केसांच्या रंगाबद्दलचा न्यूनगंड केला दूर
सौंदर्याबद्दल जगात एक मापदंड तयार झाल्याने महिला स्वतःचे नैसर्गिक सौंदर्य किंवा कुठल्याही प्रकारची कमतरता भरून काढण्यासाठी कृत्रिम गोष्टींची मदत घेतात. अशीच एक कमतरता म्हणजे कमी वयात केस पांढरे होणे आहे. एमिरियाना नावाच्या ब्रिटिश महिलेचे केस बालपणीच पांढरे होऊ लागल्यावर तिचा आत्मविश्वास डगमगला होता, परंतु आता ततिने स्वतःच्या पांढऱया केसांना हेअरकलरच्या कक्षेतून बाहेर काढले आहे.
एमिरियाना लिट्साचे वय केवळ 34 वर्षे आहे, परंतु तिने आता स्वतःच्या केसांना काळय़ा रंगाने रंगविणे थांबविले आहे. पांढऱया केसांना लपवत मी त्रस्त झाले होते असे ती सांगते. पूर्वी ती केसांना काळय़ा रंगात रंगवायची, परंतु आता तिने हेअर डाय पूर्णपणे नाकारला आहे.


एमिरियानाचे केस वयाच्या 11 व्या वर्षापासूनच पांढरे होऊ लागले होते. तेव्हा ती शाळेत शिकत होती आणि तिचा आत्मविश्वास डगमगू लागला होता. याचमुळे ती केसांना रंग लावू लागली होती. उत्तर लंडनमध्ये राहणाऱया एमिरियानाने स्वतःच्या 30 व्या वाढदिवशी केसांना रंग न लावण्याचा निर्णय घेतला. जून 2018 नंतर तिने कधीच हेअर डाय केलेले नाही. त्यापूर्वी तिने स्वतःच्या केसांचा नैसर्गिक रंग सर्वांपासून लपवून ठेवला होता.
केस रंगविण्याची कसरत बंद केल्यापासून ती वेगळा अनुभव घेत आहे. तिला अत्यंत मोकळे आणि सशक्त झाल्याचे जाणवते, कारण तिला कुठल्याही रंगात लपण्याची गरज भासत नाही. तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचे अकौंट उघडून स्वतःच्या पांढऱया रंगांच्या केसांची छायाचित्रे अपलोड केली आहेत. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी ब्युटी स्टँडर्ड निश्चित करावा, गर्दीप्रमाणे वागू नये असे ती सांगते. तिच्या पांढऱया केसांच्या छायाचित्रांना इंटरनेटवर मोठी प्रसिद्धी मिळत असून लोकांकडून तिचे कौतुक होत आहे. तिचा आत्मविश्वास आणि केसांचे लोकांकडून कौतुक केले जातेय.