ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. के. के अग्रवाल यांनी सोमवारी (17 मे) रात्री साडेअकरा – बाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते 62 वर्षांचे होते.


मिळालेल्या माहितीनुसार, के. के. अग्रवाल कोरोनाची लागण झाल्यानंतर केके अग्रवाल यांना राजधानी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास एक आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आले.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी के. के. अग्रवाल यांनी दोन कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पण गेल्याच महिन्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. सन 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. अग्रवाल कार्डिओलॉजिस्ट होते आणि हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख देखील होते.
डॉ. के. के. अग्रवाल गरिबांना मोफत सेवा देणे आणि त्यांच्या दिलदारपणामुळे ते लोकांचे आवडते होते. त्यांचे स्वतः चे यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर ते व्हिडीओच्या माध्यमातून कोविड-19 सह इतर आजारांबाबत लोकांना माहिती आणि सल्ला देत असत.