोलॉजीचे विभगाध्यक्ष होते. तर 2006 ते 2010 या काळात प्रिन्सिपॉल होते. तर 2002 मध्ये त्यांना मेडिकल काउंन्सिल ऑफ इंडियाने डॉ. बी सी रॉय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान गौरविण्यात आले होते. त्यांचे 90 पेक्षा अधिक पेपर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.