Tarun Bharat

पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव

Advertisements

दक्षिण आफ्रिकेची 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडी, शतकवीर तेम्बा बवूमा-डय़ुसेन यांची द्विशतकी भागीदारी

पार्ल / वृत्तसंस्था

रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन (150 चेंडूत नाबाद 129) व तेम्बा बवूमा (143 चेंडूत 110) यांच्या तडफदार शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिल्या वनडे सामन्यात 31 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना डय़ुसेन व बवूमा यांनी चौथ्या गडय़ासाठी 204 धावांची आक्रमक द्विशतकी भागीदारी साकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 4 बाद 296 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात भारताला 50 षटकात 8 बाद 265 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 297 धावांचे कडवे आव्हान असताना भारतीय कर्णधार केएल राहुल (12) अतिशय स्वस्तात परतला. त्याने मॅरक्रमच्या गोलंदाजीवर डी कॉककडे सोपा झेल दिला. अनुभवी धवन (84 चेंडूत 79) व विराट कोहली (63 चेंडूत 51) या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. पण, धवन व विराट हे दोघेही नंतर अवघ्या 14 धावांच्या अंतरात बाद झाले आणि तेथूनच भारतीय फलंदाजी लाईनअपला मोठे भगदाड पडले.

विराट-धवन तंबूत परतल्यानंतर अन्य फलंदाजांमध्ये लवकर बाद होण्याची जणू शर्यतच लागली आणि पाहता पाहता भारतीय संघाचा प्रवास पराभवाच्या दिशेने सुरु झाला. आठव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या शार्दुलने 43 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या. पण, तोवर भारताचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती.

संथ सुरुवात

तत्पूर्वी, बोलँड पार्कच्या संथ स्वरुपाच्या खेळपटट्टीवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराह व भुवनेश्वर या दोघांनीही मुव्हमेंटचा उत्तम लाभ घेत द. आफ्रिकन फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यांना यात बऱयापैकी यशही लाभले. बुमराहने सलामीवीर जानेमन मलानला (6) अप्रतिम आऊटस्विंगरवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. मलानने खराब फटक्यावर आपली विकेट फेकली. भारतीय गोलंदाजांनी धावा रोखण्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघ एकवेळ 10 षटकात 1 बाद 39 अशा साधारण स्थितीत होता.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिलाच सामना खेळत असलेल्या क्विन्टॉन डी कॉकने 41 चेंडूत 27 धावा जमवल्या. मात्र, तो फारशी फटकेबाजी करु शकला नाही. चेंडू सरळ बॅटवर येत नसल्याने बवूमावर देखील मर्यादा राहिल्या. जून 2017 नंतर आपली पहिलीच वनडे खेळणाऱया अश्विनने डी कॉकला यष्टीचीत करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. डी कॉकचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न यावेळी फसला होता.

डय़ुसेन-बवूमाची द्विशतकी भागीदारी

डावातील 18 व्या षटकात एडन मॅरक्रम तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला. यावेळी वेंकटेश अय्यरने थेट थ्रो करत मॅरक्रमला धावचीत केले. द. आफ्रिकेची स्थिती यावेळी 3 बाद 68 अशी झाली आणि यजमानांना 200 धावांचा टप्पा गाठणे तरी शक्य होणार का, असेही चित्र होते. पण, याचवेळी डय़ुसेन व बवूमा यांचा झंझावात सुरु झाला आणि या उभयतांनीही तडफदार, आक्रमक शतके झळकावत संघाला सहजपणे 300 धावांच्या उंबरठय़ावर आणले.

या उभयतात डय़ुसेन अधिक आक्रमक पवित्र्यात राहिला. त्याने रिव्हर्स स्वीपचे फटके घोटवत भारतीय गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला. डय़ुसेनच्या शतकी खेळीत रिव्हर्स स्वीपसह डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील दमदार षटकाराचा प्राधान्याने समावेश राहिला. दुसरीकडे बवूमाने एकेरी धावा घेण्यावर अधिक भर दिला. त्याने 45 व्या षटकात तर डय़ुसेनने 48 व्या षटकात शतक साजरे केले. दोन्ही फलंदाजांसाठी हे दुसरे वनडे शतक ठरले. शार्दुलच्या डावातील शेवटच्या षटकात आफ्रिकन फलंदाजांनी 17 धावा वसूल केल्या. शार्दुल हाच सर्वाधिक महागडा गोलंदाजही ठरला. त्याला 10 षटकात 72 धावा मोजाव्या लागल्या. गोलंदाजीतील सहावा पर्याय वेंकटेश अय्यरकडे चेंडू सोपवला गेला नाही.

धावफलक

दक्षिण आफ्रिका ः क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. अश्विन 27 (41 चेंडूत 2 चौकार), जानेमन मलान झे. पंत, गो. बुमराह 6 (10 चेंडूत 1 चौकार), तेम्बा बवूमा झे. राहुल, गो. बुमराह 110 (143 चेंडूत 8 चौकार), एडन मॅरक्रम धावचीत (अय्यर) 4 (11 चेंडू), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन नाबाद 129 (96 चेंडूत 9 चौकार, 4 षटकार), डेव्हिड मिलेर नाबाद 2 (2 चेंडू). अवांतर 18. एकूण 50 षटकात 4 बाद 296.

गडी बाद होण्याचा क्रम

1-19 (मलान, 4.2), 2-58 (डी कॉक, 15.1), 3-68 (मॅरक्रम, 17.4), 4-272 (बवूमा, 48.1).

गोलंदाजी

बुमराह 10-0-48-2, भुवनेश्वर कुमार 10-0-64-0, शार्दुल ठाकुर 10-1-72-0, रविचंद्रन अश्विन 10-0-53-1, यजुवेंद्र चहल 10-0-53-0.

भारत ः केएल राहुल झे. डी कॉक, गो. मॅरक्रम 12 (17 चेंडू), शिखर धवन त्रि. गो. महाराज 79 (84 चेंडूत 10 चौकार), विराट कोहली झे. बवूमा, गो. शमसी 51 (63 चेंडूत 3 चौकार), रिषभ पंत यष्टीचीत डी कॉक, गो. फेहलुकवायो 16 (22 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर झे. डी कॉक, गो. एन्गिडी 17 (17 चेंडूत 1 चौकार), वेंकटेश अय्यर झे. डय़ुसेन, गो. एन्गिडी 2 (7 चेंडू), अश्विन त्रि. गो. फेहलुकवायो 7 (13 चेंडू), शार्दुल ठाकुर नाबाद 50 (43 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), भुवनेश्वर झे. बवूमा, गो. शमसी 4 (11 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 14 (23 चेंडूत 1 षटकार). अवांतर 13. एकूण 50 षटकात 8 बाद 265.

गडी बाद होण्याचा क्रम

1-46 (केएल राहुल, 8.3), 2-138 (धवन, 25.3), 3-152 (28.2, विराट), 4-181 (श्रेयस, 33.5), 5-182 (पंत, 34.0), 6-188 (वेंकटेश, 35.5), 7-199 (अश्विन, 38.3), 8-214 (भुवनेश्वर, 42.2).

गोलंदाजी

मॅरक्रम 6-0-30-1, मार्को जान्सन 9-0-49-0, केशव महाराज 10-0-42-1, एन्गिडी 10-0-64-2, तबरेझ शमसी 10-1-52-2, फेहलुकवायो 5-0-26-2.

Related Stories

ऑस्ट्रेलियन पथकाचे मायदेशी आगमन

Patil_p

पठाण बंधूंकडून वडोदरा पोलिसांना व्हिटॅमिन-सी गोळय़ांचे बॉक्स

Patil_p

चेन्नईन संघात व्हॅलस्किसचे पुनरागमन

Patil_p

राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय टेबल टेनिसपटूंचे पुनरागमन

Patil_p

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा 10 ते 31 जानेवारीपर्यंत

Patil_p

हंगेरी जीपीमध्ये रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p
error: Content is protected !!