Tarun Bharat

पर्येत भिरोंडा, पिसुर्ले भागात पाणी समस्या त्रस्त नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा

प्रतिनिधी /वाळपई

पर्ये मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मतदारसंघाच्या भिरोंडा व पिसुर्ले या क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे त्रस्त झालेले नागरिक चार दिवसांत मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान,  आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी दोन्ही पंचायती क्षेत्रातील नागरिकांनी केलेली आहे.

उष्णता मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली आहे. मात्र दुसऱया बाजूने पर्ये मतदारसंघातील भिरोंडा व पिसुर्ले भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी नागरिकांसाठी मोठय़ा प्रमाणात डोकेदुखी ठरत आहे. पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील पंचायतवाडा शांतीनगर देऊळवाडा द्याटवाडा या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे.

अशीच स्थिती भिरोंडा पंचायत क्षेत्रांमध्येही निर्माण झालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून तो कमी पडत असल्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गोव्याच्या कानाकोपऱयात 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध करण्याची घोषणा भाजपा सरकारने केली होती. मात्र सत्तरी तालुक्यात आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 एका बाजूने मतदारसंघाच्या विकासाला मोठय़ा प्रमाणात चालना देण्यात येत आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत समस्या आज या मतदारसंघातील अनेक भागांना भेडसावत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  पर्ये मतदारसंघ टँकरमुक्त तरी कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पिसुर्ले या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पर्ये मतदारसंघाचे माजी आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नाने पिसुर्ले शांतीनगर येथे करोडो रुपये खर्च करून पाणी प्रकल्प उभारला आहे, सदर पाणी पुरवठा प्रकल्पात पोडोसे पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी सोडले जाते व ते पाणी नंतर या भागातील नागरिकांना वितरीत केले जात आहे. परंतु एवढी सगळी यंत्रणा उभी करूनसुद्धा नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. हे दुर्दैव आहे, अशी खंत पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच देवानंद परब यांनी केली.

सदर भागात सुरळीत पाणीपुरवठा करावा यासाठी कित्येक वेळा पाणी पुरवठा अधिकाऱयांना सांगितले आहे. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही ते का सोडले जात नाही, असा सवाल पंच देवानंद परब यांनी उपस्थित केला आहे.

सध्या खाण कंपन्यांनी सुरू असलेल्या टँकरद्वारे होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे  येथील नागरिकांची तहान भागत आहे. परंतू सदर पाणी अपुरे पडत असल्याने भर उन्हाळय़ात नागरिकांची गैरसोय होत आहे.

Related Stories

जॉय काकोडकर तिसवाडी बुद्धिबळ रॅपीड स्पर्धेचा विजेता

Amit Kulkarni

घोरपडांची शिकारप्रकरणी सहा जण ताब्यात

Patil_p

युवा अभियंते बनले.. पोलीस अधिकारी

Patil_p

वास्कोतील अ.गो. मिनी नरकारसूर वध स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

माजी लष्कर प्रमुख जनरल सुनिथ फ्रांसिस रॉड्रीग्स यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

जीए यांच्या कथांचे संवादात्मक अभिवाचन

Amit Kulkarni