Tarun Bharat

पश्चिम भागातील संपर्क रस्ते हरवले खड्डय़ात

रस्त्यावर खड्डे अन् धूळ-मातीचे साम्राज्य : प्रशासनाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी

वार्ताहर /किणये

तालुक्मयाच्या पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. विविध गावांना जोडणारे संपर्क रस्ते खड्डय़ांमध्ये हरवलेले आहेत. खड्डे आणि धूळमातीचे साम्राज्य या रस्त्यांवर पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संपर्क रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिक व वाहनधारक करत आहेत.

प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र पश्चिम भागातील विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे का? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. यामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले आहेत.

अनेक वर्षापासून आपण या खड्डेमय रस्त्यातून ये-जा करीत आहोत. इथल्या संपर्क रस्त्यांसाठी आम्ही दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीही याबद्दल आवाज उठवत नाहीत. सर्वसामान्य जनता या रस्त्याबद्दल जाब विचारायला गेली असता त्यांच्यावरही दडपण आणण्याचा प्रयत्न काही गावांमध्ये होऊ लागला आहे, अशी माहितीही नागरिकांनी दिली. सोनोली ते बिजगर्णी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. याचबरोबर कर्ले ते बेळवट्टी रस्त्याचा बहुतांशी भाग गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसात वाहून गेलेला आहे. याकडेही दुर्लक्ष झालेले आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे मुश्कील बनले आहे. बेळगुंदी मुख्य रस्त्यावरील कल्लेहोळ ते बेनकनहळळी, कर्ले ते बेळवट्टी, रणकुंडये क्रॉस ते रणकुंडये, नावगे क्रॉस ते नावगे, बिजगर्णी ते सोनोली, बोकनूर ते सावगाव हे संपर्क रस्ते अतिशय खराब झाले आहेत.

निधी मंजूर होऊनही दुर्लक्ष का ?

बेळगुंदी रस्त्यावरील कल्लेहोळ क्रॉस ते बेनकनहळळी गावापर्यंतच्या रस्त्याचे गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

-किरण मोटणकर

वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ

बेनकनहळी-बेळगुंदी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आमची चारचाकी वाहने आहेत. खड्डय़ांमुळे वाहने नादुरुस्त होऊ लागली आहेत. याचा भुर्दंड आम्हाला सोसावा लागत आहे. पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱयांनी या परिसरातील रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती करावी.

-रमेश शहापूरकर

अपघातांच्या संख्येमध्ये वाढ

गेल्या सहा ते सात वर्षांपासून या संपर्क रस्त्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. या भागातील खराब अन् खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. आम्ही रस्त्यासाठीचा कर भरतो. मग या रस्त्यांकडेच का दुर्लक्ष करण्यात येत आहे?

-राजू पाऊसकर

वरिष्ठांनी रस्त्यांची पाहणी करावी

सावगाव-बोकनूर रस्त्यावर खड्डे अधिक पडल्यामुळे वाहतूक करणे आम्हाला अवघड बनलेले आहे. बेळगुंदी व इतर गावाकडे आम्हाला ये-जा करावी लागते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही दाद मागायची कुणाकडे? वरिष्ट अधिकाऱयांनी या रस्त्यांची पाहणी करावी, तेव्हाच त्यांच्या निदर्शनास हे रस्ते येतील.

-अनंत कुट्रे

Related Stories

बसपाससाठी विद्यार्थ्यांना सेवासिंधूचा आधार

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

Patil_p

कला मंदिर रोडवर डेनेजचे पाणी

Amit Kulkarni

इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा

Amit Kulkarni

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

‘शिवचरित्र’ पारायणाला वाढता प्रतिसाद

Patil_p