Tarun Bharat

पप्पा सांगा कुणाचे?

Advertisements

रेडिओ लावणे हल्लीच्या काळात बऱयापैकी दुर्मीळ झाले असले तरी कधीतरी तो लावावासा वाटतो. कधीकधी चुकून त्या बटणावर हात पडतो आणि तो लागतो. परवा असाच चुकीने रेडिओवर हात पडला. आणि नेमका त्या दिवशी ‘फादर्स डे’ होता. असेच एक मराठी रेडिओ स्टेशन लागले होते. त्यावर एक खूप जुने गाणे लागले होते. ‘सुवासिनी’ या सिनेमातले ते गाणे मुलीची पाठवणी करतानाचे तिच्या वडिलांचे मनोगत असलेले गाणे आहे. ग. दि. माडगूळकर लिखित त्या गाण्याचे बोल होते.

चालली शकुंतला लाडकी शकुंतला  चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला

लाडक्मया लेकीच्या विरहाच्या दुःखाचे येणारे कढावर कढ निग्रहाने पाठी परतवणाऱया त्या बापाने तिला दिलेला सुरेल निरोप आहे तो! दुःखाचे कढ परतवीत गाणे आणि त्याचवेळी पराकोटीचा निर्दोष स्वरेलपणा राहणे शिवाय त्या शब्दांचे योग्य ते वजन, आघात या सर्वांचाही परिणाम साधणे या त्रिवेणी संगमीय चमत्काराचे अधिकारी म्हणजे दुसरे कोण असणार? आपले लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके! अस्वस्थ व्हायला होते ते गाणे ऐकून. हो…ते नुसते ऐकले तरीही रडवेल असे गाणे आहे ते. शिवाय ते पहायला मिळाले तर आणखीनच परिणामकारक…कारण ती भूमिका जुन्या पिढीतले श्रे÷ नटवर्य चंद्रकांत गोखले यांनी केली होती. ‘जोग’ रागावर आधारित असलेले हे गाणे संपूर्ण ऐकायला बरेच धारिष्टय़ खर्च होते. आईची महती सांगणारी गाणी तर खूपच आहेत सगळय़ाच भाषातून, पण बाबांची महती, त्यांचे प्रेम, त्यांची लेकरांविषयीची भावना हे सगळे सांगणारी कोणतीही गाणी एवढे भावुक करून सोडतात की सांगता सोय नाही. त्यात ती मुलगी असेल तर जास्तच! काय असते असे वेगळे बाप आणि लेक यांच्या नात्यात? गाण्याच्या सृष्टीने या नात्यावरही कितीतरी हृद्य गाणी द्यावीत आणि ती आजही टिकून रहावीत असे काय आहे यात? आणि ती सगळी रडवणारीच असतात का? तर नाही. आता उल्लेख केलेल्या गाण्यासारखी गाणी रडवतात तर काही काही गाणी आतून काळीज कातरीत नेतात. माझे आजचे वैभव ही तुमच्याच आशीर्वादाची, पुण्याईची देणगी आहे. ती पहायला तुम्ही एकदाच या अशी व्याकूळ विनंती करणारी लेक आपल्या वडिलांना हात जोडून हाका मारत आहे. गाणे ऐकता ऐकता असे वाटते की तिचे सोडून गेलेले वडील तिचा दैवी स्वर ऐकून एकवार तरी धावत येतीलच येतील. गाणे संपते तेव्हा लक्षात येते की एव्हाना खूप अश्रू वाहिले आहेत पण निःशब्दपणे.

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला

वैभवाने बहरून आला याल का हो पहायाला

पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात

पाठिवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा

अशी आर्त विनवणी करणारी ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या भारताचा अभिमान असलेली लाडकी गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात आपल्या पूजनीय लतादीदीच आहेत. गाण्याचे शब्द ऐकताक्षणीच खात्री पटते की संगीतसूर्य दीनानाथांनाच त्यांची ही लेक बोलवते आहे. अगदी त्यांच्यासाठीच लिहिले आहे हे.

तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले

सप्तस्वर्ग चालुन येता देवपण तुमचे कळले

गंगेकाठी घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले

किती किती अर्थपूर्ण ओळी आहेत या! लतादीदींशिवाय कुठलाच स्वर याला पूर्णांशाने न्याय देऊच शकला नसता. मा. दीनानाथांसारखी व्यक्तिमत्त्वे ही देवतुल्य खरीच, पण वडिलांच्या थोरपणाची महती तितक्मयाच उत्कटतेने गायची तर अपत्यही तितकेच ग्रेट हवे. इथे दाखवलेले नाते फार गोड आणि सूक्ष्म आहे. या गाण्यातले बाबा तिकडे दूरवर आकाशगंगेत निघून गेले आहेत. त्यांची तितकीच समर्थ लेक त्यांचे मोठेपण सांगताना त्यांचे नाते कसे श्रीमंत होते ते ऐकणाऱयाला कळत जाते. ज्यांनी त्या उभयतांविषयी खूप वाचले असेल त्याला मनातल्या कडय़ा जुळत गेलेल्या जाणवतील. कितीही मोठा माणूस असला तरी शेवटी बापलेकीच्या नात्यातला गोडवा तर तोच असतो‌ ना? पी. सावळाराम यांनी त्या गीताच्या शब्दातून तोच दाखवला आहे.

रेडिओवर प्रसिद्ध पावलेले आणखी एक जुने गाणे म्हणजे आई आणिक बाबा यातिल कोण आवडे अधिक तुला आईच्या बरोबरीने बाबांचे वर्णन करताना त्यावेळी ‘बाबा’ मंडळींचा असणारा मोठ्ठेपणा, वर्चस्व जाता जाता सहज दाखवून दिले आहे. हे गाणे गोड आहे. खूप कडव्यांचे गाणे आहे. आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांनी रचलेले. शेवटच्या कडव्यात बाबांचीच महती इवल्याशा मुलीने ठासून सांगितली आहे.

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठे बाबा

म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्नाला

यातली गंमत बघून हसू आवरत नाही. कारण या गाण्यात सांगितलेले काही म्हणजे काही आता शिल्लक राहिलेले नाही. पण ‘बाबा’ या व्यक्तीची बाजू आपल्याला तेव्हाच्या बालमानसातून कळते यातून. गाण्यांमधला बाबांचा हा प्रवास बदलत बदलत किती पुढे गेला माहीत आहे?

थेट ‘पप्पा सांगा कुणाचे’ पर्यंत प्रगती झाली. आई बाबांचे मम्मी पप्पा झाले. घरकुल चित्रपटातले हे सुरेख बालगीत गायिले चक्क त्याच चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक यांनी आणि सोबतीला होत्या गायिका प्रमिला दातार आणि राणी वर्मा.

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी

चोचीत चोचीने घास द्यावा, पिलाचा हळूच पापा घ्यावा  असे आहेत बरं या गाण्यातले पप्पा! पप्पांचा रोल बऱयाचदा आपल्या घरटय़ासाठी आभाळ पेलत राहण्याचाच असतो. अगदी आजची आधुनिक मम्मीही आभाळात भरारी घेत असली तरीही तिच्या डोक्मयात एक कोपरा कायमच किचनसाठी असतो तसेच. मग घरी आल्यावर आपली चिवचिवाट करणारी पिल्ले गळय़ात पडली की त्या श्रमाचे सार्थक होते. मग ते धोतर कोट टोपी छाप बाबा असोत किंवा बर्मुडा घालणारा डॅडू असो! भावना बदलत नसते. काळ बदलला. बाबाही बदलला.

अहो बाबांचे ए बाबा झाला, पप्पाचे डॅडा आणि डॅडू झाले. गावातल्या गावात कचेरीत जाणारा बाबा आता फ्लाईट पकडून थेट परदेशवारी करू लागला. मुले उठायच्या आधी बाहेर पडणारा बाबा घरात येईपर्यंत मुले झोपून जाऊ लागली आणि महिना महिना बाबा भेटणे मुश्किल झाले. लाउंजमध्ये, मीटिंगमध्ये, स्टेजवर बाबा आवंढे दडवू लागला. मुलाच्या आठवणीने येणारे डोळय़ातले पाणी लपवू लागला. मुलीला कधीच न सांगितलेली गोष्ट त्याला सांगाविशी वाटू लागली आणि अजून एक कीर्तिवंत गाणे जन्मले.

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?

सासुऱयासी जाता जाता उंबरठय़ामध्ये

 बाबासाठी येईल का पाणी डोळय़ामध्ये? बस्स या गाण्याबद्दल अधिक काही सांगायची गरजच नाही. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या द्वयीच्या कोणत्याही कार्यक्रमात हे गाणे ऐकून रडणारे बाबा आणि लेकी आठवा. लेखणीत मिळणारे गाणे नव्हे हे…काळ बदलला तरी बाबा तसाच आहे. त्याचे बाबापणही तसेच आहे. इतकी सगळी गाणी आपल्याला तेच सांगत आहेत. कधीकधी शांतपणे मुलीच्या लग्नात, मुलाच्या परदेशगमनाच्या वेळी खांबाआड राहून डोळे पुसणारा बाबा निरखून पाहिला आहे का, त्याचीच गाणी आहेत ही!

ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579

Related Stories

सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीने लढय़ाला बळ!

Patil_p

महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ (30)

Patil_p

कोकणात पूररेषांचा जीवघेणा खेळ!

Patil_p

स्टार्टअपच्या सफलतेची सप्तपदी

Patil_p

वहीचं मागचं पान

Patil_p

आली… निवडणूक घटिका समीप !

Omkar B
error: Content is protected !!