Tarun Bharat

पर्तगाळी मठात रामजन्म सोहळा भक्तिभावाने

भाविकांची अलोट उपस्थिती, लौकिक जीवनात रामायणासारखे महाकाव्य नाही : प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज

प्रतिनिधी /काणकोण

दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर रविवारी साजऱया झालेल्या पर्तगाळी येथील रामनवमी उत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली. 10 रोजी दुपारी 12.40 वा. रामजन्माचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पर्तगाळी मठात झाला. या मठाचे 23 वे स्वामी महाराज प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ यांच्या महानिर्वाणानंतरचा विद्यमान प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचा हा पहिलाच उत्सव होता. मात्र तो शिस्तबद्धरीत्या साजरा करण्याकडे आणि अगदी वेळेवर सर्व उपक्रम करण्याकडे विद्यमान स्वामी महाराजांनी लक्ष दिल्यामुळे तसेच शिष्यगणांनी समर्पित भावनेने स्वतःला झोकून दिल्यामुळे उत्साहात हा उत्सव पार पडला.

आपले गुरूस्वामी प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि प्रभू श्री रामचंद्रावर ठेवलेल्या विश्वासामुळे मठातील सर्व कार्ये यथासांग पार पडली, असे विनम्रपणे श्री विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी सांगितले. रामायणाचे दिवसातून एकदा तरी पारायण करायला हवे. प्रभू रामचंद्र स्मितपूर्व भाषी, वचनपूर्ती करणारे पुरुषोत्तम असून लौकिक जीवनात रामायणासारखे महाकाव्य नसल्याचे मत यावेळी स्वामी महाराजांनी मांडले. आदर्श व्यक्ती म्हणून प्रभू रामचंद्राचेच नाव प्रथम घ्यायला हवे. देवावर विश्वास ठेवल्यास सर्व सिद्धी पूर्ण होतात असे सांगून स्वामी महाराजांनी उपस्थित भाविकांची आपल्या प्रवचनाने मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पै यानी केले. प. पू. स्वामी महाराजांनी रामरक्षा आणि मंत्रघोषात रामजन्म साजरा केला.

मोठय़ा प्रमाणात फेरी

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध अशा या जत्रोत्सवानिमित्त यंदा मोठय़ा प्रमाणात फेरी भरली आहे. त्यात मिठाईच्या दुकानांबरोबरच तांब्या-पितळेची भांडी, शेतीची अवजारे, कलाकुसरीचे साहित्य त्याचप्रमाणे अन्य वस्तूंचा समावेश आहे. जत्रोत्सवात भाग घेणाऱया भाविकांची कसलीच गैरसोय आणि अडचण होऊ नये यासाठी काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. जत्रोत्सवात सहभागी होणाऱया भाविकांच्या वाहनांसाठी व्यवस्थित पार्किंग सोय या ठिकाणी करण्यात आली होती.

संध्याकाळी रथारोहणानंतर स्वामीजींच्या हस्ते फळे, फुले, मिठाई, द्रव्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर होळी दहन झाले आणि रात्री महारथातून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, सायंकाळी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या उत्सवास उपस्थिती लावली.

Related Stories

माजी सरपंच देवेंद्र नाईक ‘आप’च्या वाटेवर ?

Amit Kulkarni

दोनापावल येथील सरकारचा भुखंड एजन्सीला विकण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव

Amit Kulkarni

मोरपिर्ला सरकारी शाळेचा सातव्यांदा 100 टक्के निकाल

Amit Kulkarni

मातृशक्तीचा सन्मान हा संस्कृतीचा आदेश

Patil_p

बोरी येथील धोकादायक जुन्या पुलाच्या मोडकळीचे काम पूर्ण

Patil_p

शांतादुर्गा बेती संघाचा एमवायएसवर विजय

Amit Kulkarni