Tarun Bharat

परिपूर्ण नाटय़ानुभव देणारी ‘जन्म एक व्याधी’

Advertisements

 रघु कदम यांचे दिग्दर्शन, नीलेश पवार यांचा अभिनय 

जयंत पवार हे मूळचे नाटककार आणि नाटय़समीक्षक. मात्र, गेल्या काही वर्षात मराठी कथा साहित्यातील आजचे महत्वाचे कथाकार अशी त्यांची ओळख ठळक होत गेली. त्यांच्या पहिल्याच ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीने गौरविण्यात आले. याच कथासंग्रहातील ‘जन्म एक व्याधी’ या बहुचर्चित कथेचे नाटय़दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी नाटय़रुपांतर केले असून, अभिनेते नीलेश पवार यांनी हे नाटय़रुपांतर रंगमंचावर सादर करायला प्रारंभ केला आहे. ‘जन्म एक व्याधी’च्या या प्रारंभीच्या प्रयोगालाही नाटय़रसिकांचा उत्तम प्र्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता नीलेश पवार म्हणतात, ‘जन्म एक व्याधी’ ही जयंत पवार यांची  माणसाच्या जगण्याचं दर्शन घडविणारी कथा आहे. या कथेचा मूळ गाभा मनाला स्पर्शून जातो. नाटय़ानुभव सादर करताना प्रयोगशील नाटय़कृती करता येईल आणि कथेचा जीवंत नाटय़ानुभव लोकांसमोर ठेवता येईल आणि प्रत्येकाला आपल्या सोबत सभोवतालच्या माणसांच्या जगण्याचे भान येईल. माणूस म्हणून आपण जास्त समजदार, प्रगल्भ होऊ, असं मला वाटलं म्हणून मी या कथेच्या नाटय़ात अभिनय करू लागलो. लिखित कथा संहितेसकट पात्रांची, संवादाची वेगळी ओळख निर्माण न करता निवेदनातून व्यक्तीरेखा आणि पुन्हा निवेदन हा प्रवास अभिनेता म्हणून आव्हानात्मक वाटला. त्यातून कथेतील सगळी पात्र एकपात्री नाटय़ानुभवातून साकारण्याची संधी मिळाली. काही क्षणात एका पात्राच्या विचारातून त्याच्या देहबोलीतून दुसऱया पात्राची व्यक्तीरेखा रंगमंचावर रेखाटणे ही तारेवरची कसरत होती. या प्रवासात आपण प्रेक्षकांनाही आपणासोबत सहप्रवासाचा नाटय़ानुभव देता येईल, या विश्वासाने हा दीर्घांक एकपात्री करण्याचा मी निर्णय दिग्दर्शक रघुकाकांना बोलून दाखविला आणि नाटय़रुप रंगमंचावर आले.

दिग्दर्शक रघु कदम म्हणतात, जयंत पवारांची ‘जन्म एक व्याधी’ कथा वाचल्यानंतर त्या कथेतील नायक मी माझ्यातच शोधू लागलो. कारण ही कथा गिरणगावातील चाळ वस्तीतील कौटुंबिक कथा असून, चाळवस्तीवर एक ठळक भाष्य करणारी आहे. जन्मापासून गिरणगावातील चाळ वस्तीतच एकत्र कुटुंबात मी वाढलो आणि अजूनही आहे. आता विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित झाली. परंतु एकत्र कुटुंबात राहत असताना त्या नात्यामधील गुंता व त्यातून निर्माण होणारे मत्सर, द्वेष, कलह, भांडणे ही या कथेत वाचताना ते प्रसंग माझ्या समोर घडत आहेत, असे वाटू लागते. प्रसंगी एकत्र कुटुंबातील माणसे एकमेकांपासून दुरावली, तरी त्यांच्या नात्यातील ओढ, गुंतवणूक कधीच संपत नाही. हे जयंत पवारांनी त्यांच्या या कथेमध्ये ठळकपणे मांडले आहे. त्यामुळेच या कथेचं नाटक मला करावसं वाटलं.

Related Stories

शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

Abhijeet Shinde

जॅकलीन झाली ‘हंटर रानी’

Amit Kulkarni

प्लॅनेट मराठीवर 10 नव्या वेबसीरीज

Patil_p

रहस्यमय घटनांचा वेध ‘द टर्निंग’

Patil_p

24 सप्टेंबर पासून पडद्यावर वाजणार ‘भोंगा’

Patil_p

कोरोनाविषयक सामाजिक लघुपट सातासमुद्रापार

Patil_p
error: Content is protected !!