Tarun Bharat

पर्यटन व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन

राज्यात पर्यटकांची संख्या वाढली, बहुतांश हॉटेल-रेस्टॉरंट फुल्ल, रस्त्यांवर वाहतूक कोंडी

प्रतिनिधी /पणजी

कोरोना कधी एकदा संपुष्टात येतोय आणि गोव्याला कधी एकदा जातोय अशी परिस्थिती असलेल्या देशी पर्यटकांचा प्रचंड ओढा गोव्याकडे लागला आहे. सध्या गोव्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक पोहोचले आहेत. त्यामुळे गेले सुमारे दहा दिवस झाले राज्यातील बहुतांश हॉटेले फुल्ल झाली आहेत आणि पर्यटन व्यवसायाला दोन वर्षानंतर पुन्हा अच्छे दिन सुरू झाले आहेत.

गेली दोन वर्षे पर्यटन व्यवसाय कोरोनाच्या फैलावामुळे ठप्प झाला होता. त्यातच सरकारने घातलेली अनेक बंधने यामुळे केवळ गोव्यातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांचा पर्यटन व्यवसाय बंद झाला होता. आता कोरोनाच्या अटी जवळपास सर्वच राज्य सरकारनी काढून घेतल्या असून त्यामुळे पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे गोव्याकडे सरकले आहेत.

पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को तसेच कळंगूट, कांदोळी, सिकेरी वागातोर, हणजूण या भागातील वाहतुकीवर बराच ताण आलेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि गुजरात मधून चारचाकी वाहने घेऊन पर्यटक मोठय़ा संख्येने गोव्यात आलेले आहेत. विदेशी पर्यटकांपेक्षाही देशी पर्यटक जास्त पैसे खर्च करीत असल्याने सध्या राजधानी पणजीसह अनेक भागातील हॉटेले, रेस्टॉरंट इत्यादींची चंगळ सुरू झाली आहे.

पणजीतील वाहतूक व्यवस्थेवर ताण

पर्यटन टॅक्सी व्यवसायाला देखील दोन वर्षानंतर चांगले दिवस आलेले आहेत. गोव्याकडे येणारी सर्वच विमाने सध्या फुल्ल भरून येतात. तसेच गोव्यातील कॅसिनोंचे आकर्षण देशी पर्यटकांना असल्याने पर्यटकांचे ताफे पहायला मिळतात. पणजीतील वाहतूक व्यवस्थेवर कमालीचा ताण आलेला असून पार्किंग व्यवस्था उपलब्ध होणे हे महाकठीण काम बनले आहे.

सध्या देशी पर्यटकांची मौजमजा राज्यातील हॉटेलांचे मोठय़ा प्रमाणात बुकिंग झालेले आहे. अद्याप चार्टर विमाने येण्यास प्रारंभ झालेला नाही. साधारणतः या आठवडय़ाच्या अखेरीस चार्टर विमाने गोव्यात पर्यटकांना घेऊन येण्याची शक्यता आहे. सध्या तरी देशी पर्यटकांची मौजमजा गोव्यात चालत असून गोव्यातील किनाऱयांवर हजारो पर्यटक सायंकाळी जमतात. मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात आल्याने व अटल सेतुच्या पुलावरून मेरशी जंक्शन पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण चालू असल्याने एकेक तास वाहतूक पूर्णतः ठप्प होते आहे. त्यातून पणजीत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात.

Related Stories

धर्मांध शक्तींला बाजूला ठेवा-शरद पवार

Archana Banage

मगोचे उमेदवार नरेश सावळ यांनी डिचोली मतदारसंघातून दाखल केली उमेदवारी

Abhijeet Khandekar

“जागतिकीकरण झालेल्या जगात मानवी संबंधांच्या उणीवेला बॉर्डर हे माझे उत्तर”: दिग्दर्शक डेव्हिडे डेव्हिड

Archana Banage

भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो

Amit Kulkarni

डिचोलीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

Amit Kulkarni

बाणस्तारी पुलावर धावत्या टुरिस्ट बसला आग

Amit Kulkarni
error: Content is protected !!