Tarun Bharat

पर्यायी रस्त्याविना गैरसोय; स्मार्ट सिटी कामाचा फटका

रहिवासी-वाहनधारकांचे हाल : पर्याय उपलब्ध करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. विशेषतः रस्ते आणि गटारींचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र सदर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी विकासकामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. अशातच पर्यायी रस्ते नसल्याने वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील रस्त्याशेजारील गटारीचे बांधकाम करून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या आनंदवाडी, टिळकवाडी तसेच मृत्युंजयनगर, अनगोळ रोड अशा विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. पण यापैकी काही रस्त्यांचे काम अर्धवट आहे. यापैकी काही रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे रस्ते बंद केल्यास वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

मृत्युंजयनगर परिसरात गटारीचे बांधकाम आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण या भागातील रहिवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली नाही. अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच मृत्युंजयनगरमधील विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. कोणत्याही रस्त्याचा विकास करण्यापूर्वी वाहनधारकांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करणे गरजेचे आहे. किंवा अडचणीच्या ठिकाणी एका बाजूचा रस्ता खुला ठेवून विकासकामे राबविणे आवश्यक आहे. मात्र कोणतेच नियोजन न करता स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी कामकाज करीत आहेत. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत आहे. काही ठिकाणी पर्यायी रस्ते आहेत. पण त्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडुजी करून वाहनधारकांना ये-जा करण्यालायक रस्ता बनविणे गरजेचे आहे. रस्ता करण्यापूर्वी वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग खुले करण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात येते. पण निविदेतील सर्व अटी व नियम धाब्यावर बसवून विकासकामे राबविण्यात येत आहेत. याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासी व वाहनधारकांना होत आहे. बहुतांश ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात आल्याने स्मार्ट सिटी कंपनीच्या अयोग्य नियोजनाचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

Related Stories

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद : महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली अमित शहांची भेट

Abhijeet Khandekar

वाहतूक दक्षिण पोलिसांच्या कारभाराची चौकशी सुरू

Patil_p

‘झंकार’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन

Amit Kulkarni

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 12 ऑक्टोबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

मनपा मतदार यादी प्रसिद्धीला कोरोनामुळे खो

Omkar B

प्रज्वल, श्रीरंग, मंदास, सक्षम, पार्थ विजेते

Amit Kulkarni