Tarun Bharat

परवानगीअभावी डॉल्बीचालक अद्यापही अडचणीत

व्यवसाय बंद पडल्याने अनेकांचे उत्पन्नाचे साधनच ठप्प : डॉल्बीचालक असोसिएशन स्थापन

मनीषा सुभेदार / बेळगाव

अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले. लॉकडाऊन उठल्यानंतर हळूहळू काही व्यवसाय पुन्हा उभे राहू लागले आहेत. पोट भरून नसले तरी पोटापुरते होत आहेत. सध्या ते महत्त्वाचे असा विचार सर्वच घटक करत आहेत. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतरसुद्धा एका व्यवसायाची दारे अद्याप पूर्णतः उघडली नाहीत. तो व्यवसाय आहे डॉल्बीचा.

डॉल्बीला अद्याप पूर्णतः परवानगी मिळाली नाही. परिणामी सर्व डॉल्बीचालक अडचणीत आले आहेत. एका व्यवसायावर अनेक जण अवलंबून असतात. डॉल्बी व्यवसाय त्याला अपवाद नाही. त्यामुळे हा एक व्यवसाय बंद पडल्याने अनेकांचे उत्पन्नाचे साधनच ठप्प झाले आहे. मात्र, बँका किंवा सोसायटय़ांचे हप्ते, गोदामाचे भाडे, कामगारांचे पगार यामध्ये कोठेही तडजोड होऊ शकत नाही. एकीकडे व्यवसाय बंद व दुसरीकडे वाढते देणेकरी अशा कोंडीत डॉल्बीधारक सापडले आहेत.

अलीकडेच डॉल्बीचालकांनी एकत्र येऊन बेळगाव साऊंड्स ऍन्ड लाईट्स असोसिएशनची स्थापना केली. या संघटनेत 150 सदस्य आहेत. संघटना नोंदणीकृत आहे. व्यवसायाशी निगडीत जिह्यातील कोणीही संघटनेचा सदस्य होऊ शकतो. गणेशोत्सवदरम्यान डॉल्बीधारकांचा व्यवसाय खऱया अर्थाने सुरू होतो. साधारण एप्रिल, मे लग्नसराईपर्यंत काम मिळते.

एक डॉल्बी खरेदीसाठी 12 ते 15 लाख रुपये खर्च येतो. पूर्वी साऊंड सिस्टीम हा व्यवसाय स्वतंत्र नव्हता. मंडप चालकालाच साऊंडची व्यवस्था पाहण्यास सांगितले जात असे. परंतु गेल्या 10-12 वर्षात साऊंड सिस्टीम सोहळय़ामध्ये महत्त्वाचा घटक बनला. त्यामुळे लोकांनी यामध्ये गुंतवणूक सुरू केली. विशेष म्हणजे डॉल्बीमध्ये गुंतवणूक करणाऱया 30 च्या आतील तरुणांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे.

तथापि, या व्यावसायिकांना पोलिसांचा त्रास अधिक होतो. नियम व अटींचे पालन करून आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी व पोलिसांनी सहकार्य करावे, अशी डॉल्बीचालकांची अपेक्षा आहे. वेळेनंतर किंवा नियमांचे उल्लंघन झाले तर नक्की कारवाई करावी. परंतु दुपारी 4 वाजता डॉल्बी लावली तरी लोक तक्रार करतात व पोलीस येऊन सक्तीने डॉल्बी बंद करतात, ही डॉल्बीधारकांची तक्रार आहे.

डॉल्बीधारकांना उद्यम आधारकार्ड काढून दिले गेले आहे. त्यासाठी संघटनेने प्रशिक्षणही दिले. सध्या 70 डेसीबल ही ध्वनी मर्यादा डॉल्बीधारकांना देण्यात आली आहे. परंतु डॉल्बी लावली की लगेच तक्रारी सुरू होतात आणि डॉल्बी बंद केली जाते. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे, असे डॉल्बीचालक म्हणतात.

राज्यांतर्गत डॉल्बी लावण्यास हरकत नाही. परंतु बाहेरच्या राज्यांतील डॉल्बीचालकांनी इथे येण्यापूर्वी आमच्या संघटनेचे नियम -अटी यांचे पालन करणे आवश्यक आहे. कंपनीकडे पैसा नसल्यामुळे कॉर्पोरेट इव्हेंट्स नाहीत. जयंती, उत्सव यांना मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवात सरकारने विनंतीवजा सूचना केल्याने आम्ही डॉल्बी लावली नाही. त्या काळी जर डॉल्बी लावली तर जप्त करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे एकूणच आम्ही अडचणीत आलो आहोत, असे डॉल्बीचालकांचे म्हणणे आहे.

Related Stories

कराड बाजार समितीची स्वागत कमान ढासळली

Patil_p

हळद लागली मात्र अक्षता थांबल्या…!

Omkar B

शेतकऱयांना नुकसानभरपाई त्वरित द्या

Amit Kulkarni

जागनूर येथे पाऊण लाखाचा गांजा जप्त

Tousif Mujawar

काशी-त्रिवेणी संगम यात्रेची सांगता

Amit Kulkarni

देसूर येथे कीर्तन सोहळय़ाची मुहूर्तमेढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!