Tarun Bharat

पश्चिम बगल रस्त्याच्या कामाला बाणावलीच्या नागरिकांचा विरोध

प्रतिनिधी / मडगाव

पश्चिम बगल रस्त्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. मात्र, हे काम बाणावलीतील नागरिकांच्या मागणीनुसार होत नसल्याने काल शनिवारी त्याला विरोध करण्यात आला तसेच आंदोलन पुकारण्यात आले. रस्त्याच्या कामाला विरोध दर्शविण्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने एकत्र आले. त्यात आमदार कॅप्टन व्हॅन्झी व्हिएगश, आपचे नेते अमीत पालेकर, बाणावलीच्या पंच सदस्य फेलिसिसा नोरोन्हा व पर्यावरण प्रेमी सिद्धार्थ कारापुरकर यांचा समावेश होता.

आमदार व्हॅन्झी व्हिएगश यांनी आठवडय़ाच्या शेवटच्या सुट्टीच्या दिवसात पश्चिम बगल रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याला विरोध दर्शवला. हे काम घाईगडबडीत न करता लोकांच्या मागणीनुसार व्हायला पाहिजे तसेच नागरिकांना न्यायालयात जाण्याची संधी दिली पाहीजे असे ते यावेळी म्हणाले.

पश्चिम बगल रस्त्याच्या कामाच्या संदर्भात बाणावली पंचायतीने एक ठराव घेतला आहे. या ठरावाचा अभ्यास सोमवारी केला जाईल. आपण, स्वता पंचायतीत जाऊन हा ठराव पाहणार असल्याचे आमदार व्हिएगश यांनी यावेळी स्पष्ट केले. पंचायतीने घेतलेल्या ठरावाचा अभ्यास करुन पुढील कृती केली जाईल व न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल असे त्यांनी सांगितले. पंचायतीने या पुर्वी या कामाच्या विरोधात पावले उचलायला पाहिजे होती. पण माजी आमदाराने या आंदोलनाला पाठिंबाच दिला नाही असेही आमदार व्हिएगश म्हणाले.

पश्चिम बगल रस्त्यासाठी ज्या शेतांमध्ये माती भराव घालण्याचे काम चालू आहे. त्यामुळे पावसाळय़ात पुर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्याचसाठी स्थानिक लोक विरोध करीत आहे.

बाणावलीच्या पंच सदस्य फेलिसिया नोरोन्हा यांनी पंचायतीने घेतलेल्या ठरावाची माहिती देताना सांगितले की, पंचायतीने दोन ठराव घेतले आहेत. त्यात या संदर्भात न्यायालयीन लढाईसाठी वकिलाची नियुक्ती व दुसरा ठराव कामाला स्थगिती मिळवण्यासाठी. पंचायतीच्या वतीने माजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची भेट घेतली होती व त्यांनी या संदर्भात योग्य विचार करण्याचे आश्व्ा्रासन दिले होते.

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची भेट घेऊन त्यांना या संबंधीची माहिती दिली होती. केवळ पंचायतीने पुढाकार घेऊन भागणार नाही. शेतकऱयांनीही पुढे यायला पाहिजे असे फेलिसिया नोरोन्हा म्हणाल्या. पंचायतीने ऍड. धवल जव्हेरी याची नियुक्ती केली असल्याचे तिने सांगितले.

पर्यावरण प्रेमी सिद्धार्थ कारापुरकर यांनी सांगितले की, आमचा बायपास रस्त्याला विरोध नाही. पण हा रस्ता स्टिल्टवर बांधलेला आम्हाला हवा आहे. शेतांमध्ये मातीचा भराव टाकून शेत जमिनीची नासाडी केलेली नागरिकांना नको आहे. सरकारने वेळीच या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसारच बगल रस्त्याचे काम पुढे न्यावे.

Related Stories

दहा उपअधीक्षक बनले अधीक्षक

Amit Kulkarni

कोरोनाचे थैमान, 713 नवे बाधित

Patil_p

वीज पुरवठा खंडीत

Amit Kulkarni

अपघातात जखमी झालेल्या देवसु येथील युवकाचा मृत्यू

Omkar B

लाडफे गावातील धबधबा पर्यटनासाठी बंद

Amit Kulkarni

दहावी परीक्षेसाठी तीन हजार कर्मचारी तैनात

Patil_p