प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा तालुक्यातील कोरोना विषाणु तपासणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ” कोव्हिड १९ ” च्या तीनही केंद्रावर आरोग्य विभागातील कंत्राटी सेवकांवर भार टाकून याच आरोग्य विभागातील कायम कर्मचारी मात्र लांब राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोरोना तपासणीसाठी पन्हाळा तालुक्यात फोर्ट, संजीवन, एकलव्य ही तीन कोव्हिड केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागात कंत्राटी म्हणून कार्यरत असलेले ८ वैद्यकीय अधिकारी, २ परिचारिका, ३ फार्मासिस्ट काम पहात आहेत, तर आरोग्य विभागात कायम कर्तव्यावर असलेले ३ वैद्यकीय अधिकारी, २ परिचारीका काम करीत आहेत.
पन्हाळा तालुक्यात राज्य शासनाचे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय, तसेच जिल्हा परिषदेची सहा. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट उपलब्ध असून देखील कोव्हिड च्या तपासणी केंद्रावरील कामाचा ताण मात्र कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपवून आरोग्य विभागातील कायम सेवेत असणारे अधिकारी व कर्मचारी रुग्णापासून नामानिराळे राहिले आहेत. आरोग्य उपसंचालक तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोव्हीड केंद्रावरील कामाचे समान वाटप करण्याची गरज देखील व्यक्त होऊ लागली आहे.
पन्हाळा तालुक्यात आरोग्य विभागात कार्यरत ऊसणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचारी यांना कंत्राटी व कायम असा भेदभाव न करता तीनही कोव्हिड तपासणी केंद्रावर सर्वाना समान दिवसाची फिरस्ती पध्दतीने सेवा देण्यात यावी अशी मागणी देखील सुप्तपणे बोलून दाखवली जात आहे.

