Tarun Bharat

पन्हाळा तालुक्यात आता उन्हाळी वरीचा प्रयोग

 बाजारभोगाव / प्रतिनिधी 

राज्यातला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा  पन्हाळ्यातील  पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा उन्हाळी वरी उत्पादनाचाही प्रयोग पन्हाळा तालुक्यात राबविण्यात येत आहे. केवळ पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या  वरी पिकाची  पिसात्री येथील उपक्रमशील शेतकरी मिलींद पाटील यांच्या शेतात नुकतीच लागण करण्यात आली आहे. नाचणी बहुगुणी असल्याने रोजच्या आहारातील वापर वाढला आहे. वाढत्या मागणीपुढे उत्पादन कमी पडू लागले होते. म्हणूनच नाचणी या पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या  पिकाचा ऊन्हाळी हंगामात लागवडीचा प्रयोग गतवर्षी घेण्यात आला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा माध्यमातून गेल्या वर्षी उन्हाळी नाचणीचा राज्यातला पहिला प्रयोग  पन्हाळा तालुक्यातील  बाजारभोगाव  , किसरूळ , काळजवडे , पिसात्री येथील अठरा शेतक-यांच्या शेतावर घेण्यात आला होता. या प्रयोगाद्वारे शेतक-यांना एकरी सरासरी 16 ते 22 क्विंटल नाचणी उत्पादन मिळाले. उन्हाळी हंगामात नाचणीचा प्रयोग सफल झाल्यामुळे यंदा काही उत्साही शेतकऱ्यांनी उन्हाळी वरी उत्पादनाचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. नाचणी  प्रमाणेच वरीचीही मागणी वाढली आहे.
लघु तृणधान्याच्या उत्पादनासाठी पन्हाळा तालुक्याचा पश्चिम भाग पोषक असुन उन्हाळ्यात या भागात यापैकी कोणकोणती धान्य पिके चांगले उत्पादन देऊ शकतात याचा शेतकरी अभ्यास करत आहेत. लघु तृणधान्य उत्पादन, संशोधन, बिजोत्पादन, बियाणे प्रसार, प्रशिक्षणे, प्रक्रिया या व्यापक उद्देशाने पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यातील काही प्रयोगशील शेतक-यांनी एकत्र येऊन मिलेट असोसिएशन नावाने एक संस्था स्थापन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी  ही संस्था महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मिलेट असोसिएशनचे सचिव आणि पिसात्री येथील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील त्यांच्या शेतावर उन्हाळी वरी उत्पादनाचा प्रयोग घेत आहेत. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडापार्क येथुन फुले एकादशी या वाणाचे बियाणे आणुन त्यांनी डिसेंबर महिन्यात रोपवाटिका तयार केली होती. नुकताच त्यांच्या मुख्य शेतात वरी रोपं लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, मिलेट असोसिएशनचे अध्यक्ष कृषीभूषण सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप चौगुले यांच्यासह प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. नव्वद दिवसात हे पीक काढणी योग्य होते.  उत्पादित होणारे वरी बियाणे पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर इतर शेतक-यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून लघु तृणधान्य उत्पादक शेतक-यांची नोंदणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

KDCC बँकेतील उद्धट कर्मचाऱ्यांनी वागणे बदलले नाही तर ठोकून काढू : राहूल चिकोडे

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : उजळाईवाडीत स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

Archana Banage

ग्रामपंचायत निकालाने दिले आगामी जि. प., पं. स. साठी बळ

Kalyani Amanagi

शिरोळमध्ये धुतलेल्या कपड्याचे पाणी अंगावर उडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Archana Banage

गाळमुक्त तलाव आणि सुशोभिकरणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग कौतुकास्पद- तहसीलदार शीतल मुळे- भामरे

Abhijeet Khandekar

अवैध सावकारीमुळे अर्थिक पिळवणूक होत असल्यास तक्रार करा

Archana Banage