Tarun Bharat

परमात्मस्वरूप

Advertisements

अध्याय दहावा

देहात राहून विदेही स्थिती म्हणजे देहविरहित स्थिती कशी प्राप्त होते ते भगवंतांनी उद्धवाला समजाऊन सांगितले. ते म्हणाले, देहाच्या सहाय्याने ब्रह्मविद्या विकसित होते आणि ही विकसित झालेली ब्रह्मविद्या देहाचे नश्वरत्व माणसाच्या लक्षात आणून देते. त्यामुळे माणसाची देहबुद्धी संपुष्टात येते. देहबुद्धी संपुष्टात आली की, साधकाला सर्वत्र ब्रह्म व्यापून राहिले असल्याचा प्रत्यय येतो. मग त्याचा अपपर भाव मावळतो आणि तो सर्वत्र समदृष्टीने पाहू लागतो. सर्व संत मंडळींनी याची अनुभूती घेतलेली असते. 

 समुद्रात राहणारा मासा कायम पाण्याने वेढलेला असल्याने त्याला पाण्याशिवाय इतर काही अस्तित्वात आहे हे खरे वाटणारच नाही. त्याप्रमाणे सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची खात्री असल्याने ब्रह्मज्ञानी साधकाला इतर गोष्टींचे अस्तित्व तसेच देहाशी संबंधित असलेल्या रागलोभादी भावना जाणवत नसतात. तो सदासर्वकाळ ब्रह्मानंदात मश्गूल असतो. या ब्रह्मानंदामुळे विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनदाट आनंद भरून राहतो. वसंत ऋतुत सर्वच लतावेली फुलांनी बहरून आलेल्या असल्याने सर्वत्र सुवास दरवळत असतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी साधकाच्या नजरेला सगळीकडे सुखच सुख दिसत असते आणि त्यामुळे त्याच्यादृष्टीने सारी सृष्टी आनंदमय होते.

आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंद म्हणजे सर्वोच्च आनंद माजून राहतो. त्या सुखाची बरोबरी कशानेच होणार नाही. वेदही ज्या स्थितीचे वर्णन करू शकत नाहीत अशा अवर्णनीय परमपदाला वृत्ती पोचते. गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे मीठ आणि पाणी एकरूप होतात, त्याप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ती होते. आत्मा अविनाशी, अभंग, शुद्ध, बुद्ध, असंग, असल्याने आत्म्याशिवाय सारे अनित्य आहे हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला की नित्य आणि अनित्य हे विचारही मनातून बाजूला होतात आणि अंतर्बाह्य आत्मस्वरूपच शिल्लक राहते. गुण, गुणी आणि गुणातीतपणा हेही खरोखर त्या अवस्थेत नाहीसे होतात. उद्धवा! थोडक्मयात अशी अवस्था प्राप्त झालेला परमात्मस्वरूपच असतो असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे. अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोचली की, संसाराची निवृत्ती होते. वेदांताने व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे. अशा परमात्मस्वरूप झालेल्या म्हणजेच निजात्मरूपाची खरोखर प्राप्ती ज्याला झाली आहे त्याच्या दृष्टीने कार्य, कर्म, कर्तव्य हे सारे विषय संपुष्टात येतात. अशा साधकाला ईश्वरी अस्तित्वाची जाणीव सतत होत असते. एवढेच नव्हे तर त्याला सर्वत्र ईश्वराशिवाय काहीच दिसत नसते. प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत ईश्वरी अंश जाणवत असतो. प्रत्येक परिस्थितीत त्याला ईश्वरी हात दिसत असतो. असे साधक  स्वतःला ईश्वरापासून वेगळे  नसतात. सर्व जग ब्रह्ममय आहे हे भगवद्गीतेत सांगितलेले तत्त्वज्ञान त्याना पुरेपूर पटलेले असल्याने सर्वत्र ईश्वर सोडून अन्य काही नाहीच. या खात्रीमुळे इतर कोणतीही परिस्थिती, व्यक्ती वा वस्तू या असत्य असून केवळ ईश्वर एकच सत्य आहे हे ब्रह्मज्ञान त्याना झालेले असते. त्यामुळे सुख, दुःख, मोह या देहाच्या कोणत्याही अवस्था त्याना जाणवत नाहीत. अद्वैत तत्त्वज्ञान सांगणाऱया श्रुतिवाक्मयाच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ती निजात्मपदाला पोचते. उद्धवा! देवांनासुद्धा सहजी न मिळणारा माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परमकृपेने दिला आहे कारण तुला खरोखर निवृत्ती
प्राप्त व्हावी म्हणून हा विषय तुला अनेक श्रुतींचे आधार घेऊन परमप्रीतीने मी सांगितला. आता देह आदिकरून जे जे मिथ्या, अत्यंत निंद्य, तिरस्करणीय आहे अशा ठिकाणी तू आपले चित्त शिवू देऊ नकोस. तू त्यापासून अलिप्त होत्साता परमार्थी हो. माझ्या ज्ञानरूपी उपदेशाचा तुला अलभ्य लाभ झालेला आहे पण त्याचे आचरण करण्यासाठी तू झटून यत्न केला पाहिजेस. अनेक मत-मतांतरे तुला छळावयास येतील, त्याबद्दलही माझे विचार तुला सांगतो.

Related Stories

मावळय़ांच्या सोबतीने दुर्गसंवर्धन!

Patil_p

कोरोनाचा यक्षप्रश्न: सरकार, विरोधक आणि उद्योगजगत संभ्रमित

Patil_p

अनाथांची माय

Patil_p

सर्वसाक्षी

Patil_p

पोलीस दलातील तळपता सूर्य !

Patil_p

साधुलक्षणे-षड्रिपुंवर विजय, अमानिता आणि सर्वांप्रति आदरभाव

Patil_p
error: Content is protected !!