Tarun Bharat

पराभवाची मालिका खंडित करण्याचे दिल्ली-बेंगळूरचे ध्येय

अबु धाबी

 दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांचा आयपीएल साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार असून दोन्ही संघ पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघांसाठी अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठीच ते प्रयत्नशील राहतील. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

तसे पाहिल्यास दोन्ही संघांसाठी ही लढत म्हणजे उपांत्यपूर्व फेरीसारखीच  असणार आहे. दिल्लीने चार तर आरसीबीने सलग तीन सामने गमविले आहेत. मुंबई इंडियन्स वगळता इतर संघांत प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, यावरूनच स्पर्धेतील जबरदस्त चुरस लक्षात येण्यासारखी आहे. पहिल्या दोनमध्ये स्थान मिळविल्यास अंतिम फेरी गाठणे सोपे ठरणार आहे. म्हणून उर्वरित संघांत जबरदस्त संघर्ष सुरू आहे. सोमवारचा सामना गमविणारा संघ पराभूत झाला तरी प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. पण त्यासाठी त्यांना इतर संघांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

या स्पर्धेच्या पूर्वार्धात दिल्ली कॅपिटल्सने जवळपास सर्वच संघांवर वर्चस्व गाजवले. पण नंतर त्यांची घसरण होत गेल्याने पराभवाची मालिका सुरू झाली. दोन आठवडय़ापूर्वी त्यांनी शेवटचा विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांचे फलंदाज ढेपाळत गेले आहेत आणि गोलंदाजांतही पूर्वार्धातील दाहकता कमी होत गेली. दिल्लीला सलामीची भक्कम जोडी मिळेनाशी झाली आहे. पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे यांना शिखर धवनच्या साथीला पाठविण्यात आले. पण दोघांनाही धवनला अपेक्षित साथ देता आली नाही. तसे पाहिल्यास लागोपाठ दोन शतके झळकवल्यानंतर धवनचा फॉर्मही हरविला आहे. त्याने मागील तीन सामन्यांत 0, 0, 6 अशा धावा जमविल्या आहेत.

मध्यफळीत खेळणाऱया ऋषभ पंतवर हा संघ बराच अवलंबून आहे. त्याने आतापर्यंत 112.29 च्या स्ट्राईकरेटने 274 धावा जमविल्या आहेत. पण त्याच्याकडून अपेक्षित असलेली स्फोटकता अद्याप दिसून आलेली नाही. शनिवारी मुंबई इंडियन्सकडून 9 गडय़ांनी पराभूत झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने, आम्हाला निर्भय होऊन खेळण्याची गरज असल्याचे म्हटले होते. ‘फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याचा विचार तर करावाच लागणार आहे. पण निर्भय दृष्टिकोन असणेही तितकेच गरजेचे आहे. सहजतेने खेळण्यावर भर देत अतिविचार करणे टाळण्याचा प्रयत्न करायला हवा,’ असे त्याने म्हटले होते.

सलग तीन पराभव झाल्याने हा संघ कोहली, डीव्हिलियर्स या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवरच पूर्णपणे अवलंबून असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. गेल्या दोन सामन्यात दोघेही अपयशी ठरल्याने त्यांना मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलामीला फिंचच्या जागी आलेल्या फिलिपने आश्वासक कामगिरी केली आहे, पण त्याला मोठय़ा खेळी करण्यावर लक्ष पुरवावे लागेल. संयुक्त अरब अमिरातमध्ये आता थंडीला सुरुवात झाली असल्याने दव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. या वातावरणाचा विचार करून प्रत्येक संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत आहे. दवामुळे उत्तरार्धात गोलंदाजीपेक्षा फलंदाजी करणे जास्त सोयीचे ठरणारे असते, हा विचार त्यामागे असतो. हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर कोहलीनेदेखील याचाच उल्लेख केला होता.

@दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल्। डेनिस सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.

@आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग, मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झाम्पा.

Related Stories

आशिया टेटे स्पर्धेत मनिका बात्रा उपांत्य फेरीत

Patil_p

प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 27 सप्टेंबरपासून

Patil_p

आयपीएलमधील आणखी दोन पंचांची माघार

Amit Kulkarni

रणजी क्रिकेट स्पर्धा डिसेंबरपासून,

Patil_p

भारत-अर्जेंटिना हॉकी सामना बरोबरीत

Amit Kulkarni

लिव्हरपूलकडे प्रिमियर लीग फुटबॉल करंडक

Patil_p