Tarun Bharat

पहिल्यांदाच मानवी शरीरात धडधडले डुकराचे हृदय

अमेरिकेत 57 वर्षीय रुग्णाला बसविले जेनेटिकली मोडिफाइड डुकराचे हृदय, रुग्णावर 7 तास चालली शस्त्रक्रिया

वृत्तसंस्था/ मेरीलँड

अमेरिकेच्या डॉक्टरांनी मोठी किमया करत जेनेटिकली मॉडिफाइड डुकराच्या हृदयाला 57 वर्षीय इसमाच्या शरीरात प्रत्यारोपित केले आहे. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली असून युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकलच्या डॉक्टरांनी सोमवारी याची माहिती दिली आहे. 7 तासांपर्यंत चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. परंतु ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली की नाही यासंबंधी आताच बोलणे घाईचे ठरणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

मेरीलँडचे रहिवासी डेव्हिड बेनेट दीर्घकाळापासून हृदयविकाराला तोंड देत होते. त्रास वाढल्याने अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासमोर मृत्यू किंवा प्रत्यारोपण हे दोनच पर्याय होते, असे डेव्हिड यांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेनंतर आम्हाला दरदिनी नवी माहिती मिळतेय. आम्ही या प्रत्यारोपणाच्या निर्णयाने अत्यंत आनंदी आहोत. रुग्णाच्या चेहऱयावर हास्य पाहून अत्यंत चांगले वाटतेय, असे डॉ. बार्टली ग्रिफिथ म्हणाले. डुकराच्या हृदयाच्या झडपांचाही (व्हॉल्व्ह) माणसांसाठी दशकांपासून यशस्वी वापर केला जात राहिला आहे.

ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यास विज्ञानाच्या क्षेत्रात हा मोठा चमत्कार ठरेल. याचबरोबर प्राण्यांच्या अवयवांना मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्याच्या संशोधनात एक मोठे पाऊल सिद्ध होईल. प्रत्यारोपणानंतर डुकराचे हृदय योग्यप्रकारे काम करत आहे. सध्या डेव्हिड बेनेट यांना हार्ट-लंग बायपास मशीनवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. पुढील काही आठवडे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डुकराचेच हृदय का?

डुकराचे हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यासाठी उपयुक्त असते. डुकराच्या पेशींमध्ये एक अल्फा-गल शूगर सेल असते. ही पेशी मानवी शरीर स्वीकारत नाही, यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी प्रथम डुकराला जेनेटिकली मॉडिफाइड करण्यात आल्याचे विविध
वैद्यकीय अहवालांमध्ये नमूद करण्यात आले.

एफडीएची आपत्कालीन मंजुरी

जगभरातील अनेक जैवतंत्रज्ञान कंपन्या मानवी प्रत्यारोपणासाठी डुकरांच्या अवयवांचा विकास घडवून आणत आहेत. शस्त्रक्रियेत वापरण्यात आलेले हृदय देखील युनायटेड थेरेप्यूटिक्सची सहाय्यक कंपनी रेविविकोरमधून आले होते. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (एफडीए) जेनोट्रान्सप्लांटेशन एक्सपेरिमेंटवर देखरेख ठेवते. एफडीएफकडून आपत्कालीन वापराच्या अंतर्गत या प्रत्यारोपणाला मंजुरी देण्यात आली होती.

Related Stories

इस्राईलमध्ये धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी, 44 जणांचा मृत्यू

datta jadhav

रशियन राजनयिकाचा मृत्यू, जर्मनीला संशय

Patil_p

जगभरात 5 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

टीव्ही पाहिला म्हणून अधिक टीव्ही पाहण्याची शिक्षा

Patil_p

चीनचा गुप्तचर प्रमुख फरार, जिनपिंग धास्तावले

Patil_p

‘डेल्टा’विरोधात फायझर, मॉडर्नाचा प्रभाव कमी

datta jadhav