Tarun Bharat

पश्चिम भागात दमदार, अन्य भागात रिमझिम

तरण्याने बळीराजाला तारले : उद्यमबागसह काही रस्त्यांवर पाणी

वार्ताहर /किणये

गेल्या 15-20 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप हंगामातील कामे खोळंबली होती. पाऊस कधी येणार याकडे शेतकऱयांचे लक्ष लागून राहिले होते. तसेच पावसाअभावी शेतकऱयांची चिंताही वाढली होती. अखेर दोन दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या तरण्या पावसाने शेतकऱयांना तारले आहे.

मंगळवारी प. भागात पावसाचा जोर वाढला होता. यामुळे उद्यमबागसह काही रस्त्यांवर पाणी आले होते. सोमवारपासून पाऊस होत असल्याने भातरोप लागवडीच्या कामांना जोर आला आहे. शेतकरी शिवारात भातरोप लागवड करण्यासाठी पावरट्रेलर व बैलजोडीच्या साहाय्याने चिखल करून लागवड करतानाचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसात हवामानातही कमालीचा बदल झाला असून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाऊस नसल्यामुळे भातरोप व रताळी वेल लागवड आदी कामे खोळंबली होती. पाऊस सुरू झाला असल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून पुन्हा एकदा शेतकरी खरीप हंगामातील पीक लागवडीमध्ये गुंतला आहे.

रताळी वेल लागवडीला पुन्हा जोर

तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी वेल लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. दि. 8 जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. या नक्षत्राच्या प्रारंभी चार ते पाच दिवस मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. पश्चिम भागात केवळ 30 टक्के रताळी वेल लागवड करण्यात आली आहे. पुन्हा पाऊस होत असल्यामुळे शेतकरी रताळी वेल लागवड करू लागले आहेत.

धूळवाफ पेरणी करण्यात आलेल्या भात पिकाची बऱयापैकी उगवण झाली असून या पिकात कोळपणी करण्यात आलेली आहे. तर काही भागात भांगलण करण्यात येत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे भातरोप लागवड ही कामे लांबणीवर पडली आहेत. पाऊस सुरू झाल्यामुळे शेतशिवारात पाणी साचत असून भातरोप लागवडीचा हंगाम साधण्यासाठी शेतकरी धडपडत
आहे.

रस्त्यावर पाणी आल्याने वाहनचालकांची गैरसोय

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव-पणजी महामार्गावरील उद्यमबागनजीकच्या रस्त्यावर पाणी आले आहे. उत्सव हॉटेलजवळून गटारीतून पाणी न जाता थेट महामार्गावर पाणी येत आहे. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत असताना चक्क महामार्गावरच पाणी येत असल्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कंग्राळी, गौंडवाड भागात दमदार पावसाची गरज

तरण्या पावसाने हुलकावणी दिल्याने भातरोप लागवडीचे काम खोळंबले होते. सध्या पावसाला सुरुवात झाली तरी पावसाला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे शेतकरी विहिरीच्या पाण्याचा वापर करत भातरोप लागवडीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड परिसरात या कामाला सुरुवात झाली आहे. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी  कामाला सुरुवात होऊनही मजुरांचा मात्र तुटवडा जाणवत नसल्याचे शेतकऱयांनी सांगितले.

जुलै महिना लागवडीला अनुकूल आहे. पण पावसाने हुलकावणी देऊन शेतकऱयांची मोठी गैरसोय केली आहे. केवळ विद्युत पंपसेटद्वारे विहिरीचे पाणी सोडून लागवड करण्यात येत आहे. पावसावर अवलंबून रोप लागवड करणाऱया शेतकऱयांची मात्र गोची झाली आहे.

गेल्या महिन्यात पेरणी केलेले भात अतिपावसामुळे कुजून दुबार पेरणीचे संकट ओढवले. मिरचीसह इतर भाजीपाला पिकेही पाणी साचून वाया गेली. परंतु सध्या भातरोप लागवडीसाठी पावसाची नितांत गरज असताना तरण्याने संपूर्ण उघडीप दिल्यामुळे शेतकऱयांची गोची झाली आहे.

हेस्कॉमने थ्री फेज वीज द्यावी

सध्या वीज पंपाद्वारे लागवडीची कामे सुरू आहेत. त्यासाठी हेस्कॉमने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत थ्री फेज विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोनामुळे बळीराजावर संकट

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. यामध्ये सरकारी नोकर वर्ग, डॉक्टर, औषध दुकानदार, दुधवाले यांना अधिक फरक पडला नाही. परंतु सर्वांचा अन्नदाता शेतकरी वर्गाला मात्र मोठा फरक पडला आहे. इतर व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची खरेदी कवडीमोल दराने झाली. लॉकडाऊन काळ संपला आता थोडे पैसे होतील या आशेवर शेतकरी असतानाच मृग नक्षत्राच्या वादळी पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले. शिवारातही पाणीच पाणी झाले. त्यामुळे मिरचीसह इतर भाजीपाल्याची पिके कुजून गेल्याने शेतकऱयांवर कंगाल होण्याची वेळ आली.

Related Stories

शेतकऱयांच्या हितासाठी दोन्ही मार्केट सुरू ठेवा

Amit Kulkarni

कर्नाटक 16 वर्षाखालील संघात बेळगावच्या सिद्धेश असलकरची निवड

Amit Kulkarni

रविवारी बेळगावला दिलासा, 715 नमुने निगेटिव्ह

Patil_p

उन्हाची तीव्रता, आंबा दाखल, लिंबूना मागणी

Patil_p

भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम जुलैपासून

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांब्यांची दुर्दशा

Amit Kulkarni