Tarun Bharat

पांढऱ्या बुरशीमुळे महिलेच्या आतड्याला पडले छिद्र!

  • देशात आढळली जगातील पहिलीच केस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


कोरोना संक्रमणा वेगाने वाढत असतानाच आता काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशीने प्रशासनाच्या चिंतेत वाढ केली आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात कोरोना संक्रमणादरम्यान पांढऱ्या बुरशीमुळे एका रुग्णाच्या आतड्याला छिद्र पडल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच प्रकरण आहे. 


रुग्णालयातील ‘इन्सिट्यूट ऑफ गस्ट्रोअँट्रोलॉजी अँड पेनक्रिएटिकोबिलेरी सायन्सेस’चे अध्यक्ष डॉ. अनिल अरोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू संक्रमणात पांढऱ्या बुरशीचे असे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना विषाणूसंसर्गात पांढऱ्या बुरशीमुळे अन्ननलिका, लहान आतडे किंवा मोठ्या आतड्याला छिद्र असलेला रुग्ण याआधी आढळलेला नाही. 


याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले, 49 वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होते. तसेच तिला उलट्या आणि बद्धकोष्ठतेचाही त्रास जाणवत होता. त्यामुळे तिला 13 मे रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्तन कर्करोगामुळे गेल्याच वर्षी या महिलेचे स्तन काढण्यात आले होते तसेच चार आठवड्यांपूर्वी तिच्यावर केमोथेरेपी करण्यात आली होती. 


रुग्णाच्या पोटाचा सीटी स्कॅन केल्यानंतर पोटात पाणी आणि हवा असल्याचे लक्षात आले. आतड्याला छिद्र पडल्यास ही परिस्थिती उद्भवते. पुढच्या दिवशी रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी, अन्ननलिकेच्या खालच्या भागातही काही छिद्र आढळले. लहान आतड्याच्या एका भागात गँगरीन झाल्याने हा भाग काढण्यात आला, असे डॉ. अरोडा यांनी सांगितले.


दरम्यान, कोविड 19 पॉझिटिव्ह आढळलेल्या या महिलेच्या शरीरात अँटीबॉडी मोठ्या प्रमाणात होती. बुरशीचा त्रास समोर आल्यानंतर या महिलेला अँटी फंगल औषधे देण्यात आली होती. आता या महिलेची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

Related Stories

दुहेरी आव्हान

Patil_p

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

Patil_p

लैंगिक छळ केल्यास होणार बोनस रद्द

Patil_p

यंदा 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार

Tousif Mujawar

‘एनडीए’तही आता ‘महिला’राज

Patil_p

‘राज्यसभे’साठी शिवसेनेची अग्निपरीक्षा

Abhijeet Khandekar